आईचं पत्र हरवलं...

अपर्णा निरगुडे
शनिवार, 30 मार्च 2019

पत्राद्वारे परगावची माणसं जोडली जायची. नात्याची ओढ वाटत राहायची. बातमी दुःखाची असो वा आनंदाची, पण पत्राद्वारे माणसं भेटीचा आनंद घेऊन एकमेकांच्या सुख-दुःखात सामील व्हायची.

पत्राद्वारे परगावची माणसं जोडली जायची. नात्याची ओढ वाटत राहायची. बातमी दुःखाची असो वा आनंदाची, पण पत्राद्वारे माणसं भेटीचा आनंद घेऊन एकमेकांच्या सुख-दुःखात सामील व्हायची.

माझ्या आईचं पत्र हरवलं; ते मला सापडलं... अशा प्रकारचा खेळ आम्ही लहानपणी खेळत असू. बिनखर्ची पण मजेदार. आज हा खेळही हरवलाय अन्‌ पत्रसुद्धा.
पूर्वी श्रीमंताघरीच टेलिफोन होते, त्यामुळे मध्यमवर्गाला पोस्टाचाच आधार. पूर्वी घरी नातेवाइकांची पत्रे नियमितपणे येत असत. पोस्टकार्डावर मावेल तेवढ्या मजकुरात खुशालीबरोबर काळजीचे शब्द, नमस्कार, आशीर्वाद सारं लिहिलं जाई. काय छान सुसंवाद साधला जाई नातेवाइकांशी!

घरी अर्ध्या मजकुराचं पत्र आलं, की घरची मंडळी धास्तावायची. काहीतरी वाईट बातमी देणारे हे पत्र, वाचले की लगेच फाडून टाकले जाई. पत्राद्वारे परगावची माणसं जोडली जायची. नात्याची ओढ वाटत राहायची. बातमी दुःखाची असो वा आनंदाची, पण पत्राद्वारे माणसं भेटीचा आनंद घेऊन एकमेकांच्या सुख-दुःखात सामील व्हायची. शब्दांमधून पत्रलेखनाद्वारे इतरांच्या भावविश्‍वात शिरून नात्याची वीण घट्ट केली जायची. त्यामुळे पत्र लिहिण्याचा प्रपंच प्रत्येक कुटुंबात केला जात असे. आलेली पत्र तारेला अडकवून ठेवायची आणि कधीतरी ती काढून वाचताना आनंद मिळायचा.
काही भावना प्रत्यक्ष बोलून दाखवता येत नाहीत. त्या वेळी पत्रातून त्या सहज व्यक्त करता येतात. पूर्वी मुलगा - मुलगी पसंत आहे - नाही, हे सुद्धा पत्राद्वारे कळविणे सोपे जात होते. वाईटपणा न घेता पत्राद्वारे सहज सांगता येत होते. आम्ही तर लहानपणी - "राजमान्य राजश्री, पत्र लिहिण्यास कारण की...' अशा गाण्यावर नृत्यही केले आहे. पत्रातले अक्षर, मजकूर मांडणी यासाठी शेरेबाजीही केली जाई. आज 5 पैशाचं पोस्टकार्ड किंमत वाढत वाढतच 50 पैशांपर्यंत आले, तरीही ते स्वस्तच "नाही' का!
महात्मा गांधी - विनोबाजी यांची पत्रे, पंडित नेहरूंनी लिहिलेली "इंदिरेस पत्रे' तर साने गुरुजींनी आपली पुतणी सुधा हिला लिहिलेली सुंदर पत्रे पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालीत. ती वाचताना इतकी ताजी, माहितीपूर्ण, निसर्गवर्णनाने सजलेली आणि माणुसकीने ओथंबलेली आहेत हे लक्षात येते अन्‌ मनाला स्पर्शूनही जातात.
आजच्या मोबाईलच्या जगात हा पत्रलेखनाचा मार्ग मागे पडला.

Web Title: aparna nirgude write article in muktapeeth