बांधियल्या गाठी वरतोनि!

अरविंद जोशी
गुरुवार, 6 एप्रिल 2017

लग्ने ठरवली जातात. कधी तो, तर कधी ती नाकारते दुसऱ्याला. कधी अपेक्षाभंग होतो, तर कधी गाडी चुकल्याची हळहळ वाटावी तसे होते. मग जाणवते, लग्ने आपण कुठे ठरवतो? ती आधीच "ठरलेली' असतात.

लग्ने ठरवली जातात. कधी तो, तर कधी ती नाकारते दुसऱ्याला. कधी अपेक्षाभंग होतो, तर कधी गाडी चुकल्याची हळहळ वाटावी तसे होते. मग जाणवते, लग्ने आपण कुठे ठरवतो? ती आधीच "ठरलेली' असतात.

खरे तर हा प्रेमभंग नव्हता, तो अपेक्षाभंग होता. तरीसुद्धा थोडक्‍यात संधी हुकल्याची हळहळ वाटतच राहिली. म्हणजे काय झाले, की वयाच्या विसाव्या वर्षी मी नोकरीला लागलो. माझी आईसुद्धा नोकरी करीत होती. तिला आमचा दोघांचा स्वयंपाकही करावा लागत असे आणि यालाच ती कंटाळली होती. म्हणूनच मी नोकरीला लागल्यावर तिने माझ्यापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. खरे तर, इतक्‍या लवकर लग्न करणे मला मान्य नव्हते. पण परिस्थितीमुळे मला तिचा प्रस्ताव मान्य करावा लागला. माझ्यासाठी तिने तिच्या दूरच्या नात्यातली मुलगी पसंत केली. मुलगी देखणी होती, पण मी तिला नाकारले. तिच्याऐवजी आईच्या मैत्रिणीची मुलगी मला पसंत होती. परंतु ती वयाने माझ्याहून दोन वर्षांनी मोठी असल्यामुळे आईने विरोध केला. मी आईला महात्मा गांधी व कस्तुरबा यांचा दाखला दिला; त्यावर ती म्हणाली, ""अशा गोष्टी थोरामोठ्यांना शोभून दिसतात, आपल्याला नाही आणि तुम्ही महात्मा गांधींकडून हेच शिकलात का?''

माझ्या मावसभावाच्या नात्यातील एक मुलगी मी पसंत केली. परंतु माझ्याविषयी काही खोटी माहिती तिच्या वडिलांच्या कानावर गेली आणि त्यांनी नकार दिला. काही दिवसांनी त्यांना खरी माहिती समजली, त्या मुलीनेही हट्ट धरला, म्हणून तिचे वडील आमच्या घरी आले. पण मी आधी दुखावला गेल्यामुळे लग्नाला नकार दिला. कोणी मला पुन्हा समजवायलाही आले नाही. मुली पाहाणे सुरूच होते. पण कोणतीच मुलगी माझ्या पसंतीस येत नव्हती आणि मला पसंत असलेली मुलगी मला पसंत करीत नव्हती.

आठ वर्षे सरकारी नोकरी केल्यानंतर मी एका सहकारी बॅंकेत नोकरीस लागलो. तेथे एका सहकाऱ्याने मला लग्नाविषयी विचारले व मुलीविषयी अपेक्षा विचारल्या. नंतर त्याने त्याच्या नात्यातील एका मुलीचे स्थळ सुचविले. ती मला पसंत पडली. परंतु दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी बॅंकेने मला नोकरीत ब्रेक दिल्याचे पत्र दिले, कारण काय तर मी उमेदवारीच्या काळात कामावर एक दिवस गैरहजर राहिलो. ही गोष्टी मुलीच्या काकांना कळली आणि त्यांनी आमचे ठरत असलेले लग्न मोडले. मी मुलीच्या काकांना भेटलो व त्यांना सहा महिने थांबायची विनंती केली. इतकेच नव्हे, तर लग्नाचा सर्व खर्च करावयाची तयारी दर्शविली. स्थळ हातचे जाऊ नये यासाठी हे एक प्रकारे आमिष होते. पण तिच्या काकांनी हे मान्य केले नाही.

सहा महिन्यांनी बॅंकेच्या नोकरीत मी कायम झालो. ते पत्र घेऊन मी माझ्या त्या सहकाऱ्याला भेटलो व त्याच्या त्या नातेवाईक मुलीला पुन्हा मागणी घातली. तो सहकारी काही वेळ सुन्न होऊन पाहत राहिला. म्हणाला, ""ते आता शक्‍य नाही. तिचे गेल्याच महिन्यात लग्न झाले. ती लग्नाला काहीशी नाखूष होती, कारण तिला तुमच्याशीच लग्न करायचे होते.'' माझा आतापर्यंत प्रेमभंग झाला नव्हता, आता मात्र अपेक्षाभंग झाला होता.

पुढे काही दिवसांनी माझ्या मावसभावाने त्याच्या मित्राच्या बहिणीचे स्थळ सुचविले. मी मुलगी पसंत केली. कारण मुली पाहण्याचे हे कार्यक्रम मला थांबवयाचे होते. माझ्या घरातल्यांनाही मुलगी पसंत पडली. तरीही याहून अधिक चांगली मुलगी हवी म्हणून आणखी मुली पाहण्याचा आग्रह घरच्यांनी धरला. घरातील मंडळी लग्न ठरविण्याच्या प्रक्रियेत वाजवीपेक्षा जास्तच हस्तक्षेप करीत होती. घरच्या मंडळींचा आणखी मुली पाहण्याचा आग्रह आमचे लग्न जमण्यात अडचण निर्माण करीत होता. घरची मंडळी ज्याला "गुड' म्हणत होती, त्याला मी "बेस्ट' म्हणत होतो. त्यामुळे त्यांच्याप्रमाणे माझ्यासाठी "बेटर' हा पर्याय नव्हता. मात्र माझ्या सुदैवाने मुलगी पाहण्याच्या या कार्यक्रमाला माझे एक परममित्र हजर होते. माझी मनःस्थिती त्यांच्या लक्षात आली आणि म्हणूनच एखाद्या समुपदेशकाच्या अभिनिवेषात व आपल्या भारदस्त आवाजात शांतपणे बोलून त्यांनी माझ्या घरच्या मंडळींना आमच्या लग्नासाठी राजी केले. खरे तर त्यांच्यामुळेच आमचे लग्न जमले. नंतर थोड्याच दिवसांत आम्ही विवाहबद्ध झालो.

लग्नासाठी मुली पाहायला लागल्यापासून लग्न होईपर्यंत दहा वर्षे गेली. या दहा वर्षांत मी एकूण एकोणीस मुली पाहिल्या. त्यातील काही तर एकमेकांना पसंत पडूनसुद्धा त्यांच्यातील एकीशीही लग्न का जमले नाही? आपण म्हणतो खरे, पण आपण लग्ने ठरवत नाहीच, लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात. आपण लग्न करून पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करायचा, खरे ना!

Web Title: arvind joshi write article in muktapeeth