Video : भारतात पाऊल ठेवताच सुटकेचा नि:श्वास टाकला

Latur News
Latur News

लातूर : बघता-बघता ‘कोरोना’ने चीनमध्ये थैमान घालायला सुरवात केली. त्यामुळे तिथल्या सरकारने सर्व नागरिकांना घरातच बसून राहण्याच्या सुचना दिल्या. आम्हीही सलग आठ दिवस एकाच रुममध्ये बसून होतो. आता पुढे काय होईल... याची क्षणाक्षणाला भीती वाटत होती. सगळे रस्ते ओस पडलेले होते. विमानांची उड्डाणे बंद करण्यात आली होती. त्यामुळे भारतात परतू की नाही, हा प्रश्न सतत सतावत होता. पण, काही दिवसांनी चीन आणि भारत सरकारने आम्हाला मदतीचा हात दिला. त्यामुळेच भारतात पाऊल ठेवता आले. त्यावेळी अक्षरश: सुटकेचा नि:श्वास टाकला... अशा शब्दांत चीनहून लातूरात परत आलेल्या आशिष गुरमे या विद्यार्थ्याने आपली भावना व्यक्त केली.

आशिष हा चीनमधून दोनच दिवसांपूर्वी लातूरात परत आला आहे. तो तिथल्या हुबे राज्यातील क्शायनिंग शहरातील हुबे युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी या विद्यापीठात एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण करत आहे. वुहानपासून शंभर किलोमीटर अंतरावर हे शहर आहे. हुबेमध्ये ‘कोराना’चा प्रभाव जास्त आहे. त्यातही वुहानमध्ये सर्वाधिक आहे. अशा भीतीदायक आणि चिंताजनक परिस्थितीतून आशिष आणि त्याच्यासोबत असलेले महाराष्ट्रातील इतर सात विद्यार्थी जवळजवळ महिनाभराने भारतात सुखरूप परत आले आहेत.

आपले अनुभव सांगताना आशिष म्हणाला, कोरोना विषाणू रोखण्यासाठी चीनचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पण, सुरवातीला सगळीकडेच भीतीदायक वातावरण तयार झाले होते. त्यामुळे तिथल्या सरकारने घरातून बाहेर पडू नका, असे सर्वांना सांगितले. जीवनावश्यक वस्तू घरातच पुरवल्या जात होत्या. तरीसुद्धा भीतीचे वातावरण कायम होते. रस्ते ओस पडले होते. सगळीकडे कर्फ्यू लागल्यासारखी स्थिती होती. विमानतळावरील सर्व उड्डाणे बंद करण्यात आली होती. आम्हीही इतरांसारखेच वसतिगृहाच्या एका खोलीत बसून होतो. बाहेर पडता येत नव्हते. तेवढ्यात भारतीय नागरिक चीनमध्ये अडकून राहिल्याचे चीन आणि भारतातील सरकारला समजल्यानंतर त्यांनी आम्हाला विशेष विमानसेवा पुरवून सुखरूप मायदेशी पोचवले. दोन टप्प्यांत आम्हा विद्यार्थ्यांसह ६४७ जण भारतात आणले गेले. यासाठी भारत सरकार आणि तेथील दुतावासाची मोठी मदत झाली.

हरियाणात १७ दिवस मुक्काम

भारतात येण्याआधी आमची चीनमध्ये वैद्यकीय तपासणी झाली. भारतात आल्यानंतर सर्वप्रथम हरियाणातील मनेसरमधील मिल्ट्री कॅम्पमध्ये आम्हा सर्वांना १७ दिवस ठेवले गेले. ‘कोरोना’ची लागण झाली आहे का, काही लक्षणे दिसत आहेत का? हे पाहण्यात आले. १४ दिवसांनी लक्षणे आढळून येतात; पण वैद्यकीय तपासणीत तसे काही आढळून आले नाही. पुण्यातील प्रयोगशाळेने तसा अहवाल दिला. त्यामुळे आम्हाला घरी पाठविण्यात आले. मी लातूरातील घरी आल्यानंतर माझ्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद मी शब्दांत सांगू शकत नाही. दोघांचेही डोळे पाणावलेले होते, अशा भावना आशिषने व्यक्त केल्या.

पुढील शिक्षण भारतातच व्हावे

माझे शालेय शिक्षण लातूरातील बंकटलाल लाहोटी शाळेत पूर्ण झाले. बारावीनंतर एमबीबीएससाठी चीनमधील विद्यापीठाकडे अर्ज केला. माझा अर्ज मंजूर झाल्यानंतर मी नोव्हेंबर २०१८ मध्ये चीनला जाण्याचा निर्णय घेतला. माझे आई-वडिल दोघेही शिक्षक आहेत. त्यांनी मला पाठींबा दिला. त्यामुळे जवळपास दीड वर्षांपासून चीनमध्ये शिकत आहे. सध्या मी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला आहे. चीनमधील परिस्थिती सुधारली तर नक्कीच पून्हा तिकडे जायला आवडेल. नाहीतर भारत सरकारने आमच्या शिक्षणाची सोय भारतातच केली आणि पुढील शिक्षण भारतातच दिले तर आम्हा विद्यार्थ्यांना मोलाची मदत होईल, अशी अपेक्षाही आशिष याने व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com