नदीत वाळू उत्खननासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडाला तरुण

नदीत वाळू उत्खननासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडाला तरुण

बदनापूर (जि.जालना) : अकोला (ता. बदनापूर) शिवारातील दुधना नदीत वाळू उत्खननासाठी खोदलेल्या ७० फूट खोल खड्ड्यातील पाण्यात एक ३८ वर्षीय तरुण बुडाला. त्याचे शोधकार्य रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. दीड महिन्यापूर्वीच नदीत खोदलेल्या दुसऱ्या खड्ड्यातील पाण्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजीच असताना या घटनेच्या बाबतीतही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच अकोला शिवारातील नदीत वाळू उत्खननासाठी खोदलेले खड्डे धोकादायक ठरत आहेत.


अकोला शिवारातील दुधना नदीच्या पात्रात वाळू उत्खननासाठी रस्ते बांधकाम करणाऱ्या संस्था व अवैध वाळू विक्री करणाऱ्या लोकांनी नियमबाह्य ६० ते ७० फूट खोल खड्डे केले आहेत. त्यात आता पावसाचे पाणी साचल्याने परिसरातील लोकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. दीड महिन्यापूर्वी दहावीच्या परीक्षेत आदल्या दिवशी उत्तीर्ण झालेल्या होतकरू शाळकरी मुलगा दीपक केकान जनावरे चारत असताना खड्ड्यात पडून पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला होता.

यासंदर्भात समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या एका कंपनीच्या विरोधात बदनापूर पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला होता. तर सहा महिन्यांपूर्वी बाबासाहेब श्‍यामराव मुंढे हा नदीत खोदलेल्या खड्ड्यात पडून जबर जखमी झाला होता. दरम्यान, शनिवारी (ता. तीन) दुपारी शेतातून पाण्याची टाकी आणण्यासाठी गेलेले पांडुरंग किसनराव मुंढे (वय ३८ रा. अकोला) हे नदीत अवैधरीत्या खोदलेल्या ७० फूट खोल खड्ड्यात पाणी साचल्याने अंदाज न लागल्याने पडले. ही माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्यांचे शोधकार्य सुरू केले आहे. जालन्याहून अग्निशमन दलाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले; मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांचा काही सुगावा लागला नाही.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com