रिक्षातून उतरला अन्‌ पळत सुटला! 

रिक्षातून उतरला अन्‌ पळत सुटला! 

औरंगाबाद - रिक्षातून घाईगडबडीत उतरला. रिक्षाचालकाला पैसे दिले अन्‌ कशाचेही भान न ठेवता पळत सुटला. त्याच वेळी स्मार्ट सिटी बस आली आणि तो बसला धडकला. यात तरुण गंभीर जखमी झाला. घाईगडबड आणि वाहतूक नियमांचा भंग केल्याने हा अपघात घडला असून, त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना सोमवारी (ता. 11) सव्वाअकराच्या सुमारास सिडको उड्डाणपुलाजवळील एका रुग्णालयासमोर घडली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, दीपक तेजराव म्हस्के (वय 20, रा. वैद्य टाकळी) असे गंभीर जखमीचे नाव आहे. दाताला क्‍लिप बसविण्यासाठी सकाळी दीपक औरंगाबादेत आला होता. सिडको बसस्थानक उड्डाणपुलाखाली तो रिक्षातून उतरला. त्यानंतर घाईगडबडीत पळत सुटला. बाजूने वाहने येत असल्याचेही भान त्या वेळी त्याच्याकडे नव्हते. यात बसची धडक बसून दीपक आठ ते दहा फूट दूरवर फेकला गेला. यात त्याच्या डोक्‍याला गंभीर जखम झाल्याने त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु त्यांनी घाटी रुग्णालयात पाठविले. अपघातामुळे जालना रस्त्यावर उड्डाणपुलाजवळ मोठी गर्दी जमली होती. वाहतूक पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त बस मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नेण्यात आली असून, तेथे अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 

असा घडला अपघात 
एपीआय कॉर्नरकडून आल्यानंतर रिक्षा सिडको चौकापासून अलीकडे सुमनांजली रुग्णालयाजवळ थांबली. त्या वेळी उजव्या बाजूने दीपक उतरला. यानंतर त्याने चालकाला पैसे दिले व तो रस्ता ओलांडण्यासाठी बेभानपणे नैवेद्य हॉटेलच्या दिशेने पळत सुटला. त्या वेळी एपीआय कॉर्नरकडून सिडको बसस्थानकात जाणाऱ्या बसला तो धडकला. 

दहा फूट घसरत गेला 
अपघात एवढा भयावह होता, की धडक बसताच तरुण आठ ते दहा फूट दूर फेकला गेला. यात तो गंभीर जखमी झाला. लगेचच चालकाने प्रसंगावधान राखून जागीच ब्रेक लावल्याने पुढील अनर्थ टळला. अपघाताचे दृश्‍य पाहून प्रत्यक्षदर्शीही थबकले होते. 

चालकानेच नेले रुग्णालयात 
स्मार्ट बसचे चालक म्हणाले, ""माझ्यासमोर तरुण अचानक आला. मी प्रसंगावधान राखून लगेचच ब्रेक दाबले; परंतु तो खूप जोरात होता. धडक बसल्यानंतर लगेचच बस थांबवून त्याला घाटी रुग्णालयात नेले. हे सांगताना चालकाच्या अंगावरही रक्ताचे डाग दिसून आले.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com