गुलमोहर

अपर्णा प्रणव बोरावके
शनिवार, 4 मार्च 2017

एखादं झाड आपल्या बालपणाबरोबरच वाढत जातं. आपल्या आयुष्याचा भाग बनतं. फुलत राहतं आपल्याबरोबरच आणि एखाद्या जोरदार पावसात ते झाड कोसळतं. आपल्या आतही जोरदार पडझड होते.

एखादं झाड आपल्या बालपणाबरोबरच वाढत जातं. आपल्या आयुष्याचा भाग बनतं. फुलत राहतं आपल्याबरोबरच आणि एखाद्या जोरदार पावसात ते झाड कोसळतं. आपल्या आतही जोरदार पडझड होते.

हो हो... अगदी बरोबर लाल नारंगी फुलांनी बहरतो, तोच तो गुलमोहर... उन्हाच्या झळ्या जाणवू लागल्या, की डोळ्यांना थंडावा देतो, तोच तो गुलमोहर...
असाच एक गुलमोहर माझ्या आठवणीत आहे, बालपणीचा गुलमोहर. अंगणातच वडिलांनी लावलेलं ते गुलमोहराचं झाड बघता बघता खूपच उंच आणि घेरदार झालं. गुलमोहराच्या झाडाखाली सावलीत आम्ही भावंडं अनेक खेळ मांडायचो. दुपारच्या वेळात आई झोपी गेली, की स्वयंपाक घरातली भांडी त्या झाडाखाली जमा होयची. मग काय.... मातीचा चिखल करून त्याला वेगवेगळे आकार देऊन भातुकलीचा खेळ खूपच रंगायचा. कुल्फीच्या काड्या मातीत रोवून त्याचं कुंपण तयार करायचं. त्याच काडीला चिखलाचा गोळा लावून झंबो पण बनायचा... अहो, त्या वेळी त्याला झंबोच म्हणायचे.
आजी सांगायची, मातीत पैसा पुरून ठेवला तर त्याचे दोन पैसे होतात. चार आणे, दहा पैसे कोणी दिलेच, तर ते नाणे आम्ही झाडाखाली मातीत लपवून ठेवायचो, एका नाण्याची दोन नाणी होतील हे पाहण्यासाठी, याच झाडाखाली आजी आम्हाला "ये रे ये रे पावसा' शिकवायची आणि मामाच्या गावाला जाणारी झुकझुक गाडी पण दाखवायची. आमचे सगळे लाड तर आमचा काका पूर्ण करायचा. त्याने एक दिवस गुलमोहराच्या फांदीला दोरीने मस्त झोका बांधला. आणि आता तर तो झोका आमचं सर्वस्व बनला होता. आळीपाळीने आम्ही भावंडं त्या झोक्‍यावर बसून उंच उंच झोके घ्यायचो. हो, पण प्रत्येकाला मोजून बरं का, झोका घेणारा मस्त झोके घेणार आणि बाकीचे आकडे मोजत बसणार, अंकलिपीचा सराव पण असाच व्हायचा. आणि एकावर दोन पुज्ज शंभर हा आकडा मोठ्याने उच्चारायचा.

उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये तर गुलमोहर आम्हाला खूपच जवळचा वाटायचा. लाल नारंगी रंगांनी बहरलेला तो वृक्ष खूपच आकर्षक दिसायचा. पाचच पाकळ्या असलेल्या त्या फुलाची एक पाकळी पांढऱ्या, पिवळसर लाल नक्षीची असते. आम्ही त्याला कोंबडा म्हणायचो. आम्ही ही पाकळी खायचो. गुलमोहराची पाने पण खूपच मनमोहक, बारीक बारीक पानांची मिळून बनलेली ती मोरपिसासारखी पानं आम्ही बनविलेल्या मातीच्या घराचं प्रवेशद्वार असायचं.
भरपूर तिखट-मीठ लावलेल्या कैऱ्या, आवळे, बोरं, चिंचा सगळं सगळं याच झाडाखाली फस्त व्हायचं.

कधी कधी झाडावर कोकिळा पण येऊन तिच्या मधुर आवाजात हेच सांगायची, की तिलासुद्धा आमच्या सारखाच या गुलमोहराचा सहवास खूप हवाहवासा वाटतो.
काहीच दिवसांत फुलांचं रूपांतर शेंगांमध्ये व्हायचं. बराच खटाटोप करून काठीने, नाहीतर, कधी कधी झाडावर चढून त्या शेंगा काढत असू, आणि मग काय प्रत्येकाच्या हातात एक एक तलवार आणि आम्ही टिपू सुलतान आणि राणी लक्ष्मीबाई बनत असू.
थोड्याच दिवसांत पावसाळा सुरू व्हायचा. आणि अंगणातला तो गुलमोहर खूपच दूर वाटायचा. तो दिवस आजही आठवतो. आणि डोळ्यातला एक थेंब पटकन गालावर उतरतो. जोराचा झालेला तो वादळी पाऊस मी आणि माझ्या वडिलांनी खिडकीतूनच बघितला. अंगणातून जणू नदी वाहत होती, इतके पाणी, घेरदार गुलमोहर विस्कटलेला दिसू लागला. त्या वादळात तो वृक्ष स्वतःला कसाबसा सावरत होता. वादळाचा जोर इतका होता, की फांद्या जमिनीला पोचू लागल्या. खिडकीच्या फटीतून त्या गुलमोहरावरची माझी नजर काही हटत नव्हती. आणि काय घडतंय हे कळायच्या आत तो क्षणार्धात कोसळला.

मनाच्या खोल कप्प्यात कुठेतरी मोठ्ठी खळबळ उडालेली. काहीतरी संपलं होतं आपल्यातलंच, दुरावलं होतं आत्म्यापासून. तो दिवस आम्ही कधीच विसरू शकत नाही.
घराच्या अंगणात आणि मनाच्या प्रांगणात गुलमोहराची ती जागा सदैव राहील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aparna borawake write article in muktapeeth