शेततळ्यात तरुणाचा पाय घसरून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

पाचलगाव (ता.पैठण) येथील एका शेततळ्यात तरुणाचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.1) दुपारी चारच्या दरम्यान घडली. प्रदीप अर्जुन बोंबले (वय 22, ता.पाचलगाव) असे या मृत तरुणाचे नाव आहे. प्रदीप हा आपल्या कुटुंबासमवेत पाचलगाव येथे राहत होता. तो मंगळवार दुपारी चारच्या सुमारास शेजारच्या शेतातील एका शेततळ्याच्या बाजूने पायी जात असताना त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला.

जायकवाडी (जि.औरंगाबाद) : पाचलगाव (ता.पैठण) येथील एका शेततळ्यात तरुणाचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.1) दुपारी चारच्या दरम्यान घडली. प्रदीप अर्जुन बोंबले (वय 22, ता.पाचलगाव) असे या मृत तरुणाचे नाव आहे. प्रदीप हा आपल्या कुटुंबासमवेत पाचलगाव येथे राहत होता. तो मंगळवार दुपारी चारच्या सुमारास शेजारच्या शेतातील एका शेततळ्याच्या बाजूने पायी जात असताना त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला.

त्याच्यासोबतच असलेला त्याचा चुलतभाऊ संदीप बोंबले याने तो पाण्यात पडल्याचे पाहताच त्याला वाचविण्यासाठी जोरजोरात आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या ग्रामस्थांनी शेततळ्यावर धाव घेतली. तोपर्यंत तो पाण्यात बुडाला होता. यामुळे त्याचा तरुण वयातच मृत्यू झाला.

घटनास्थळी पैठण औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील, पोलिस जमादार विजय मोरे यांच्यासह औद्योगिक वसाहत अग्निशमन, औरंगाबाद येथील अग्निशमन दलाच्या जवानाने तब्बल पाच तासांच्या शोधानंतर मृत प्रदीपला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. त्याच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत्यू रोखता येऊ शकतो
शेततळ्याला पाणी झिरपू नये, म्हणून पन्नी टाकण्यात येते. शेततळ्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे काही दिवसांतच पन्नीवर शेवाळ जमते. त्यामुळे पन्नीवर कोणाचाही पाय पडला तर पन्नी शेवाळामुळे निसरडी झाल्याने पाय घसरून आत तोल जातो. पोहता येत असणाऱ्यालाही पन्नीला धरून वर येता येत नाही. यामुळे दुर्दैवी मृत्यूच्या घटना यापूर्वीही काही ठिकाणी घडलेल्या आहेत. असे दुर्दैवी मृत्यू रोखण्याकरिता शेततळ्याच्या काठावर लोखंडी खांब रोवून प्रत्येक शेततळ्यात दोन ठिकाणी जाड दोरी शेततळ्यात सोडण्याची सोय केलेली असावी. ज्यामुळे अचानक कोणीही घसरून पडल्यास त्या दोरीला पकडून जीव वाचवून तो पडणारा माणूस शेततळ्याबाहेर येऊ शकतो. त्यामुळे असे मृत्यू रोखण्यात यश येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Drowned In Farm Ponds