मैत्रीण.कॉम

भाग्यश्री कुलकर्णी-करकमकर
गुरुवार, 9 मार्च 2017

दूर अमेरिकेत बसून "मैत्रीण.कॉम'वर जगभरच्या मराठी मैत्रिणींना एकत्र जोडले जात आहे. "मराठी तितुकी मेळवावी' असे करीत आभासी जगात मराठी स्त्रियांची समूहशक्ती उभी केली जात आहे.

दूर अमेरिकेत बसून "मैत्रीण.कॉम'वर जगभरच्या मराठी मैत्रिणींना एकत्र जोडले जात आहे. "मराठी तितुकी मेळवावी' असे करीत आभासी जगात मराठी स्त्रियांची समूहशक्ती उभी केली जात आहे.

नमस्कार,
मी "मैत्रीण.कॉम' संकेतस्थळाची संस्थापिका.
आमची टॅगलाइन आहे, "मराठी स्त्रियांची ऑनलाइन कम्युनिटी'.
"मैत्रीण.कॉम' हा जगभरातील मराठी स्त्रियांना घट्ट जोडणारा दुवा आहे.
मी मूळची पुण्याची. माझे सारे शिक्षण पुण्यातच झाले. थोड्याबहुत प्रोजेक्‍टवर काम केल्यानंतर मी लग्न करून कॅलिफोर्नियात लॉस एंजिलीस येथे स्थायिक झाले. काही काळ प्रोग्रामर ऍनॅलिस्ट म्हणून काम केले. नंतर रिकामा वेळ असताना, मराठी आंतरजालावर माझा वावर नियमित होता. काही संकेतस्थळांवर स्त्रियांसाठी खास असे विभाग होते. एका मैत्रिणीशी बोलताना जाणवले की, मराठीत स्त्रियांसाठी खास संकेतस्थळ नाही. "मग मराठीत आपणच संकेतस्थळ का सुरू करू नये?', हा मृदुला गोरे या लंडनस्थित मैत्रिणीचा सवाल मला दिशा देऊन गेला. थोड्याच दिवसांत मृदुला आणि श्रद्धा मोरे या दोघींच्या मदतीने "मैत्रीण.कॉम' उदयास आले. "मैत्रीण.कॉम'चे नक्की धोरण काय असावे, हे संकेतस्थळ काढण्यामागे आपण नक्की काय विचार करत आहोत, पुढील वाटचाल कशी करणार आहोत, यावर आमच्या भरपूर चर्चा व्हायच्या व त्यातून हळूहळू संकेतस्थळाचे स्वरूप आम्हाला उमगत गेले.

हे काम चालू करत असताना एक लक्षात आले- बऱ्याच मैत्रिणींना हा प्रश्न पडत होता की आजकालच्या समानतेच्या जमान्यात आपण फक्त स्त्रियांसाठी वेबसाइट का बरं काढत आहोत? हे एक पाऊल मागे जाणे नाही का? मला तसे अजिबात वाटत नाही. आजच्या जमान्यात मित्रमैत्रिणी असणे हे एकदमच नॉर्मल आहे. तरीदेखील आपल्या खास मैत्रिणी जमल्यावर, "गर्ल्स नाइट आउट'ला मजा येतेच ना अजूनही? तसेच हे आहे. अर्थात, मैत्रीण'चे स्वरूप इतकेच मर्यादित नाही.

महाराष्ट्र राज्य खूप मोठे आहे, तसेच इतर राज्यांतील मराठी भाषिकदेखील इतक्‍या वेगवेगळ्या ठिकाणांहून येतात. त्या त्या शहरातील, गावातील रीतीभाती वेगळ्या, त्यांच्या बोलीभाषा वेगळ्या! त्यांचे खाण्याचे पदार्थ वेगवेगळ्या चवींचे. या सर्व ठिकाणच्या मराठी स्त्रिया एके ठिकाणी आल्यावर एकमेकींना समजून घेणे, प्रादेशिक फरक जाणून घेणे, हे फार सुंदर असते. मला स्वत:ला कायम पुण्यातीलच वातावरण, खाणेपिणे ओळखीचे. पुण्याची ती ठरावीक भाषाच ओळखीची; पण "मैत्रीण'मुळे माझा ज्ञानाचा परीघ खूप वाढला. स्त्रियांचे प्रश्न जाणून घ्यायचे असतील तर सर्वप्रथम आपण सर्व प्रदेशातील स्त्रियांना समजून घेतले पाहिजे. मराठी माणसाच्या बाबतीत अन्न व साहित्य या दोन गोष्टींनी लगेच जवळीक साधली जाते. जेव्हा असा सुरेख अनुबंध तयार होतो, तेव्हाच आपण आपले काही समस्या चार लोकांशी "शेअर' करू शकतो; आणि तेव्हाच आपल्याला जास्त खोलात जाऊन अडचणींवर मात करता येते.

मैत्रीण चालू करण्यामागे स्त्रियांसाठीचा खास असा एक आधारगट असावा असे खूप मनात होते. एखादी स्त्री काही अडचणीमधून जात असेल तर तिच्यासाठी मदतीचा हात पुढे करता यावा, असे वाटत होते. अडचणी आल्या तरी बऱ्याचदा मार्ग माहीत असतो. हवा असतो तो एक "लिसनिंग इअर'! तुम्ही ज्या अडचणीला तोंड देत आहात, तिच्यामधून इतर मैत्रिणीदेखील गेल्या आहेत, किंवा तुम्ही जे मार्ग शोधात आहात तो बरोबर आहे, पुढे जाऊन सगळे ठीक होईल, हे सांगणारे कोणीतरी हवे असते. ही अपेक्षा येथे नक्कीच पुरी होते. बऱ्याच अंशी मैत्रीण ही "काउन्सेलर'सारखी ठरते. या गटात काही डॉक्‍टर, विधिज्ञ आहेत. त्या मार्गदर्शन करतात. आपल्या अगदी जवळच्या माणसाकडे मन मोकळे करावे, तसे या स्त्रियांना वाटते.
अनेक विषयांवर स्त्रिया येथे लिहीत असतात. त्यांना त्यांच्या येथील मैत्रिणींकडून कानमंत्रही मिळतात. अभ्यासक्रम चालवले जातात. काही उपक्रम होतात. सान्ता सिक्रेट, इपिगो अशा उपक्रमांना खूप प्रतिसाद मिळाला होता. इंग्रजी संभाषण शिकण्यापासून रांगोळी काढायला शिकण्यापर्यंत येथे "क्‍लास' चालतात. दर महिन्याला क्विझ असते.

लवकरच पूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात मैत्रीणचे नाव होईल, मराठी स्त्रियांसाठी एक परिपूर्ण आधारगट बनेल अशी महत्त्वाकांक्षा तसेच खात्री बाळगून मी तुमचा निरोप घेते आणि तुम्हाला "मैत्रीण.कॉम'वर येण्याचे आग्रहाचे आमंत्रणही देते.
तुमचीच मैत्रीण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhagyashree kulkarni-karkamkar write article in muktapeeth