कोकणातलो शिगमो

अर्चना खरे
शनिवार, 11 मार्च 2017

 

निसर्ग वसंतोत्सव साजरा करतो, त्याचवेळी माणूस होळी खेळून वातावरण रंगीन करतो. कोकणात "शिगमो' लोकप्रिय आहे. "सुग्रीष्मक' या संस्कृत शब्दावरून "शिगमो' हे रूप तयार झाले आहे. ते मालवणी बोलीने जपले आहे. त्याचे संस्कारिक रूप आहे - शिमगा.

 

 

निसर्ग वसंतोत्सव साजरा करतो, त्याचवेळी माणूस होळी खेळून वातावरण रंगीन करतो. कोकणात "शिगमो' लोकप्रिय आहे. "सुग्रीष्मक' या संस्कृत शब्दावरून "शिगमो' हे रूप तयार झाले आहे. ते मालवणी बोलीने जपले आहे. त्याचे संस्कारिक रूप आहे - शिमगा.

 

माघ महिना संपला. शिशिराची अवकळा संपली आणि वृक्षांवरची पानगळती थांबली की समजावं ऋतुराज वसंताचे आगमन होणार! फुलांना बहर येणार. निसर्गात सुंदर सुंदर फुलं फुलणार आणि जिकडे तिकडे फुलांचा सुगंध पसरणार. अशा वेळी होलिकेचा सण येतो. फाल्गुन शुद्ध पौर्णिमचा उत्सव! खरं पाहिलं तर हा सण निसर्ग बदलाचं स्वागत करणारा सण मानला जातो. फाल्गुन शुद्ध पंचमीपासून या सणाला सुरवात होते. विशेषतः कोकणात या सणाचे फारच महत्त्व आहे. कोकणी माणूस या सणाला गावाकडे चार दिवस तरी जाऊन येणारच! फाल्गुन पंचमी दिवशी गावातील मुले आपापल्या गल्लीतील मुलांना एकत्र करून रात्री आठनंतर आट्यापाट्या, दांडपट्टा, हुतूतू असे मैदानी खेळ खेळू लागतात. पुढे दहा दिवस मनसोक्त खेळून होळी पौर्णिमेच्या दिवशी त्या सणाची सांगता सार्वजनिक स्वरूपात होते.

या दिवशी गावोगाव घरोघरच्या निदान पाच तरी गोवऱ्या गोळा करतात. वेशीजवळच्या मैदानाची सफाई करून सडा- सारवण करून मध्यभागी रांगोळी घालून त्यावर या गोवऱ्यांची रास रचतात. त्यावर वाळलेल्या गवताचे कोंदण रचतात. त्यावर आकर्षक पाने, फुले झाडांच्या फांद्यांनी सजवतात. सजवलेली होळी अतिशय सुंदर दिसते. पताका लावतात. मग गावातील सर्व लहानथोर मंडळी संध्याकाळी होळीजवळ जमतात. गावचा प्रमुख या होळीची विधिवत पूजा करतो. नंतर ग्राम देवतेची पालखी होळीच्या सभोवती प्रदक्षिणा घालते. चाकरमानी मोठ्या हौशेने पालखी खांद्यावर नाचवतात. हा सोहळा खूपच पाहण्यासारखा असतो. गावच्या देवीची पालखी खूप सुंदर सजवलेली असते. त्यातील देवी व देवांच्या मूर्ती अलंकारांनी नटलेल्या असतात. वर शेला पांघरलेला असतो. बराच वेळ ही पालखी ढोल, ताशे, वाजंत्री या वाद्यांच्या गजरात गाणी म्हणत वाजत गाजत होळीला पाच प्रदक्षिणा घालते व नंतर होळी पेटविली जाते. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात. प्रत्येक घरी छोटी होळी दारापुढे करून पूजा करतात. अग्निदेवतेची पूजा असते ही. साधारण पन्नास वर्षांपूर्वी या दहा दिवसांच्या उत्सवात लोक फार स्वैरपणे वागत असत. चोऱ्या करणे, शिव्या देणे, मद्यपान करणे इत्यादी गोष्टींना माफी दिली जाई. गुहागरला तर आमच्या बागातले नारळ रात्री चोरले जायचे. केळीचे घड नाहीसे व्हायचे. एकदा तर पावट्याच्या बिरड्या काढलेल्या कोणीतरी उचलून घेऊन गेला. मग गावात चर्चा व्हायची. खूप खूप मजा यायची.

या उत्सवाची गोष्टही रंजक व बोधप्रद आहे. हिरण्यकश्‍यपूचा मुलगा प्रल्हाद हा विष्णुभक्त होता. त्याचा नाश करण्यासाठी हिरण्यकश्‍यपूने अनेक उपाय केले. पण ते सर्व व्यर्थ गेले. शेवटी हिरण्यकश्‍यपूची बहीण ढुंढा म्हणाली, ""मी प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते. तो जळून मरेल. मला अग्नीचे भय नाही. मला तसे वरदान मिळाले आहे.'' ढुंढा प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली. पण प्रल्हाद जळण्याऐवजी तीच राक्षशीण जळून मेली. त्या आठवणीचा दिवस म्हणजे होळी पौर्णिमा.

या दिवसापासून वाईट गोष्टींचा, वाईट सवयींचा त्याग करायचा असतो. वाईट वासना सोडायच्या असतात. दुष्ट प्रवृत्ती एखाद्याशी काही कारणांनी झालेले वैर सोडून त्याच्याशी हात मिळवणी करायची असते. त्यासाठीच हा सण असतो.
वाईट गोष्टींची जाळून होळी करण्याचा हा सण असतो. पण चांगल्या गोष्टी, चांगल्या प्रथांमध्ये वाईट गोष्टीही आल्या, तसे होळी सणाचे झाले होते. दुसऱ्याच्या घरात गोवऱ्या, लाकडे, गवत चोरून आणणे, झाडांच्या फांद्या तोडणे, अश्‍लील शब्द बोलणे, बोंबा मारणे, मद्यपान करणे, मालकाला न विचारता बागेतील नारळ पाडून पळवून नेणे इत्यादी अनैतिक गोष्टी घडायच्या. अशा गोष्टी आता या सणाला फारशा घडत नाहीत. वृक्षतोड थांबली. आता झाडांची वाळलेली पाने होळीत टाकली जातात. वरील सर्व वाईट प्रथा नष्ट झाल्या आहेत. कोकणात चिपळूण, गुहागर या भागांत होळी पौर्णिमेच्या रात्री "खेळे' हा लोकनृत्याचा कार्यक्रम बघण्यासारखा असतो. वेंगुर्ला परिसरात राधेचं सोंग काढलं जातं. गोवा व मालवणी मुलखात घुमाट या वाद्यावर गाणी म्हटली जातात. घुमाट हे मातीचं, दोन्ही बाजूंना तोंड असलेल्या मडकीसारखं असतं. एका बाजूला गुराचं कातडं ताणून बसवलेलं असतं, तर दुसरी बाजू मोकळी. मडक्‍याच्या तोंडाच्या आकाराची. घोडेमोडणी, हळदवणी आणि रात्री रोंबाट याने "कोकणातलो शिगमो' पूर्ण होतो. दुसरा दिवस धूलिवंदनाचा असतो. या दिवशी गल्लोगल्ली केलेल्या होळ्यांची अर्धवट जळालेली लाकडे, राख, धूळ, केरकचरा इत्यादींची घाण नाहीशी करून ग्रामसफाई करण्याचा कार्यक्रम आनंदाने सर्व लहानथोर मिळून करतात. या दिवशी अंगणात पसरट भांड्यात सूर्याच्या उन्हाने तापवलेले पाणी ग्रामस्वच्छता करून आल्यावर अंगावर घेऊन स्वच्छ अंघोळ करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: archana khare write article in muktapeeth