अजून बोलाविले नव्हते...

निवृत्त कर्नल अरविंद जोगळेकर
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

लहान स्टेशनवर सिग्नल न मिळाल्यामुळे आमची गाडी थांबली होती. तेवढ्यात गाडीला जोराचा धक्का बसला. पाठोपाठ मोठमोठ्याने आरडाओरडा ऐकू आला. काय गोंधळ आहे, हे पाहण्यासाठी मी खाली उतरलो. पाहतो तर काय...?

जगामध्ये देव आहे की नाही मला माहीत नाही; पण माझ्या तीस वर्षांच्या सैनिकी आयुष्यात आणि साधारण सतरा वर्षे हिमालयातील वास्तव्यात जे काही वेगळे आणि माझ्या जीवनावर कायमचा ठसा उमटवणारे अनुभव वाट्याला आले आहेत, त्यातून कदाचित एखादी अज्ञात शक्ती कार्यरत असावी, अशी माझी मानसिक धारणा आहे. अशाच काही घटनांमधील हा एक अनुभव.

लहान स्टेशनवर सिग्नल न मिळाल्यामुळे आमची गाडी थांबली होती. तेवढ्यात गाडीला जोराचा धक्का बसला. पाठोपाठ मोठमोठ्याने आरडाओरडा ऐकू आला. काय गोंधळ आहे, हे पाहण्यासाठी मी खाली उतरलो. पाहतो तर काय...?

जगामध्ये देव आहे की नाही मला माहीत नाही; पण माझ्या तीस वर्षांच्या सैनिकी आयुष्यात आणि साधारण सतरा वर्षे हिमालयातील वास्तव्यात जे काही वेगळे आणि माझ्या जीवनावर कायमचा ठसा उमटवणारे अनुभव वाट्याला आले आहेत, त्यातून कदाचित एखादी अज्ञात शक्ती कार्यरत असावी, अशी माझी मानसिक धारणा आहे. अशाच काही घटनांमधील हा एक अनुभव.

ही साधारण जून 1984 मधील घटना आहे. त्या वेळी मी नुकताच प्रमोशन मिळून कर्नल झालो होतो आणि आमचे रेजिमेंट बिहार प्रांतातील कटीहारला होते. तीन वर्षांचा कार्यकाळ झाल्यावर माझी जम्मूमध्ये असलेल्या एका रेजिमेंटचा कमांडिंग ऑफिसर म्हणून बदली झाली. नवीन बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास सहा दिवस बाकी होते, त्यामुळे आमचे सर्व साहित्य जम्मूला पाठवले होते. सुमारे चार-पाच तासांचा प्रवास करायचा म्हणून एक छोटी हॅंडबॅग एवढेच सामान बरोबर घेऊन मी आणि माझ्या पत्नीने माझा धाकटा भाऊ, जो स्वतः सैन्यात कर्नल या हुद्यावर कार्यरत होता, त्याच्याकडे अंबाल्याला जायचे ठरवले. कटीहारहून आसाम मेलने दिल्लीला पोचेपर्यंत अंबाल्याला जाणारी झेलम एक्‍स्प्रेस निघालेली होती. आम्ही दोघे आणि आमचा सहायक ईश्‍वरलाल, कसेबसे धावत पळतच शेवटचा जो आरक्षित द्वितीय वर्गाचा डबा होता त्या डब्याच्या शेवटच्या दरवाजातून कसेतरी आत चढलो. (अशा सुपरफास्ट गाडीला गार्डचा वेगळा डबा नसतो.) पुढच्या स्टेशनला फर्स्ट क्‍लासमध्ये जागा आहे का, ते बघायचे आमचे ठरले. त्याप्रमाणे पुढल्या स्टेशनवर तीन-चार डबे पुढे असलेल्या फर्स्ट क्‍लासच्या डब्यात जागा आहे, असे जेव्हा ईश्‍वरलालने पाहिले तेव्हा त्याने आम्हाला दोघांना त्या फर्स्ट क्‍लासच्या डब्यात बसण्यास सांगितले. त्यानुसार आम्ही दोघे त्या फर्स्ट क्‍लासच्या डब्यात बसलो आणि ईश्‍वरलाल स्वतः आमच्या हॅंडबॅगसकट पुन्हा त्या शेवटच्या जनरल बोगीतच बसला.

त्यानंतर दोन- तीन स्टेशन पुढे गेल्यानंतर एका लहान स्टेशनवर पुढील सिग्नल न मिळाल्यामुळे गाडी थांबली आणि थोड्या वेळाने एक जोराचा धक्का गाडीला बसला आणि नंतर प्रचंड आरडाओरडा ऐकू आला म्हणून मी खाली उतरलो. थोडा वेळ कोणाला काहीच कळले नाही; पण नंतर असे कळले, की शेवटच्या ज्या डब्यात ईश्‍वरलाल बसला होता, त्या डब्यावर मालगाडीचे इंजिन धडकल्यामुळे खूप मोठा अपघात झालेला आहे आणि त्यात बरेच जण मृत्युमुखी पडले आहेत. काही जण जखमी झाले आहेत. आम्हाला आता ईश्‍वरलालची काळजी वाटायला लागली. मी त्या डब्याजवळ जायचा प्रयत्न केला; पण त्या गर्दीत मला तो कुठेही दिसला नाही. थोड्या वेळाने ईश्‍वरलालला शोधण्याचा परत एकदा प्रयत्न करावा म्हणून मी माझ्या डब्याजवळ आलो. तेवढ्यात तो आमच्या फर्स्ट क्‍लासच्या डब्यात आमची बॅग घेऊन चढताना दिसला. ईश्‍वरलालला बघून मला खूप हायसे वाटले. मी त्याला विचारले, ""अरे तू ज्या डब्यात होतास त्या बोगीला अपघात झाला आहे, हे तुला कळलं का?''
त्यावर तो म्हणाला, ""साहेब मैं अभी वही सब देखकर आ रहा हूँ। बहुत बडी दुर्घटना घटी है। कई लोगोंकी जान गई है और बहुत लोग जखमी अवस्थामें है। जिस सीटपर हम लोग बैठे थे वो सीट तो खूनसे लथपथ हैं। वो पुरा सीट तेहेस नेहेस हो गया है। उस सीटपर बैठा एक भी आदमी नही बचा। आज आपकी इस हॅंडबॅग की वजहसे मैं तो बालबाल बच गया। जब ट्रेन सिग्नल पे रूकी तो मैंने सोचा की मेमसाब को थंड लगती होगी। क्‍यूं न हॅंडबॅगसे स्वेटर उनको दे दूं। शायद भगवाननेही मुझे ये सद्‌बुद्धी दे दी।' आणि मी मनोमन त्या पालनकर्त्याचे आभार मानले. कारण ईश्‍वरलालच्या मनाला हे पटले नाही की त्याच्या साहेबांनी सेकंड क्‍लासच्या डब्याने प्रवास करावा आणि म्हणून त्याने स्वतः आमच्यासाठी फर्स्ट क्‍लासमध्ये जागा शोधली. त्याने जर तसे केले नसते तर शेवटच्या बोगीच्या शेवटच्या सीटवर बसल्यामुळे त्या अपघातात नक्कीच आम्ही वाचलो नसतो. केवळ ईश्‍वरलालच्या आग्रहाखातर आम्ही फर्स्ट क्‍लासच्या डब्यात बसलो आणि कदाचित नियतीनेच त्याच्या रूपामध्ये येऊन आम्हाला वाचवले आणि त्यामुळे आज जे काही आम्ही जिवंत आहोत ते केवळ "त्याने अजून बोलाविले नव्हते' म्हणूनच.

Web Title: arvind jogalekar's article in muktapeeth