हिमायतबागेत तरुणाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

कर्जबाजारीपणामुळे उचलले टोकाचे पाऊल 

औरंगाबाद - पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यासाठी कर्ज घेतल्यानंतर तरुणाने विष पिऊन आत्महत्या केली. ही गंभीर घटना सोमवारी (ता. चार) सायंकाळी घडली. मंगळवारी (ता. पाच) सकाळी सातच्या सुमारास हिमायतबाग परिसरात हा प्रकार उघडकीस आला. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार रिहान खान जॉंबाज खान (वय 23, रा. औरंगाबाद टाईम्स कॉलनी, कटकटगेट परिसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कटकट गेट भागात एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये रिहान सहायक म्हणून काम करीत होता. स्वत:ची पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यासाठी त्याने कर्ज उचलल्याचे सांगण्यात येत आहे. रक्कम हाती आल्यानंतर मात्र त्याने लॅब सुरु केली नव्हती, त्यामुळे काहींनी पैसे परत मागण्यास सुरूवात केली होती.

सोमवारी सकाळी तो घराबाहेर गेला. दुपारी घरी येत पुन्हा बाहेर पडला. सायंकाळी सहापर्यंत त्याने पैसे घेतलेल्यांना कॉल करुन पैसे उद्या मिळतील असे सांगितले. त्यानंतर त्याने मोबाईल बंद करुन ठेवला. मंगळवारी हिमायतबागेत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना झाडाखाली दुचाकी व बाजुला रिहानचा मृतदेह आढळला. त्यांनी बेगमपुरा पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली. या प्रकरणी बेगमपुरा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth suicide in Himayatbagh