गुन्हे शाखा पोलिसांच्या कोठडीत तरुणाचा मृत्यू

गुन्हे शाखा पोलिसांच्या कोठडीत तरुणाचा मृत्यू

औरंगाबाद - दुचाकी चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या तरुणाचा पोलिसांच्या ताब्यात मृत्यू झाला. पोलिसाच्या धावत्या गाडीतून गुरुवारी (ता. 26) रात्री त्याने उडी घेतल्याचा दावा पोलिसांनी केला. तर कोठडीत बेदम मारहाण करून पोलिसांनी त्याचा खून केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. या घटनेनंतर पोलिस आयुक्त कार्यालयासमोर मृताच्या नातेवाइकांनी शुक्रवारी (ता. 27) मोठी गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिस आयुक्तांनी पाच पोलिस कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित केले.

दुचाकी चोरीच्या संशयावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राहुल अर्जुन गायकवाड (वय 27, रा. डोमेगाव, ता. गंगापूर), साजन अशोक गायकवाड, लक्ष्मण तुपे (भेंडाळा, ता. गंगापूर) या तिघांना ताब्यात घेतले होते. यातील राहुल आणि साजन हे दोघे चुलत भाऊ, तर लक्ष्मण हा त्यांचा नातेवाईक आहे. गुरुवारी (ता. 26) रात्री तिघांना घेऊन पोलिस आपल्या जीपने हिवरा (ता. नेवासा) येथे विक्री केलेल्या चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यासाठी गेले होते. पोलिसांच्या जीपमध्ये जमादार अशोक त्र्यंबक नरवडे (ब.नं. 1688), दत्ता भाऊराव सांगळे (ब.नं. 1100), नाईक युनूसशहा दौलत शहा (ब.नं. 1648), शिपाई संतोष काकडे (ब.नं. 489) आणि फेरोजखान शौकत पठाण (ब.नं. 897) असे पाच जण होते.

हिवरा येथून परतताना एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत लिंबेजळगाव येथे रात्री नऊच्या सुमारास राहुलने जीपच्या पाठीमागे दाराच्या फुटलेल्या काचेतून उडी घेतली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याला गंभीर जखमी अवस्थेत तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचार सुरू असताना शुक्रवारी (ता. 27) पहाटे चारच्या सुमारास राहुलचा मृत्यू झाला. या घटनेनंतर घाटी रुग्णालयाच्या परिसरात आणि पोलिस आयुक्तालयात राहुलच्या नातेवाइकांनी प्रचंड गर्दी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

खून केल्याचा आरोप
गुन्हे शाखेचे तीन पोलिस कर्मचारी बुधवारी (ता. 25) दोन दुचाकीवर घरी आले. त्या वेळी राहुल आणि साजन हे दोघे गाजगाव येथील शेतावर काम करीत होते. पोलिसांनी फोन करून त्यांना बोलावून घेतले. त्यानंतर दोघांना चौकशीसाठी नेत असल्याचे सांगून दोन्ही दुचाकीवर दोघांना बसविले. जाताना, एका दुचाकीवर दोन पोलिस आणि राहुल असे तिघे बसले होते, असे राहुलचे वडील अर्जुन गायकवाड यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी मुलाला नेल्याने मी तातडीने पाठीमागे निघालो. पाच वाजता गुन्हे शाखेत आलो. त्या वेळी राहुलला जनावरासारखे मारण्यात येत होते, त्याचा आवाज येत होता. मला पोलिसांनी धमकावले, जा पैशांचा बंदोबस्त करा, असे सुनावले. मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून मलाही रडू कोसळले. मी पुन्हा गुरुवारी (ता. 26) भेटण्यासाठी आलो, त्या वेळी तर राहुल उभेही राहू शकत नव्हता, तो गाडीतून उडी मारणे शक्‍यच नाही, तर त्याचा खून केल्याचा आरोप अर्जुन गायकवाड यांनी केला.

पाच पोलिस निलंबित
राहुल गायकवाड याच्या मृत्यू प्रकरणानंतर प्रकरणाच्या चौकशीची वाट न पाहता तातडीने पाचही पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त अमितेशकुमार यांनी तडकाफडकी निलंबित केले. या प्रकरणात पोलिसांनी कुणालाही संशयित म्हणून ताब्यात घेतल्यानंतर 24 तासांहून अधिक काळ त्याला अटक न करता ताब्यात ठेवता येत नाही. अटकेनंतर संबंधिताला पुढील चोवीस तासांत न्यायालयात हजर केले पाहिजे. आरोपाची खात्री होत नसेल तर दिवसभर चौकशी करून संध्याकाळी सोडून दिले पाहिजे आणि गरज असेल तर दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलाविता येते. या प्रकरणात पोलिसांनी नेमके काय, काय केले हा तपासाचा भाग आहे, असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

तपास "सीआयडी'कडे वर्ग
पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याने या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलिस महानिरीक्षकांशी बोलून तातडीन सीआयडीकडे वर्ग केल्याचे आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आहे. घटनेच्या अनुषंगाने सर्व कागदपत्रे सीआयडीकडे वर्ग करण्यात आली आहेत. तीन पथकांच्या माध्यमाने राहुलच्या मृतदेहाची पाहणी करून इनकॅमेरा पंचनामा करण्यात आला.

गाडीची काच फुटलेली
राहुल, सजन आणि लक्ष्मण या तिघांना हिवरा येथे नेण्यात आले. त्या जीपचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यामुळे जीपच्या पाठीमागील दाराची काच फुटून निघालेली आहे, त्याच गाडीचा उपयोग तिघांना नेण्यासाठी करण्यात आला. पाच पोलिसांपैकी तिघे मधल्या सीटवर, तर एक समोरच्या सीटवर बसलेला होता, तर एक कर्मचारी पाठीमागे तिघा आरोपींच्या जवळ बसलेला होता, असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

पोलिसांची चूक मान्यच
पोलिसांच्या ताब्यातील राहुलचा मृत्यू झाल्याच्या घटनेत पोलिसांची संपूर्ण चूक आहे. त्याला ताब्यात घेतलेल्या पोलिसांनी अक्षम्य निष्काळजीपणा केला आहे. या प्रकरणात कुठलीही लपवाछपवी नाही, जे झाले ते पारदर्शक समोर ठेवले आहे. आम्ही जबाबदारीत कमी पडलो. त्याबद्दल माफीही मागतो.
अमितेशकुमार, पोलिस आयुक्त

खुनाचा गुन्हा दाखल करा
राहुल बुधवारी ठणठणीत होता, त्याच अवस्थेत पोलिसांनी नेले. मारमार मारल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात सर्व पोलिसांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
अर्जुन गायकवाड (राहुलचे वडील)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com