तरुणाचा शाळकरी मुलीवर चाकूहल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

परळी - मैत्रिणींसोबत शाळेत निघालेल्या एका मुलीवर मोपेडवरून आलेल्या तरुणाने चाकूने सपासप वार केले. यात ती गंभीर जखमी झाली. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी हल्लेखोराला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेत तोही गंभीर जखमी झाला. हा प्रकार सोमवारी (ता. 23) सकाळी साडेसातच्या सुमारास घडला.

परळी - मैत्रिणींसोबत शाळेत निघालेल्या एका मुलीवर मोपेडवरून आलेल्या तरुणाने चाकूने सपासप वार केले. यात ती गंभीर जखमी झाली. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी हल्लेखोराला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेत तोही गंभीर जखमी झाला. हा प्रकार सोमवारी (ता. 23) सकाळी साडेसातच्या सुमारास घडला.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः शहरातील सोमेश्‍वरनगर भागात राहणारी मोरांगी (वय 13, बदलेले नाव) इयत्ता आठवीत शिकते. ती सोमवारी सकाळी तिच्या मैत्रिणींसोबत नाथ रोडवरून शाळेत जात होती. दरम्यान, मोपेडवरून आलेल्या सतीश वसंत मंत्रे (वय 25, रा. सोमेश्‍वरनगर, परळी) याने नाथ चित्रमंदिर परिसरात त्यांना गाठले. त्याने रस्त्यावर दुचाकी उभी केली. नंतर डिक्कीतील चाकू काढून मोरांगीवर दोन-तीन वार केले. दरम्यान, तिने प्रतिकार करीत वार चुकविण्याचा प्रयत्न केला. यात तिच्या हातावर व शरीरावर मोठ्या जखमा झाल्यात. या प्रकारामुळे घटनास्थळी असलेल्या इतर मुली घाबरून गेल्या. रक्‍तबंबाळ झालेल्या मोरांगीला परिसरातील नागरिकांनी तत्काळ खासगी रुग्णालयात हलविले. शिवाय हल्लेखोर मंत्रे याला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. या मारहाणीत तोही गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मुलीच्या काकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे मंत्रे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

जुन्या रागातून हल्ला
पीडित मुलीच्या काकाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की मंत्रे याने काही दिवसांपूर्वी मोरांगीची छेड काढली होती. त्या वेळी त्याला समज दिली होती. याच रागातून त्याने हा हल्ला केला, असा आरोप त्यांनी केला. त्याआधारे पोलिसांनी मंत्रे याच्याविरुद्ध बाल अत्याचार कायदा; तसेच भादंवि 307, 326, 354, 504 कलमांन्वये गुन्हा दाखल केला.

पोलिसांचा वचक राहिला नाही
परळी शहरात अवैध धंदे बोकाळले आहेत. चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मुलींना छेडछाड करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. शहरात पोलिसांचा धाक राहिला नाही. चिडीमार पथकही कार्यरत नाही. शाळा, महाविद्यालये सुटल्यानंतर व भरताना मुलींना छेडछाड करण्याचे प्रकार सर्रास होत आहेत. शिकवणीच्या ठिकाणीही असे प्रकार घडत आहेत. याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी येथे नागरिकांतून होत आहे.

Web Title: Youth knife attack on the school girls