तरुणाई ‘पब्जी गेम’च्या विळख्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

‘पब्जीमध्ये आकर्षक व्हिज्युअल्स आणि ॲक्‍शनचा समावेश आहे. ब्लूव्हेल बनविणाऱ्या कंपनीचाच हा खेळ आहे. वेगवेगळे थ्रील, मारधाड दृश्‍यामुळे मुलांची या खेळाला जास्त पसंती मिळत आहे. अशा दृश्‍यांमुळे मुलांमध्ये अग्रेशन, चिडचिड, राग निर्माण होत आहे. त्यामुळे मुलांना मोबाईल खेळण्यास देऊच नका. पुस्तके वाचणे, मैदानी खेळ यांसाठी प्रवृत्त करा. 
- डॉ. प्रवीण तोगडिया, मानसोपचारतज्ज्ञ

औरंगाबाद - दिवसेंदिवस इंटरनेटवर नवनवीन खेळ येत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्याने मुलांचा ऑनलाइन खेळांकडे कल वाढला आहे. मागच्या वर्षी ब्लू व्हेल, पोकेमॉन या खेळांनी मुलांना वेड लागले होते. यावर्षी पब्जी गेमने धुमाकूळ घातला आहे.

स्मार्ट फोनमध्ये स्वस्तात २४ तास इंटरनेट सेवा उपलब्ध झाल्याने तरुणाईत ऑनलाइन खेळांची क्रेझ वाढली आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे तरुणांसह लहान मुले अक्षरशः तहानभूक विसरून यामध्ये व्यस्त असल्याचे चित्र आहे. फक्त शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातील मुलेही ऑनलाइन खेळांच्या आहारी गेल्याचे चित्र दिसत आहे. पब्जीमधील दृश्‍य हिंसक असल्याने त्याचा परिणाम मुलांवर होत आहे. त्यामुळे खेळताना मुलांचा स्वभाव आक्रमक होत आहे. यातून मैदानी खेळांकडे मुलांचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार पालकवर्गातून होत आहे. विशेष म्हणजे शहरात अनेक मुलं रात्र-रात्र जागून ग्रुपने हा खेळ खेळत आहेत.

हे आहेत परिणाम 
  यामुळे मुले अभ्यासापासून दूर जातात
  सतत ऑनलाइनमुळे डोळ्यांचे आजार 
  हिंसकतेचा मुलांवर विपरीत परिणाम
  आई-वडील, भावंडांसोबत वाद
  शैक्षणिक, बौद्धिक पातळी खालावत जाणे 

हे आहेत उपाय
  मार्गदर्शन करणारी पुस्तके वाचण्यास प्रवृत्त करावे
  पालकांनी मुलांशी सतत संवाद साधावा
  मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रवृत्त करणे 
  मोबाईलचा वापर माहिती मिळविण्यासाठी, संपर्क साधण्यासाठीच असतो, हे पटवून देणे 
 मुलांच्या मानसिकतेवर परिणाम झाला तर त्याला समुपदेशकाकडे घेऊन जावे 

Web Title: Youth Pubg Game Addiction Child