मार्जारराज्ञी तानूबाई (मुक्तपीठ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

एका पावसाळी सकाळी तिचे आमच्या घरात अगदी अनपेक्षित आगमन झाले. तिचे म्हणजे तानूचे, पांढऱ्या, केशरी, करड्या, रंगाच्या मांजरीचे! 

एका पावसाळी सकाळी तिचे आमच्या घरात अगदी अनपेक्षित आगमन झाले. तिचे म्हणजे तानूचे, पांढऱ्या, केशरी, करड्या, रंगाच्या मांजरीचे! 

त्या सकाळी हलका, भुरभुर पाऊस पडत होता. सवयीप्रमाणे मी व पत्नी छत्र्या घेऊन फिरायला व दूध आणायला इमारतीच्या बाहेर पडत होतो. फाटकाच्या बाहेर पडत असतानाच दोन-तीन महिन्यांच्या मांजरीच्या पिल्लाचा अत्यंत गोड आवाज आमच्या मागोमाग येऊ लागला. केसावरून पाणी निथळत होते. भिजतच ती आमच्या पाठीमागे येऊ लागली. परिसरातील कुत्री तिला काहीही करतील या भीतीने माझ्या पत्नीने तिला पार्किंगमधील चारचाकी खाली ठेवले व आम्ही फिरावयास बाहेर पडलो. पुन्हा परत येत असता, आमच्या पाठीमागे कुठून ती धावत आली कळले नाही. पण आता ती आम्हास सोडावयास तयार नव्हती. अगदी पायांत - पायांत येत होती. मग मात्र पत्नीला राहवले नाही. तिने तिला उचलून घेतले. तिच्या डोळ्यांतील चमक विलक्षण होती. शेपटी उंच. पोट थोडे आत गेले होते. तिला भूक लागली असणार, थोडे दूध देऊ व नंतर पाहू असा विचार करून आम्ही तिला घरी आणले. वाटीत दूध दिले. तिने मटा-मटा ते पिवून टाकले. घरातील सोफ्यावर निवांत जाऊन बसली. इतक्‍यात मुले उठली होती. आश्‍चर्य - आनंद मिश्रीत भाव त्यांच्याही चेहऱ्यावर उमटले. तिला पुसून काढले; स्वच्छ केले. नंतर पुन्हा थोड्या वेळाने दूध-भात खाल्यावर तिला चांगलीच तरतरी आली. पत्नीनेच तिचे नामकरण "तानू‘ असे केले. 

विशेष म्हणजे आपले नाव तानू आहे हे तिने लगेच स्वीकारले. तानूऽऽ अशी हाक मारली की असेल तिथून धावत यायची किंवा डोळे टपोरे करून पाहायची. मान थोडी तिरकी करून आपल्या डोळ्याला डोळे भिडवायची. म्यॉंव म्यॉंव म्हणण्याच्या विविध तऱ्हा, त्यात तक्रार, आनंद, मागणी असे विविध भावदर्शन. ती असे काही करी की तिच्या एक एक अदा पाहाव्यात.

घरचे अन्न अधिक प्राणीखाद्य खाऊन तिने बाळसे धरले. मांजर हा प्राणी बहुधा माणसांच्याजवळ, उबेला राहत असतो. पण तानू मात्र अपवाद! तिला उचलून अथवा जवळ घेतले की कसेतरी अगदी थोडा वेळ ती शांत राहायची. पण नंतर पाय झटकून बाजूला व्हायची. घराच्या बाहेर काही फुलझाडांच्या कुंड्याबरोबर एक माती, वाळू भरलेली कुंडी ठेवली, त्यात तिला मलमूत्र विसर्जनाची मुलांनी सवय लावली. त्याचा परिणाम असा झाला की, तिने घरात कधीच घाण केली नाही. त्यामुळेच सर्वांना ती हवीहवीशी झाली. मूळच्या शुभ्र वर्णामुळे व खाण्यापिण्यामुळे तिच्या अंगावर तकाकी आली. सर्वसाधारण मांजरापेक्षा तिची लांबी अंमल अधिकच व हाडपेरही मजबूत! 

संपूर्ण बिल्डिंगमध्ये व आजूबाजूच्या सोसायट्यांत तिचा वावर वाढू लागला. अगदी बिनधास्त; मजेत कसे जगावे याचा वस्तूपाठच जणू ती तिच्या देहबोलीतून आणि वागण्यातून देत असे. रस्त्यांवर काही खुट्टं वाजले की मांजर कावरेबावरे होते. पण तानू त्याला अपवाद! अगदी एक-दोन कुत्र्यांच्या नजरेला नजर देऊन, म्यॉंव म्यॉंव असा मोठ्ठा आवाज करून ती त्यांना परतवून लावत असे. तिच्या सरस कथा खूप आहेत. एकदा आम्हाला आमच्या मूळगावी जायचे होते. प्रवास गाडीने करावयाचा असल्याने आम्ही तानूला आमच्या बरोबर घेण्याचे ठरवले. थोडी धाकधूक होतीच. पण नेले. तिथेही ती खूप छान राहिली. माझ्या घरच्यांशीसुद्धा अगदी पूर्वीपासूनची जवळीक असावी अशी राहिली. प्रवासात मागच्या सीटवर दोन मुलांच्या मध्ये बसून तिने एन्जॉय केले. कोठे मध्ये थांबलो तर तीही बाहेर येत असे, पण आम्हाला सोडून जात नसे. 

इथेसुद्धा तिला कंटाळा आला की मुलांच्या मागे हट्ट करून तिला दुचाकीवरून चक्कर मारायला लावते. त्यातही ती मुलांप्रमाणे मागे तोंड करून नखे रुतवून ती ऐटीत बसायची. ती आजूबाजूच्या लोकांच्या कुतूहलाचा आणि कौतुकाचा विषय झाली. पाच-सात वेळा तिची बाळंतपणे झाली. घरातल्या माळ्यांवरील खोक्‍यात ती जागा पक्की करत असे. पण एक-दोन दिवसांत तिला आपली लेकरे दाखवण्याची मोठ्ठी हौस! तोंडात धरून ती एक-एक खाली आणत असे व मुले झोपली असतील त्यांच्यामध्ये टाकून ती एका कोपऱ्यात ताणून देत असे. हे म्हणजे सासूरवाशीणीने कामाचा धबडगा उरकताना पोटचे पोर सासूपाशी देऊन, थोडी जबाबदारी तुम्हीही घ्या, असे सुचवण्यासारखे होते. 

एक - दोन प्रसंग तिच्या जिवावरून निघून गेले. तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यावर तिच्या टाळूला इजा झाली. त्यामुळे तिच्या खाण्यावर परिणाम झाला. एक-दोन आजारपणात तिला दवाखान्यात घेऊन जावे लागले. मुले तिला औषधे वेळेवर द्यायची, पण तिची सकारात्मकता संपूर्ण कुटुंबाला ताकद देत होती हे खरे. एकदा कबुतराचे नुकतेच उडू लागलेले पिल्लू तिने घरात आणले. पिल्लू निकराने पंख हलवत होते. माझी पत्नी संतापली व ओरडली "तानेऽऽ सोडतेस की नाही, फटके खाशील!‘ खरेच एक धपाटा घातला. त्यासरशी तिने ते सोडले. पिल्लू घाबरून थोडे पळत गेले व नंतर जिवाच्या निकराने पंख हलवत खिडकीतून पसार झाले. त्यावेळचा तिचा चेहरा व एकूण अंदाज बघण्यासारखा होता. 

शेवटी एका अपघातात तिची मागची बाजू लुळी पडली. खाणे-पिणे बंद झाले. औषधोपचारास प्रतिसाद मिळेना व एकेदिवशी सर्व संपले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: animal love to experience

टॅग्स