केज तालुक्‍यात तरुणाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील जेसीबी चालक तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली.

केज (जि. बीड) - केज तालुक्‍यातील कळंमआंबा येथील जेसीबी चालक असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. सहा) घडली. बापूसाहेब रामेश्वर इंगळे (वय 19) असे तरुणाचे नाव आहे. 

कळंमआंबा येथील बापूसाहेब रामेश्वर इंगळे याचे पाचवीपर्यंत शिक्षण झाले होते. तो लातूरला जेसीबी चालक म्हणून काम करीत होता. गुरुवारी महालक्ष्मीच्या सणाला गावाकडे कळंमअंबा येथे आला होता. शुक्रवारी सकाळी झोपेतून उठून शेतात गेला. त्याने बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी बापूसाहेब इंगळे याच्या पॅन्टच्या खिशाची झडती घेतली असता आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली वहीची तीन पाने आढळून आली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सापडलेल्या सुसाईड नोटवरून संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक आनंद झोटे यांनी दिली. 

नातेवाइकांनी धमकी दिल्याचा उल्लेख 
बापूसाहेब इंगळे याच्या पॅन्टच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत एका मुलीचे नाव असून त्या मुलीचे प्रेम हे आपल्यावर नसून शेतीवर असल्याचे नमूद केले आहे. त्याचबरोबर तुझी सर्व जमीन आमच्या मुलीच्या नावावर कर नसता तुझ्यावर काहीही आरोप करू, तुला ठार मारून टाकू अशी धमकी तिच्या आई, भाऊ आणि इतर नातेवाइकांनी दिल्याने या धमकीला घाबरून गावाकडे आल्याचे म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth suicide in Kaij