पैशांच्या देवाणघेवाणीतून तरुणाची दगडाने ठेचून हत्या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

पाटोदा - शहरातील एका 25 वर्षीय तरुणाची पैशांच्या देवाणघेवाणीतून दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून एक संशयित मात्र अद्याप फरार आहे. दरम्यान, शहरामध्ये तणावाचे वातावरण आहे. संतप्त जमावाने दगडफेक करत संशयितांच्या भावाची बुलेट गाडी जाळली आहे. 

पाटोदा - शहरातील एका 25 वर्षीय तरुणाची पैशांच्या देवाणघेवाणीतून दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून एक संशयित मात्र अद्याप फरार आहे. दरम्यान, शहरामध्ये तणावाचे वातावरण आहे. संतप्त जमावाने दगडफेक करत संशयितांच्या भावाची बुलेट गाडी जाळली आहे. 

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ः पाटोदा शहरातील जालिंदर भाऊसाहेब जाधव (वय 25) हा व्यापारी तरुण बुधवारपासून (ता. 22) अचानक बेपत्ता झाला होता. त्याचा सर्वत्र शोध सुरू होता. गुरुवारी (ता.23) पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. त्याचा शोध सुरू असतानाच पोलिसांनी संशयावरून पांडुरंग सुग्रीव कोठुळे, विठ्ठल सुग्रीव कोठुळे (रा. जवळाला, ता. पाटोदा), पांडुरंग मंजेराम खेडकर (रा. थेरला) या तिघांना ताब्यात घेतले असून पोलिसी खाक्‍या दाखवताच त्यांनी या हत्येची कबुली दिली आहे. हत्या पैशांच्या देवाणघेवाणीतून झाल्याचे त्यांनी सांगितले. या सर्वांनी जालिंदर जाधव यास बुधवारी (ता.22) सायंकाळी 5 ते 8 च्या दरम्यान बोलेरोमध्ये (एम.एच.23- ई- 8361) टाकून पाटोदा शहरातील शिवाजी चौकानजीक आडबाजूला नेऊन त्याची दगडाने ठेचून हत्या केली. लगेच त्याचा मृतदेह गाडीत टाकून उस्मानाबाद जिल्ह्यातील ईट ते पाथरूडदरम्यान असलेल्या घाटात रस्त्याच्या कडेला फेकून दिला; तसेच मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी त्याच्या चेहऱ्यावर पेट्रोल टाकून तो जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी नितीन उद्धव बामदळे यांनी पाटोदा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक साहेबराव राठोड पुढील तपास करत आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक अभिजित पाटील व पोलिस निरीक्षक डी. एम. चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. या तरुणाच्या हत्येनंतर पाटोदा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. 

Web Title: youth murder

टॅग्स