मित्रा माझ्या आईला सांभाळ... मी तुझ्यावर खरं प्रेम केलं...चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

मित्रा माझ्या आईला सांभाळ...मी तुझ्यावर खरं प्रेम केलं आहे... आज तुला सोडून जातोय अशा आशयाची सुसाईड नोट लिहून माजलगाव तालुक्यात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

माजलगाव (जि. बीड) -  सर्वजण कोरोना महामारीच्या सावटाखाली असताना माजलगाव तालुक्यात मात्र तरुणांच्या आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे. किट्टी आडगाव येथील एका तरुणाने शनिवारी (ता. नऊ) मित्रा माझ्या आईला सांभाळ...मी तुझ्यावर खरं प्रेम केलं आहे... आज तुला सोडून जातोय अशा आशयाची सुसाईड नोट लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी पहाटे पाच वाजता घडली. मनीष गणेश घुले (वय २२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

संपूर्ण जग महिनाभरापासून कोरोना महामारीच्या सावटाखाली असून जो तो घराच्या आत बसलेला असताना तालुक्यात दोन दिवसांपासून तरुणांच्या आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे. शुक्रवारी (ता. आठ) दोन युवकांनी आत्महत्या केलेली असताना शनिवारीही (ता. नऊ) पुन्हा एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना किट्टी आडगाव येथे घडली. पहाटे पाच वाजता मनीष घुले याचा मृतदेह चिंचेच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

यावेळी त्याच्या शर्टच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्यात मनीषने मी जीवनाला कंटाळलो आहे....माझ्या नावावरची एक एकर जमीन बहिणीला द्या...अर्धा एकर जमीन माझ्या मित्राला द्या.... सावता रासवे मित्रा तू माझ्या आईला सांभाळ.... मी तुझ्यावर खरं प्रेम केलं... मी तुला आज सोडून जात आहे, असा मजकूर लिहून ठेवला होता. मनीषच्या आत्महत्येने तालुक्यात खळबळ उडाली असून त्याच्या आत्महत्यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. याबाबत माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बी.ए. पवार पुढील तपास करीत आहेत.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth commits suicide in Beed district