झेडपीसाठी भाजप ताकही फुंकून पिणार!

झेडपीसाठी भाजप ताकही फुंकून पिणार!

पालिका निवडणुकीत पोळल्याने युतीसाठी ‘भाजप हात बढाओ’

बीड - पालिका निवडणुकीत पालकमंत्री पंकजा मुंडेंना होमपिचमध्येच पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पोळलेल्या भाजपची जिल्हा परिषद निवडणुकीत ताकही फुंकून पिण्याची मानसिकता झाली आहे. परिणामी युती करण्यासाठी भाजपने हात बढाओचा छुपा नारा दिला आहे. तर राष्ट्रवादी नेत्यांच्या आघाड्या झेडपी निवडणुकीतही उतरण्याची चिन्हे आहेत. तसा तीनही पक्षांना याचा फायदा आहे.

मागच्या वेळी भाजप युती असतानाही जिल्हा परिषद ताब्यात आली नव्हती. रमेश आडसकर समर्थक सदस्यांसह भाजपात आले; पण नशिबाने दगा दिला आणि पुन्हा हातातोंडाशी आलेली झेडपीची सत्ता राष्ट्रवादीकडेच राहिली. त्यानंतर राज्यात भाजपची सत्ता आणि पंकजा मुंडेंकडे ग्रामविकास खाते आल्यानंतर योगायोगाने राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस वाढली. यातून अविश्‍वास ठरावाच्याही हालचाली झाल्या. 

पण, ही संधीही भाजपला साधता आली नाही. दरम्यान, पालिका निवडणुकीत युतीचा गोंधळ झाला. तसे, बीडमध्ये युतीसाठी विनायक मेटे सकारात्मक होते. पण, शिवसंग्रामची ‘जिरवायचीच’ अशी भाजपची मानसिकता होती. या खेळीत भाजप, शिवसेना आणि शिवसंग्रामचीही जिरली. अशा ‘अडवा अन्‌ जिरवा’च्या खेळीचा खरा फटका परळीत भाजपला बसला. त्यामुळे आता ग्रामविकास खाते स्वत:कडे असताना जिल्हा परिषद ताब्यात न येणे पंकजा मुंडेंना राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही. तसे शिवसेना व शिवसंग्राम जिल्हा परिषदेच्या ६० पैकी किती जागा लढवेल व जिंकेल यापेक्षा भाजपच्या काही जागा पाडण्याचे ‘उपद्रवमूल्य’ दोन्ही पक्षांकडे आहे. त्यामुळे सर्व अंदाज बांधत झेडपीसाठी भाजपने युतीची मानसिकता केली आहे. 

‘रिस्क’पेक्षा युतीच बरी 
मागच्या वेळी परळी, केज या दोन मतदारसंघातून भाजपने चांगल्या जागा जिंकल्या होत्या. आता माजलगाव, आष्टी, गेवराई व केज या मतदारसंघात भाजपचे आमदार असले तरी आमदार भीमराव धोंडे सोडता खात्रीने झेडपी मेंबर विजयी करूच अशी शाश्‍वती इतर आमदारांकडे नाही. त्यामुळे जास्त रिस्क घेण्यापेक्षा युतीच बरी अशी भाजपची मानसिकता आहे.  

जाचक अटी अन्‌ इगो
युती केली तर भाजप, शिवसंग्राम आणि शिवसेना या तिघांच्याही हिताचे आहे. पण, पंकजा मुंडे आणि विनायक मेटेंमध्ये विस्तव आडवा जात नाही. त्यांनी स्वत:हून बोलावे अशी दोघांचीही मानसिकता आहे. त्यातूनही काही मार्ग निघालाच तरी बीड मतदारसंघातील जागावाटपावर घोडे अडणार आहे. ‘आमचीच ताकद जास्त’ अशी तिन्ही पक्षांची मानसिकता आहे. त्यामुळे काही नेत्यांकडून दुसऱ्या पक्षाची ताकद असलेल्या जागांवर दावा होण्याची चिन्हे आहेत.

आघाड्यांकडूनही पुन्हा दंड-बैठका
गेवराईसाठी बदामराव पंडित व माजलगासाठी मोहन जगताप यांच्याकडून मित्रमंडळाच्या माध्यमातून आगामी विधानसभेची पायाभरणी सुरू होती. तोच प्रयोग त्यांनी पालिका निवडणुकीतही केला. तर, बीडमध्ये ‘काका - पुतण्या’ अंकातून सभापती संदीप क्षीरसागर यांनीही आघाडीच्या माध्यमातून ताकद अजमावली. गेवराई वगळता दोन्ही ठिकाणी आघाड्यांना चांगले यश आले. गेवराईत श्री. पंडित व माजलगावमधून श्री. जगताप आघाड्या रिंगणात उतरवणार, हे निश्‍चितच आहे. तर, बीडमध्येही पालिकेत दोन्ही मातब्बर चुलते समोरच्या बाजूने असतानाही काकू-नाना आघाडीने चांगले यश मिळवल्याने समर्थकांचे मनोबल वाढलेले आहे. त्यामुळे आगामी झेडपीही आघाडीकडूनच लढवावी, असा मतप्रवाह आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com