किशोरीताई.. दिव्यत्वाची प्रचिती!

Kishori Amonkar
Kishori Amonkar

तब्बल 55 वर्षे शास्त्रीय गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसरस्वती किशोरीताई अमोणकर यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. ख्याल गायकीबरोबरच ठुमरी, भजनावर त्यांची हुकूमत होती. केवळ महाराष्ट्रात आणि भारतातच नव्हे तर जगभर विविध ठिकाणी त्यांनी गायनाच्या बहारदार मैफिली सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. ऐकले आहेत का तुम्ही किशोरीताईंचे कार्यक्रम? कधी झाला आहात का त्यांच्या मैफिलीत मंत्रमुग्ध? मग लिहा आणि पाठवा "ई सकाळ'कडे. कळू द्या जगाला तुम्ही प्रत्यक्ष अनुभवलेली त्यांची कला! 

..........................................................................

सकाळी साडेसहाची वेळ. स्थळ गेटवे ऑफ इंडिया. रविवार सकाळच्या साखरझोपेला सोडचिठ्ठी देऊन तीनशे-चारशे लोकं ताईंचं गाणं ऐकायला जमलेले. मी किशोरीताईंना दुसऱ्यांदाच ‘लाइव्ह’ ऐकणार होतो. ताई त्यांच्या विक्षिप्त वागण्यासाठी प्रसिध्द. कार्यक्रम वेळेत सुरु होईल की नाही अशी मनात धाकधुक होतीच. बरोबर वेळेत ताई मंचावर आल्या. फार काही सोपस्कार न करता गाणं सुरु झालं. 

ताईंच्या आजवर अनेक ध्वनिफिती ऐकल्या होत्या आणि त्यांच्या सुरांनी आणि राग-रसाविष्काराच्या अनोख्या पद्धतीने मनाला अक्षरशः वेड लागले होते. आज ताई काय गातील? हा प्रश्न स्वस्थ बसू देत नव्हता. 

काही क्षणांतच ललत-पंचम चे सूर समुद्राच्या वाऱ्यासारखे कानी येऊ लागले. ताईंनी नुकतीच ऐंशी गाठली होती. आवाज आणि स्वर हलत होते. ताई वयाशी झुंजत होत्या. ताई गाऊ शकतील न नीट? मनात प्रश्न उभा राहिला ताई मात्र माझ्या मनातील या शंकेच्या पार पलीकडे गेलेल्या होत्या. 
स्वरमंडल च्या तारांचा आधार घेत त्या स्वर-सागरात खोल आणि खोल उतरत होत्या. हळू-हळू निखाऱ्यांतून प्रकाश यावा तसा त्यांच्या सुरांतून प्रकाश येऊ लागला. काही क्षणांपूर्वी अशक्त वाटणारे सूर आता एखाद्या मंदिराच्या संगमरवरी खांबांसारखे भक्कम, गोलाईदार आणि परिपूर्ण दिसत होते. 

थोडेसे साशंक असणारे श्रोते आता ताईंच्या गाण्याच्या पूर्णत्वाने आणि त्याच्या दिव्यत्वाने भारावून गेले होते. मंचावरचे साथीदार आणि तानपुऱ्यावरील शिष्या यांना मागे टाकून ताई पार पुढे गेल्या  होत्या. सहकलाकार आणि शिष्यांच्या चेहऱ्यावरची हतबलता फारच बोलकी होती. 
आम्ही सर्व श्रोते दिव्यत्वाची प्रचिती घेत होतो; ताई मात्र अजूनही असमाधानीच दिसत होत्या. अजून थोडं खोल जाता येईल का? या प्रयत्नात त्या असाव्या....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com