मुंबईतील गर्दीवर एक उपाय

 आशीष प्रभुदेसाई, देवरूख मो. ९४२२१९२१५९
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

प्रत्येक आपत्तीनंतर झटपट जीवन पुन:र्स्थापित करण्याचे मुंबईकरांचे स्पिरिट आश्‍चर्यकारक आहे. मुंबईत खरोखर इतक्‍या माणसांची गरज आहे का? किंवा का आहे? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. या विचारातून दहा टक्के लोक स्थलांतरित होऊ शकतील. 

प्रत्येक आपत्तीनंतर झटपट जीवन पुन:र्स्थापित करण्याचे मुंबईकरांचे स्पिरिट आश्‍चर्यकारक आहे. मुंबईत खरोखर इतक्‍या माणसांची गरज आहे का? किंवा का आहे? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. या विचारातून दहा टक्के लोक स्थलांतरित होऊ शकतील. 

आमच्या कंपनीचे (ॲडलर) ऑफिस आणि गोदाम मुंबईला होते. काही वर्षांपूर्वी आम्ही गोदाम देवरूखजवळील आमच्या कारखान्याजवळ हलविले. इथे धड कुरिअर सेवाही नाही, कसे काय जमणार असे वाटले. पण, व्यवस्थापनाने धाडसी निर्णय घेतला. त्याचा काहीही विपरित परिणाम व्यवसायावर झाला नाही. मुंबईत बापजन्मी शक्‍य नाही एवढ्या प्रमाणात आम्ही गोदामाची जागा वाढवली. देवरूखला स्पीडपोस्टची सुविधा नव्हती; पोस्टाने स्वत: आपली मार्केटिंग टीम आमच्या व्यवस्थापनाच्या भेटीला पाठवली आणि आम्हाला हवी तशी सोय करून दिली.

वेगवेगळ्या कुरिअर कंपन्यांनीही कंपनीला हव्या त्या सुविधा दारात उपलब्ध करून दिल्या. यावरून योग्य विचार आणि नियोजन करून परिस्थिती बदलता येईल. आमच्यासारख्या मध्यम उद्योगाला हे शक्‍य झाले तर मोठ्या कॉर्पोरेट हाउसेसना नक्कीच शक्‍य होईल. मुंबईत हातपाय हलविले की कोणीही आरामात पोट भरू शकतो, असे म्हणतात. ही सत्यस्थिती असली तरी मुंबईतच हे शक्‍य आहे का? दुसरीकडे नाही का? आणि नसेल तर का नाही? याचा विचार व्हायला हवा. ‘येवा कोकण आपलाच असा’ असं म्हणून उद्योजकांनाही बोलावलं पाहिजे. पिंपरी-चिंचवड, हिंजेवाडी ही गावं पहिल्यांदा कशी होती आणि आता काय आहेत? त्याचं कारण काय? याचा विचार व्हायला हवा. 

मुंबईचं आकर्षण असलेल्या तरुण पिढीला याची जबाबदारी घ्यावी लागेल. मी माझ्या गावातच कामधंदा निर्माण करून मुंबईतल्या चाकरमान्यांना गावाकडे परत यायला भाग पाडेन, हे ध्येय ठेवून आपलं आणि आपल्याबरोबर आणखी चार जणांचं जीवन सुखी करेन, असा विचार जेव्हा रुजेल तेव्हाच ही चेंगराचेंगरी थांबेल. 
 

Web Title: Aashish Prabhudesai writes in Muktapeeth