कॉलर्सची खरेदी...

अनुराधा राजहंस
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

खूप स्वस्तातील खरेदी केली होती. घासाघीसही करावी वाटली नव्हती; पण घरी येऊन पाहताच फसवले गेल्याचे दुःख वाट्याला आले.

खूप स्वस्तातील खरेदी केली होती. घासाघीसही करावी वाटली नव्हती; पण घरी येऊन पाहताच फसवले गेल्याचे दुःख वाट्याला आले.

आम्ही "संगीत कान्होपात्रा' या नाटकाच्या प्रयोगासाठी दिल्लीला गेलो होतो. नाटक संध्याकाळी होते. आम्ही तिघे-चौघेजण जरा थोडीशी खरेदी आणि फेरफटका मारून येऊ, अशा उद्देशाने बाहेर पडलो. आपल्या तुळशीबागेतील भागासारखा रस्ता होता. खूप दुकाने फुटपाथवरही होती. त्यामुळे आम्ही शॉपिंगचा आनंद घेत होतो. थोडीफार खरेदी झाल्यावर एके ठिकाणी मात्र शर्टांचे गठ्ठे दिसले. शर्टची गुणवत्ता चांगली दिसत होती. एक डझन शर्ट पाचशे रुपये असे तो सांगत होता. पाचशे रुपयांत चांगल्यापैकी बारा शर्ट मिळतात म्हटल्यावर काही घासाघीस करावी असेही मनात आले नाही. आपल्याला घरी गेल्यावर दिल्लीहून खरेदी केली म्हणून आप्तेष्टांनाही शर्ट देता येतील, या विचाराने मी त्यातील बारा शर्टांचा एक गठ्ठा उचलला आणि बास्केटमध्ये ठेवला.

नाटक झाल्यावर तिसऱ्या दिवशी आम्ही पुण्यात घरी आलो. मोठ्या उत्साहाने खरेदी दाखवण्यासाठी बॅग उघडली. बारा शर्ट फक्त पाचशे रुपयांत कसे आणले आणि तेही कोणतीही घासाघीस न करता, दिल्ली पुण्यापेक्षा किती स्वस्त आहे, हे मला दाखवायचे होते. त्यामुळे नवरा कायम सर्व खरेदी महाग करतो अशा अर्थाचा एक कटाक्ष नवऱ्याकडे टाकून मी अटकेपार झेंडा रोवून आल्याच्या आविर्भावात शर्टांचा गठ्ठा काढला. यांच्या हातात दिला आणि आम्ही बघतो तर काय, त्या गठ्ठयात फक्‍त कॉलरच बारा होत्या. त्या गठ्ठयात पूर्ण शर्ट फक्त चार-पाचच होते. एका बाजूला बारा कॉलर लावून गठ्ठा तयार केला होता.

दिल्लीचा भामटा अशा प्रकारे आपल्या पुणेकरांवर भारी पडला हे मान्य करावेच लागले; आणि त्या काळात पाचशे रुपयांत पाच शर्ट ही फारशी फायदेशीर नसलेली खरेदी झाली होती. आपण फसवले गेल्याचे दुःख होतेच; त्याच वेळी नवऱ्याची विजयी मुद्रा पाहून रडूच कोसळले. तेव्हापासून साधी मिरची-कोथिंबीर घेतानाही दिल्लीचा ठग आठवतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anuradha rajhans write article in muktapeeth