स्वप्नातल्या देशात....

अनघा पाठक
गुरुवार, 17 मे 2018

स्वित्झर्लंड हा पर्यटकांना नेहमीच खुणावणारा देश आहे. एरवी चित्रपटातून घडणारे तेथील निसर्गसौंदर्याचे दर्शन प्रत्यक्ष अनुभवताना होणारा आनंद वेगळाच असतो.

स्वित्झर्लंड हा पर्यटकांना नेहमीच खुणावणारा देश आहे. एरवी चित्रपटातून घडणारे तेथील निसर्गसौंदर्याचे दर्शन प्रत्यक्ष अनुभवताना होणारा आनंद वेगळाच असतो.

विमान जसजसे स्वित्झर्लंडच्या जवळ जायला लागले तसे तिथल्या सौंदर्याचा प्रत्यय यायला लागला. विमानातून खाली बघितल्यावर निसर्गाचे विलोभनीय दृश्‍य खुणावू लागले होते. स्वित्झर्लंड सहलीची सुरवात आम्ही टिटलीस माउंटेनपासून केली. दहा हजार फूट उंचीवरचे हे बर्फाच्छादित शिखर. येथे पोचण्यासाठी दोन टप्प्यांमध्ये केबलकारने जावे लागले. केबलकारने उंचीवर जाताना दिसणारे दृश्‍य म्हणजे, जसे परमेश्‍वराने एखादे सुंदरसे निसर्गचित्र आपल्यासाठीच रेखाटलेले आहे असे वाटले. माउंटनवर पोचल्यावर आपण अगदी ढगात असण्याचा अनुभव आला. सगळीकडे शुभ्र पांढरा भुसभुशीत बर्फ, त्यावर धुक्‍यासारखे ढग व गुलाबी थंडी यामुळे स्वर्गानुभवाचा प्रत्यय येतो. तिथे बर्फावरील ट्यूब स्किंग, आइस स्केटिंग इत्यादी खेळ खेळायला खूप मजा येते. विशेष म्हणजे इतक्‍या उंचीवर एक रेस्टॉरंट आहे आणि तिथे चक्क महाराष्ट्रीयन पदार्थ, म्हणजे वडापाव, बिर्यानी, पावभाजी इत्यादी होती. परततानासुद्धा निळेशार आकाश, बर्फाच्छादित डोंगर, हिरवीदाट उंच झाडी, मोठमोठी हिरवीगार शेती, शेतातील गाई व मध्येच एखादे निळेशार सरोवर हे दृश्‍य उंचीवरून पाहताना आपण स्वप्नात असल्याचा भास होतो.

येथे जवळ जवळ सर्वच गोष्टी अगदी स्वच्छ, नीटनेटक्‍या व सुंदर आहेत. स्वित्झर्लंडमध्ये आम्ही ट्रेनने चार दिवस फिरलो. कोणत्याही स्थानकावर ट्रेनसाठी पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ आम्हाला प्रतीक्षा करावी लागली नाही. स्वयंचलित दारे, वातानुकूलित व आलिशान डबे आणि सेकंदाच्या काट्यावर धावणारी येथील ट्रेन भारतीय मनाला धक्का देते. महत्त्वाची शहरे सोडली तर इथली लोकसंख्या कमीच. त्यातही पर्यटकांमध्ये भारतीय पर्यटक संख्येने जास्त भेटले. जगातील विविध देशांतून पर्यटक भेटीला येत असूनही इथली सार्वजनिक स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. इथल्या स्थानिक लोकांशी फारसं बोलणं होत नाही. कारण बहुतेकांना इंग्रजी येत नसावं. येथे फ्रेंच व जर्मन भाषा जास्त बोलल्या जातात असे समजले.

येथील प्रदेशात बहुतेक काळ पाऊस किंवा बर्फ पडत असल्यामुळे काही हॉटेल्स व उंच इमारती सोडल्या, तर येथे बहुतेक बैठी कौलारू आकर्षक घरेच बघायला मिळाली. यिंगफ्राऊ युरोपमधील सर्वांत उंच म्हणजेच चौतीस हजार फूट उंचीवरील ठिकाण पाहिले. जाण्यासाठी शेवटपर्यंत इतका चढ असलेल्या उंचीपर्यंत ट्रेन आहे. हा म्हणजे अत्याधुनिक स्विस तंत्रज्ञानाचा चमत्कारच आहे. येथे जाण्यासाठी आम्हाला आमच्या वास्तव्याच्या ठिकाणापासून सहा ट्रेन बदलाव्या लागल्या. इथल्या ट्रेनचे अत्याधुनिक जाळे, सगळे स्वयंचलित, सुहास्य वदनी सहकार्य करणारे शिस्तप्रिय लोक, जागोजागी लिहिलेल्या स्पष्ट सूचना व सोबतीला महागुरू "इंटरनेट'मुळे प्रवासाचा काहीही त्रास झाला नाही. स्वित्झर्लंडमधील इंटरलाखन हा ट्रेनचा शेवटचा थांबा. तेथून जवळच हे ठिकाण आहे. एवढ्या उंचीवर फक्त बर्फ आणि बर्फाचे डोंगर. त्यामध्ये सुद्धा बर्फाच्या वेगवेगळ्या आकर्षक प्रतिकृती. बोगदे, थ्रीडी शो अशी विविधता होती. अगदी अरुंद बर्फाच्या गुहेतून फिरताना विविध प्राण्यांच्या बर्फाने तयार केलेल्या प्रतिकृती, चमचमणाऱ्या सोनरी चांदण्या लावलेले तारांगण, काचेचे यिंगफ्राऊचे गोल मॉडेल हे सर्व बघून चकित व्हायला झाले. आम्ही तेथे पोचल्यानंतर काही वेळातच ऊन जाऊन बर्फ पडायला लागल्यामुळे तेथील नियमाप्रमाणे हे उत्तुंग स्थळ बाहेर जाऊन अनुभवता आले नाही.

स्वित्झर्लंडची राजधानी असलेले बर्न हे अत्यंत सुंदर शहर आहे. तेथे एका श्रीलंकन माणसाची भेट झाली. तेव्हा त्याने आम्हाला तेथील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती सांगितली. इथल्या सगळ्याच इमारती लांब व जास्तीत जास्त तीन मजल्यांपर्यंतच्या व एकाच रेषेत बांधलेल्या आहेत. तसेच फुलांनी सजलेल्या गच्च्या लक्ष वेधून घेतात. तेथील रोझ गार्डनमध्ये वेगवेगळ्या रंगांचे गुलाबाचे ताटवे, तसेच हिरवीगार लॉन व सुंदर कमानी आहेत. येथील संसदेची इमारत व बीयर पार्क पाहण्यासारखी आहेत.
स्वित्झर्लंडमधील राईनफॉल हा युरोपमधील सर्वांत मोठा धबधबा आहे. तो पाहताना अगदी पाण्यात उकळ्या फुटत असल्यासारखे वाटत होते. लगेच ते पाणी अगदी संथ नदीसारखे वाहत होते. धबधब्याच्या भोवतालचा परिसर अत्यंत नयनमनोहर असा आहे. धबधबा जवळून पाहण्यासाठी तेथे आम्ही नौका विहाराचा आनंद घेतला.

स्वित्झर्लंडमधील सर्व प्रवास अत्यंत आनंददायी असा झाला. सुंदर, स्वच्छ तळी, त्यावर तरंगणाऱ्या नौका, टुमदार कौलारू घरे, हिरवीगार शेते, उंच उंच शिखरे, घनदाट हिरवी झाडी आणि त्यातून जाणारे सळसळते स्वच्छ रस्ते पाहून डोळ्यांचे पारणे फिटले आणि मन तृप्त झाले. अगदी निसर्गदत्त व मोठ्या मनाची देणगी लाभलेल्या या देशाची सहल पूर्ण करून परतीच्या प्रवासाला लागलो. क्षणभर वाटले, आपण स्वप्नात तर नव्हतो ना...

Web Title: angha pathak write article in muktapeeth