थरार विमानाचा 

विजया नळगीरकर 
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

विमान हवेत स्थिर झाले आणि डावीकडे आग दिसू लागली. बेल्ट बांधण्याची सूचना मिळाली आणि... 

अमेरिकेतील ओहिओमधून आम्ही मुलाकडील वास्तव्यानंतर परत भारतात येण्यास निघालो. इंडियाना पोलिस येथून विमान सुटणार होते. सिक्‍युरिटी चेकिंग, इमिग्रेशनचे सोपस्कर झाल्यानंतर आम्ही विमानात बसलो. विमान हवेत स्थिर झाले. प्रवासी टीव्हीवर आपापल्या आवडीचे कार्यक्रम लावण्यात, तर काही आपल्या शेजारील प्रवाशाशी बोलण्यात गुंतले होते.

हवाई सुंदरींनी नाश्‍ता, पेय देण्यास सुरवात केली. अचानकच त्या ट्रॉलीसह आत निघून गेल्या. सर्वत्र सामसूम. तोच सीट बेल्ट बांधायची खूण आसनासमोरील डिस्प्लेवर दिसू लागली. मी खिडकीजवळ होते. साहजिकच खिडकीतून बाहेर पाहत होते. 

विमानाच्या डावीकडील भागातून ज्वाळा निघत असल्याचे दिसले. विमानातून पेट्रोल बाहेर टाकले जात होते. पेट्रोल जास्त भरले गेले म्हणून विमान आणखी वर जात नाही, हा वैमानिकाचा अंदाज होता. थोड्याच वेळात धुराचा लोळ वाढला. सर्वत्र काळोख पसरला. हेच दृश्‍य उजवीकडील प्रवाशांनाही दिसत असावे. कोणतीच घोषणा होत नव्हती. काहीतरी अघटीत होणार या भीतीने लोक घाबरले. तेवढ्यात घोषणा झाली की घाबरून जाऊ नका. आपापल्या खुर्चीवर बेल्ट लावून बसून रहा. थोड्याच वेळात आपले विमान जेथून आपण निघालो होतो त्याच विमानतळावर सुरक्षितपणे उतरणार असल्याचे सांगितले गेले. 

वैमानिकाने प्रसंगावधान राखून योग्य तो निर्णय घेतला होता. विमान उतरत असताना खिडकीतून पाहिले तर धावपट्टीच्या बाजूला अग्निशामक दल व रुग्णवाहिका मदतीसाठी सज्ज होत्या. वैद्यकीय मदत, तसेच खाण्यापिण्याची व्यवस्था सुरेख केली होती. आमच्या पुढच्या उड्डाणाची सोयही केली होती.

मुलगा अमेरिकेत असल्यामुळे नेटवरून ट्रॅक ठेवत होता. तो ही खूप घाबरला होता. पण घरी बसून तो काळजी व्यतिरिक्त काही करू शकत नव्हता. जेव्हा आमचे विमान सुरक्षित उतरले तेव्हा त्याला हायसे वाटले. ते तेवढे क्षण अजून आठवतात. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article on Situations in Flight Muktapeeth Sections