गाडी अंगावर घातली अन् नंतर माफी मागितली..!

विकास गाढवे
गुरुवार, 12 जुलै 2018

मागील काही दिवसात त्यावरून जिल्हा परिषदेत धुसपूस सुरू आहे. यातच अभियंत्याला लातूर व रेणापूर तालुका देण्यास विरोध करणाऱ्या एका जिल्हा परिषद सदस्याच्या अंगावर अभियंत्याने  आपली चारचाकी गाडी घातली. जिल्हा परिषदेच्या पंपहाऊस जवळ सदस्य उभारलेले असताना हा प्रकार घडला.

लातूर : जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंत्याने जिल्हा परिषदेच्याच एका सदस्याच्या अंगावर चारचाकी वाहन नेले. प्रसंगावधान राखून सदस्याने आपला जीव वाचवला. मागील आठवड्यात घडलेल्या या घटनेवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे यांच्या कक्षात बुधवारी (ता. ११) चर्चा झाली. लातूरे यांनी संबंधित अभियंत्याला जाब विचारला. त्यावर खड्डा चुकवताना गाडी चुकून अंगावर गेल्याचे सांगत त्याने माफी मागितली आणि या विषयावर पडदा पडला. यात ज्या विषयावरून हा प्रकार घडल्याचा सदस्यांचा आरोप होता. त्या विषयात शेवटी अभियंत्यानी बाजी मारल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विविध स्वरूपाची विद्युतीकरणाची कामे करण्यात येतात. मागील काही वर्षात या कामाचे मूल्यांकन करणाऱ्या अभियंत्याच्या वर्तनावरून सदस्यांना सतत शॉक बसत आहे. जिल्ह्यात या कामाचे मूल्यांकन (मोजमाप) करणारे दोनच अभियंते आहेत. यामुळे अभियंत्याकडील तालुक्यांची सातत्याने अदलाबदल सुरू असते. अभियंता विरूद्ध पदाधिकारी असे शॉटसर्किट सातत्याने जिल्हा परिषदेत सुरू असते. त्याची झळ कामांसोबत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांतील सुसंवादाला बसते.

पदाधिकाऱ्यांचे न ऐकल्यास संबंधित अभियंत्याकडून तालुका काढून घेण्याची मागणी सुरू होते. यातूनच एका अभियंत्यांकडील तालुके सातत्याने बदलले जातात. लातूर आणि रेणापूर तालुका एका अभियंत्याकडे देऊ नये, अशी मागणी काही सदस्यांनी केली आहे. अभियंत्याच्या पूर्वीच्या वर्तनावरून त्याला काही पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. 

मागील काही दिवसात त्यावरून जिल्हा परिषदेत धुसपूस सुरू आहे. यातच अभियंत्याला लातूर व रेणापूर तालुका देण्यास विरोध करणाऱ्या एका जिल्हा परिषद सदस्याच्या अंगावर अभियंत्याने  आपली चारचाकी गाडी घातली. जिल्हा परिषदेच्या पंपहाऊस जवळ सदस्य उभारलेले असताना हा प्रकार घडला. या सदस्याने आपल्या गटनेत्यासह अधिकाऱ्यांना हा प्रकार सांगितला. मात्र, त्यावर कारवाई झाली नाही. शेवटी या सदस्याची बाजू उचलून धरत अनेक सदस्यांनी बुधवारी अध्यक्ष लातूरे यांच्याकडे कारवाईची मागणी केली. यावेळी सदस्याने त्याच्यावर गुजरलेला प्रसंग कथन केला. त्यावर लातूरे यांनी मोबाईलवरूनच अभियंत्याला जाब विचारला. त्यावर त्याने खड्डा चुकवताना गाडी सदस्याच्या अंगावर गेल्याचा खुलासा करून झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. त्यावर चर्चा होऊन घटनेवर पडदा टाकण्यात आला.

या स्थितीत विरोध असतानाही संबंधित अभियंत्याला लातूर आणि रेणापूर तालुक्याची जबाबदारी देण्यात आली. सदस्याच्या तक्रारीवरून अभियंत्याची चौकशी करण्याचेही आदेश दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, या घटनेमुळे विरोधी सदस्यांत तीव्र नाराजी व्यक्त असून, अभियंत्याला नेमके पाठबळ कोणाचे, हा प्रश्नही सदस्यांना सतावत आहे.

Web Title: ZP Member and ZP Engineer Clashes