झेंडूफुलांच्या कचऱ्याला शुभेच्छा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद - दसरा आणि झेंडूची फुले यांचे मोठे महत्त्व. घर-अंगण सजविण्यापासून ते अगदी वाहनांपर्यंत झेंडूचा वापर होतो. त्यामुळे मागणी मोठी असते. ती पूर्ण करण्यासाठी रात्र जागून रस्त्याच्या कडेला बसलेल्या विक्रेत्यांच्या नशिबी काय आले, तर फुले फुटपाथवर अन्‌ चक्क कचऱ्यात फेकून त्यांना परतावे लागले. झेंडूच्या फुलांनी चक्क कचऱ्याला शुभेच्छा दिल्याचे चित्र शहरभर होते. फूलविक्रेता आणि कचरा वेचणारे गरीबच असतात. या गरिबांच्या हातांनीच श्रीमंतांची घरे सजतात. घरोघरी दसरा आनंदाने साजरा होत असताना या गरिबांना चिंता होती ती घरी चूल पेटलीय की नाही याची.

औरंगाबाद - दसरा आणि झेंडूची फुले यांचे मोठे महत्त्व. घर-अंगण सजविण्यापासून ते अगदी वाहनांपर्यंत झेंडूचा वापर होतो. त्यामुळे मागणी मोठी असते. ती पूर्ण करण्यासाठी रात्र जागून रस्त्याच्या कडेला बसलेल्या विक्रेत्यांच्या नशिबी काय आले, तर फुले फुटपाथवर अन्‌ चक्क कचऱ्यात फेकून त्यांना परतावे लागले. झेंडूच्या फुलांनी चक्क कचऱ्याला शुभेच्छा दिल्याचे चित्र शहरभर होते. फूलविक्रेता आणि कचरा वेचणारे गरीबच असतात. या गरिबांच्या हातांनीच श्रीमंतांची घरे सजतात. घरोघरी दसरा आनंदाने साजरा होत असताना या गरिबांना चिंता होती ती घरी चूल पेटलीय की नाही याची.

फुले ही टवटवी देणारी, मन प्रसन्न करणारी आणि आरोग्यदायीही असतात. त्यामुळेच ती पाहताक्षणी घ्यावीशी वाटतात आणि सजावटीत समाविष्ट होतात. अन्य दिवशी किरकोळ फुले घेणारे दसऱ्याला मात्र झेंडूची उदारपणे खरेदी करतात. ही संधी समजून स्थानिकांसह मराठवाडा, राज्याच्या अन्य भागांतून शेतकरी, विक्रेत्यांनी औरंगाबादेत धाव घेतली. जागा कुठे मिळवावी, यासाठी बुधवारी तर या विक्रेत्यांची तारांबळ उडाली होती. जागा निश्‍चित होताच प्रतीक्षा होती ती संधीचे सोने करण्याची. मात्र भाव मातीमोल करूनही कुणी घेत नसल्याचे पाहून अनेकांना रित्या हाताने, मोठा तोटा सहन करीत काढता पाय घ्यावा लागला. 

दसऱ्याला चांगला दर मिळेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली. दुष्काळी परिस्थितीत पाण्याची काटकसर करून झेंडूची शेती जगविली. गेल्या तीन-चार दिवसांत मोठी मजुरी देऊन काढणी केली. तेवढाच वाहतूक खर्च करून शहरे गाठली. औरंगाबादमध्ये प्रचंड आवक झाली. काल विक्री सुरू करताच बऱ्यापैकी दराचे भाग्य थोडक्‍यांनाच मिळाले. आज दर किती पडतोय, याचीच स्पर्धा रंगली. तिची अखेर फुले फेकण्यात झाली.
सिडको बसस्थानक, सिडको कार्यालय, गजानन महाराज मंदिर, टीव्ही सेंटर, शिवाजीनगर आदींसह शहराच्या बहुतांश भागांत आज दुपारी हे चित्र होते. अनेकांनी पिशव्या भरून ही फुले नेली. 

प्रचंड आवक
औरंगाबाद बाजार समितीत काल ८८७ क्विंटल झेंडूच्या फुलांची आवक झाली. आजही ती वाढतीच होती. शिवाय शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने रस्त्याच्या कडेला फुलांची दुकाने थाटली होती. काल फुलांना सर्वाधिक ६० रुपये प्रतिकिलो असा दर मिळाला; मात्र आवक वाढत राहिल्याने याचा दर ३० रुपयांपर्यंत घसरला. दसऱ्याच्या दिवशी हाच दर प्रतिकिलो दहा रुपयांवर आला. दुपारी दोननंतरही फुलांची विक्रीच होत नसल्याने शेतकरी आणि व्यापारी मेटाकुटीला आले. ना फुलांची विक्री होईना, ना माळांना कुणी विचारेना अशी स्थिती असल्याने शेतकऱ्यांनी फुले रस्त्याच्या कडेला सोडून घरी जाणे पसंत केले. कित्येक शेतकऱ्यांची फक्त निम्मीच फुले विक्री झाली.

मोठे नुकसान
यावर्षी दुष्काळी परिस्थितीत विहिरींना पाणी कमी असतानाही शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांची लागवड करून ती जगविली; मात्र इतर जिल्ह्यांमधून फुलांची आवक अतिशय जास्त झाल्याने रस्त्याच्या कडेला सगळीकडे फुलेच फुले अशी स्थिती दिसून आली. यावर्षी शेतकऱ्यांना ३० रुपये प्रतिकिलो अशा दरानेसुद्धा फुले विकता आली नाहीत. कित्येक क्विंटल फुलांची केवळ दहा रुपये प्रतिकिलोने विक्री करावी लागली.

अनेकांनी काढली सेल्फी 
सिडको बसस्थानक रोड, सिडको कार्यालयासमोरच्या परिसरातील फुटपाथवर झेंडूच्या फुलांचा खच पडला होता. चांगली असलेली फुले अनेकांनी गाड्या थांबवून नेली, तर कित्येक तरुणांनी या फुलांमध्ये झोपून सेल्फी काढली. झेंडूच्या फुलांची आवक एवढी जास्त होती की रात्रीपर्यंत या फुलांचे ढीग कायम होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zendu Flower Loss Garbage