हॉटेलमधील जेवणावर लातूरकरांचा घरबसल्या ताव

सुशांत सांगवे
बुधवार, 24 एप्रिल 2019

दिवसाला बाराशे ते दीड हजार लातूरकर ‘झोमॅटो’च्या माध्यमातून घरबसल्या हवे ते, गरमागरम आणि तेही स्वस्तात अन्नपदार्थ मागवत आहेत. विशेष म्हणजे, या सेवेमुळे शहरातील शंभरहून अधिक तरुणांना रोजगार मिळाला आहे.

लातूर : नोकरी, शिक्षण, त्यामुळे न मिळणारा वेळ अशा वेगवेगळ्या कारणांमुळे पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांत हॉटेलमधील जेवण घरी मागवण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात आहे. ती ‘क्रेझ’ आता लातूरसारख्या लहान शहरातही वाढू लागली आहे. त्यामुळे दिवसाला बाराशे ते दीड हजार लातूरकर ‘झोमॅटो’च्या माध्यमातून घरबसल्या हवे ते, गरमागरम आणि तेही स्वस्तात अन्नपदार्थ मागवत आहेत. विशेष म्हणजे, या सेवेमुळे शहरातील शंभरहून अधिक तरुणांना रोजगार मिळाला आहे.

आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा हॉटेलमध्ये जेवायला जाणाऱ्या अनेक फॅमिली आपल्याला पहायला मिळतात. पण बऱ्याचदा हॉटेलात जाणे शक्य होत नाही. म्हणून घरातच हॉटेलमधील पदार्थ आणले जातात. अशांच्या मदतीसाठी देशातील जवळपास सर्व प्रमुख शहरांत असलेल्या ‘झोमॅटो’ या फुड डिलेव्हरी कंपनीची सेवा आता लातूरात सुरू झाली आहे. शहरातील शंभर हॉटेल या कंपनीशी जोडले गेले असून दिवसाला दीड हजार लातूरकर घरबसल्या हवे ते अन्नपदार्थ ‘झोमॅटो’च्या माध्यमातून मागवत आहेत.

‘झोमॅटो’चे व्यवस्थापक श्रीकांत पडाेळे म्हणाले, ‘‘लातूरात ‘झोमॅटो’ची सेवा सुरू करून बराेबर एक महिना झाला. या कालावधीत लातूरकरांचा प्रतिसाद दररोज वाढत असल्याचेच दिसून आले. हे प्रमाण पुढच्या एक-दोन महिन्यांत आणखी वाढलेले दिसेल. सध्या महाविद्यालय, क्लास, हॉस्टेल, ऑफिसमधून अन्नपदार्थ मागविण्याचे प्रमाण जास्त आहे. पण रविवारी घरगुती डिलेव्हरी जास्त असतात. त्यांना वेळेत अन्नपदार्थ मिळावे यासाठी शंभर जणांची तरुणांची टीम कार्यरत अाहे. या तरुणांना महिन्याला बारा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत कंपनीतर्फे पगार मिळतो.’’ वाटेतच अन्न खाल्ल्याचे प्रकार काही शहरात घडले आहेत. या पाश्‍वभूमीवर, अन्नपदार्थ विशिष्ट प्रकारे पॅकिंग करूनच आम्ही देत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

लवकरच ‘स्विगी’ येतेय

अन्नपदार्थ मागविण्यासाठी ‘झोमॅटो’चे अॅप डाऊनलोड करून घ्यावे लागेल. त्यावर हॉटेलची आणि तेथील पदार्थाची यादी पहायला मिळेल. त्यानूसार अन्नपदार्थ मागविता येतात. त्यासाठी ऑनलाईन पेमेंट आणि कॅश ऑन डिलेव्हरी हे दोन्ही पर्याय देण्यात अाले आहे. सध्या कोणत्याही अन्नपदार्थावर ४० टक्के सवलत दिली जात आहे. दरम्यान, झोमॅटोसारखी ‘स्विगी’ या फुड डिलेव्हरी कंपनीचीही सेवा येत्या दोन-चार दिवसांत लातूरात सुरू होणार आहे. त्यामुळे आणखी शंभरहून अधिक तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे, अशी माहिती स्विगीचे व्यवस्थापक चेतन जाधव यांनी सांगितले.

Web Title: Zomato gives jobs more than 100 in latur