बोगस तुकड्यांवरील शिक्षकांचे होणार समायोजन

School-Teacher
School-Teacher

लातूर - गेल्या तीन चार वर्षांपासून जिल्ह्यात गाजत असलेल्या बोगस तुकडी प्रकरणात राज्य शासनाने ‘गुरुजीं’ना दिलासा देण्याचे ठरवले आहे. यातून या बोगस तुकड्यांवर काम करणाऱ्या शिक्षकांचे समायोजन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शासनाने जिल्ह्यातील ५२ शाळांतील बोगस तुकड्यांवर किती शिक्षकांचे समायोजन करणे आवश्‍यक आहे, याची शाळानिहाय यादी मागविली आहे. त्यामुळे उपासमारीची वेळ आलेल्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. 

गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात या बोगस तुकड्यांचे प्रकरण गाजत आहे. या प्रकरणी माजी सहायक प्रकल्प अधिकारी व्ही. एम. भोसले न्यायालयात गेले होते. जिल्ह्यातील विविध ९९ शाळांनी बेकायदेशीररीत्या २६२ तुकड्या घेऊन त्यावर ३६९ शिक्षकांची नियुक्ती केली. यात शासनाची सहा कोटी ५८ लाख ९७ हजार ९९० रुपयांची फसवणूक केल्याचे त्यांनी न्यायालयात मांडले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणात तत्कालीन पाच शिक्षणाधिकारी, १३ कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील ९९ शाळांचे अध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापक असे एकूण ३२७ जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ऑगस्ट २०१७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे.

दरम्यानच्या काळात ९९ पैकी ५२ शाळांमध्ये नव्याने तुकड्या घेण्यात आल्या. या ५२ पैकी ३८ शाळामध्ये मुलांची पटसंख्या जास्त होती. त्यामुळे या संस्थाचालकांनी शासनाकडे धाव घेतली होती. यात शासनाने या शाळांच्या तुकड्यांना कायम विनाअनुदानित करून टाकले होते. शासन समायोजन करीत नाही, संस्थाचालक पगार देत नाही. यात दीडशे शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली होती. हे लक्षात आल्यानंतर राज्य शासनाने आता या शिक्षकांचे समायोजन करण्याचा विचार सुरू केला आहे. यातूनच या ५२ शाळांमधील किती शिक्षकांचे समायोजन करणे आवश्‍यक आहे, त्यांची संख्या व शाळानिहाय शिक्षकांची नावे; तसेच उपरोक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण होण्याकरिता कोणते निकष आवश्‍यक ठरतील याबाबची माहिती पंधरा दिवसांच्या आत शासनास व शिक्षण संचालनालयास सादर करावी, असे आदेश शिक्षण उपसंचालक व्ही. के. खांडके यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. शासनाने समायोजनाच्या हालचाली सुरू केल्याने या शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com