स्पेस कॅम्प

आदित्य जावडेकर
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

काउंट-डाउन सुरू झाला. काळजाचे ठोके स्पष्ट ऐकू येऊ लागले... आणि आमचे "यान' उडाले.

काउंट-डाउन सुरू झाला. काळजाचे ठोके स्पष्ट ऐकू येऊ लागले... आणि आमचे "यान' उडाले.

"नासा'च्या "स्पेस कॅम्प'साठी आम्हा विद्यार्थ्यांची निवड झाली होती. सुदेष्णा मॅडम, मंदीप सर आणि आमच्या प्राचार्यांसोबत आम्ही निघालो. सुमारे अठरा तासांचा प्रवास करून, फ्रॅंकफर्टला विमान बदलून आम्ही अटलांटाला पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आमचे काम सुरू झाले. "यू. एस. स्पेस ऍण्ड रॉकेट सेंटर'चे नवे जग आता आमच्यासमोर होते. परिचय झाल्यानंतर कॅम्पचे नियम, तपशील समजावून देण्यात आले. "टीम अल्डेबरान' आणि "टीम ऑलटेअर' अशा दोन गटांत आम्ही विभागले गेलो. बेन शेफर्ड हे आमच्या "टीम अल्डेबरान'चे प्रशिक्षक होते. रॉकेट अवकाशात उडाल्यानंतर अंतराळवीरांना जो अनुभव येतो, तो अनुभव आम्ही "जी फोर्स राइड'मध्ये घेतला. अंतराळवीर अवकाशात राहतात कसे, याचे प्रात्यक्षिक पाहिले. आता आम्ही प्रत्यक्ष रॉकेट बनवण्याच्या कामात गढलो. दरम्यान, "झिरो ग्रॅव्हिटी'चा अनुभव घेतला. आपले अस्तित्व जाणवू नये इतके अलगद विहरत होतो.

पुन्हा सकाळी धावत-पळत तयार झालो. म्युझियम गॅलरी पाहिली. स्पेस क्रॉफ्ट्‌स, रॉकेट्‌स, चंद्रावर जाऊन आलेली याने, अंतराळवीरांचे पोषाख पाहायला मिळाले. आता आमचे रॉकेट "लॉंच' होणार होते. आमच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची तीन ठिकाणे होती. कंट्रोल रूम, स्पेस क्रॉफ्ट आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. मी कंट्रोल रूममध्ये होतो. माझे काम जी. एन. सी. (गायडन्स नेव्हिगेशन अँड कंट्रोल इंजिनिअर) चे होते. मी हवामान, यानाचा मार्ग, जाण्याचे व उतरण्याचे ठिकाण याविषयी माहिती मायक्रोफोनमधून देत होतो. "प्री फ्लाइट चेक्‍स' झाला. काउंट-डाउन सुरू झाला.

काळजाचे ठोके स्पष्ट ऐकू येऊ लागले... आणि आमचे "स्पेस क्रॉफ्ट' उडाले. तो अनुभव विलक्षण होता. "डेस्टिनेशन'- आयएसएस येथून आमच्या अंतराळवीरांनी काही नमुनेही आणले. यान खाली उतरताना काही तरी अडचण आली. आता आमचाही श्‍वास अडकला. पण आम्हाला ट्रबल शूटिंगसाठी टिप्स दिल्या गेल्या आणि यान व्यवस्थित उतरले. मिशन सक्‍सेसफुल! नंतर अमेरिकेतील आणखीही काही गोष्टी पाहिल्या. पण, मनात अजून रेंगाळत आहेत ते स्पेस कॅम्पमधील क्षणच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aaditya jawdekar write article in muktapeeth