झेडपीच्या शाळा टाकताहेत कात 

झेडपीच्या शाळा टाकताहेत कात 

पाटोदा/गेवराई - जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात अडीच हजारांपर्यंत शाळा आहेत. झेडपीच्या शिक्षकांच्या वागण्यांची उदाहरणे समोर आल्याने समाजात नकारात्मक भावना तयार झाली आहे. तर, दुसरीकडे पूर्ण क्षमतेने झोकून देऊन इंग्रजी माध्यमांच्या शाळांनाही मागे टाकतील अशा शाळा झाल्या आहेत. 

सरत्या आठवड्यात शिक्षकांमुळे झेडपीच्या शाळांची दोन रूपडे समोर आली. अगदी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी तालुक्‍याच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर दुपारच्या वेळेत शाळेला कुलूप आढळले. तर, याच दरम्यान, शिक्षकांच्या पुढाकाराने तांड्यावरच्या शाळेतील ऊसतोड मजुरांची मुले विमानाने थेट सचिवांच्या भेटीला गेली. 

मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी बुधवारी (ता. 31) पाटोदा येथील शाळांना भेटी दिल्या. शहरात जिल्हा परिषदेच्या पाच शाळा असून, यातील तीन शाळांमध्ये शिक्षकांची मनमानी त्यांनाच डोळ्याने पाहावी लागल्याने या शिक्षकांना सुनावणीदरम्यान सीईओंनी पैलावर घेतल्याची माहिती आहे. घडले असे, पाटोद्याच्या माध्यमिक शाळेत विद्यार्थी 20 आणि शाळा खोल्या 26 असा अजब प्रकार आहे. विशेष म्हणजे दोन शिक्षक, दोन शिपाई, एक क्‍लार्क, एक लॅब असिस्टंट असे भरपूर मनुष्यबळ असलेली शाळा दुपारी दीड वाजता कुलूपबंद आढळली. सुनावणीत "महिन्याचा शेवटचा दिवस असल्याने अर्धवेळ शाळा होती' असे अजब उत्तरही शिक्षक मंडळींनी दिले. तर, क्रांतीनगर शाळेतही पोषण आहाराचे धान्य उघड्यावर, शाळेत अस्वच्छता, एका शिक्षकाची दांडी आढळून आली. याच शहरातील भट गल्लीतल्या शाळेतही सहा शिक्षक आणि एक मुख्याध्यापक असताना 14 ऑक्‍टोबरला 82 विद्यार्थ्यांचा असलेला पट सहाने कमी कसा झाला, हे शिक्षक मंडळींनाच सांगता येत नाही. एकूणच शहरातील शिक्षणाचा या शिक्षकांनी केलेला खेळखंडोबा पाहून सीईओंनी त्यांची सुनावणी घेतली आहे. आता पुढील कारवाईकडे पाटोद्यातील शिक्षणप्रेमींचे लक्ष लागले आहे. 

तांड्यावरची पोरं विमानाने सचिवांच्या भेटीला 
जिल्हा परिषद शाळांचे रूपडे आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक मंडळी झटत असून, त्यास यश येत असल्याचे गेवराई तालुक्‍यात दिसून आले. आठच दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पहिली केंद्रांची शिक्षण परिषद येथे शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण काळम यांच्या पुढाकाराने झाली. आता त्यांच्या प्रेरणेने तांड्यावरच्या शाळेतील शिक्षकांनाही हुरूप आला असून, शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना नवनवे धडे शिकविण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत आहेत. असाच अनोखा प्रयोग या तालुक्‍यातील पोईतांडा येथे झाला. शिक्षकांनी पुढाकार घेतला आणि विमानाने मुंबईला सहल काढायचा प्रस्ताव पालक आणि शिक्षण समितीसमोर ठेवला. पालकांनी आपापल्या ऐपतीने पैसे दिले, तर शिक्षण समिती सदस्यांनीही या शैक्षणिक उपक्रमास मदत केली. शिक्षक लक्ष्मण सोनवणे व सहशिक्षिका श्रीमती जोगदंड यांच्या पुढाकाराने बुधवारी (ता. 31) रात्री औरंगाबाद येथून नऊ विद्यार्थी विमानाने मुंबईला रवाना झाले. मुंबईत नेहरू तारांगण, वरळीचा सी-लिंक हा पूल पाहिला. दरम्यान, शिक्षण क्षेत्राची ओढ कायम असलेले या विभागाचे तत्कालीन सचिव नंदकुमार यांनीही या उपक्रमाने भारावत मुलांसोबत जेवण-नाष्टा तर केलाच. शिवाय प्रत्येक विद्यार्थ्यासोबत प्रश्नोत्तरेही केली. विशेष म्हणजे ठरलेल्या वेळेपेक्षा सहलीतल्या विद्यार्थी व शिक्षकांना पोचायला अर्धातास उशीर लागूनही नंदकुमार या विद्यार्थ्यांची वाट पाहत होते. राज्याचा राजशिष्टाचार असा महत्त्वाचा विभाग असलेल्या या अधिकाऱ्याने या विद्यार्थ्यांना एक तासाचा वेळ दिला. 

पालक ऊसतोडणीला 
नऊ विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थ्यांचे पालक ऊसतोडणीला गेलेले आहेत. मात्र, शिक्षकांचा पुढाकार आणि त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांमुळे शिक्षणप्रेमींनी या सहलीला मदत केली आणि तांड्यावरच्या विद्यार्थ्यांना नवे जग पहायला मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com