एकावर चाकुने प्राणघातक हल्ला; दोघांना पोलिस कोठडी

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 22 एप्रिल 2019

खूनाच्या गुन्ह्यात माझ्याविरुध्द साक्ष का दिली, याच्या रागावर दोघांनी एकावर सपासप चाकुने वार केले.

नांदेड : खूनासारख्या गंभीर गुन्ह्यात माझ्या विरुध्द साक्ष का दिली म्हणून दोघांनी चाकुने सपासप वार करून एकावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना जयभिमनगर भागात शनिवारी (ता. 20) रात्री 11 च्या सुमारास घडली. या दोन्ही आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्यांना पोलिस कोठडी मिळाली आहे. 

सराईत गुन्हेगार असलेल्या निहाल पाईकराव विरोधात जयभीमनगर भागात राहणाऱ्या चंद्रकांत गौत्तम जोंधळे (वय 20) याने खूनाच्या गुन्ह्यात साक्ष दिली होती. याचा राग मनात धरुन पाईकराव याने शनिवारी (ता. 20) रात्री अकराच्या सुमारास जयभीमनगर भागातील बौध्द विहाराजवळ त्याला गाठले. यावेळी चंद्रकांत जोंधळे यांच्याशी वाद घालून शिविगाळ केली. एवढेच नाही तर त्याच्या जवळ असलेल्या चाकुने श्री. जोंधळेवर सपासप वार केले. डोक्यात, पायावर, मांडीवर आणि नाजूक भागावर जबर घाव घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. जखमीवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात निहाल पाईकराव व त्याचा मित्र सोनु गुंजकर दोघे रा. जयभिमनगर या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर ठाण्याचे गुन्हे शोध पथक प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक करीम पठाण यांनी पळून जाण्याच्या बोतात असलेल्या या दोन्ही आरोपींना त्यांनी अटक केली. फौजदार श्रीदेवी पाटील यांनी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांनी पोलिस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार श्री. कांबळे हे करीत आहेत.  

Web Title: Youth stabbed to death in old rivalry both in police custody