चिदानंद रुपम शिवोहम्‌ शिवोहम्‌

मंगळवार, 30 जून 2020

आज बालक असलेला उद्या युवा होणार व परवा वृद्ध होणार. जागा असलेला पण मी, स्वप्न पाहणारा पण मी व झोपेत जगाशी फारकत घेतलेला पण मीच. परिस्थिती बदलत असते, परंतु मी तर तोच राहतो न ! मग "मी' हा कोण? या सर्व विभिन्न अवस्थेत टिकून राहिलेला, त्यांचा अनुभव घेणारा, शाश्वत असणारा मी वेगळाच कुणीतरी असला पाहिजे. मग या भ्रामक भूमिकांचे ओझे माझ्या खांद्यांवर घेऊन मी दु:खी कष्टी का होऊ? जो दिसतो खरा "तो मी नव्हेच'.

 वयाच्या आठव्या वर्षी आदि शंकराचार्य यांनी संन्यास घेतला व गुरूच्या शोधार्थ निघाले. गुरुकुलमध्ये शिकत असताना त्यांनी पतंजलींच्या महाभाष्याचे अध्ययन केले होते. आपल्या गुरूंच्या तोंडून तेव्हा ऐकलेली एक गोष्ट त्यांचा लक्षात राहिली होती. ती अशी-नर्मदा नदीच्या तटावर एका गुहेत महर्षी पतंजली एक हजार वर्षांपासून समाधी लावून बसलेले आहेत.

तेच गुरू गोविंदपाद म्हणून ओळखले जातात. आठ वर्षांचा बालक शंकर गुरूच्या शोधात उत्तरेकडे निघाला व विचारत, शोधत गुरूपर्यंत जाऊन पोहोचला. शंकर गुहेत आल्याबरोबर गुरूंची समाधी भंग पावली. ते त्याचीच वाट बघत थांबले होते. त्यांचे उद्दिष्टच शंकराचार्यांना ब्रह्मज्ञान देणे होते. त्यांनी शंकराला पाहताच ओळखलं हाच तो शिवाचा अवतार जो सनातन धर्माचा प्रसार प्रचार करेल. तरी पण त्यांनी प्रश्न विचारला बाळ, तू कोण आहेस? यावर शंकराने जे उत्तर दिलं ते सहा श्‍लोकांचं स्तोत्र, आत्म षटकम्‌ नावाने प्रसिद्ध आहे. मी कोण आहे, याचं उत्तर मी कोण नाही, यात दडलेलं आहे.
मी मन, बुद्धी, अहंकार, चित्त (चतुर्विध मनोवृत्ति) नाही, मी पंच ज्ञानेंद्रिये नाही व पंच कर्मेंद्रिये पण नाही. मी पंचमहाभूत नाही, प्राणसंज्ञा नाही. मी पंचकोष नाही, मी सप्तधातू पण नाही. मी षड्रिपू नाही, मी चार पुरुषार्थ पण नाही. मी पुण्य नाही, पाप पण नाही. मी सुख नाही, दु:ख पण नाही. मी मंत्र नाही, तीर्थ नाही, वेद नाही, यज्ञ पण नाही. मी भोजन तर नाहीच, भोज्य नाही व भोक्ता पण नाही. मी जन्म नाही, मी मृत्यू पण नाही. मी माता नाही, मी पिता पण नाही, गुरू नाही, शिष्य पण नाही. मी भाऊ नाही, मित्र पण नाही. मला बंधन नाही, तर मला मुक्ती पण नाही. हे सर्व मी नाही, मग मी आहे तरी कोण? मी निर्विकल्प, निराकार रूप, सर्वत्र व्याप्त, सर्वत्र इन्द्रियांमध्ये समाविष्ट, सत्‌ चित्‌ आनंद शिव स्वरूप आहे (शिवोहम्‌ शिवोहम्‌)

एवढ्या लहान मुलाच्या तोंडून एवढे मोठे तत्त्वज्ञान ! अर्थात तो कुणी सर्वसाधारण बालक नव्हताच. किती मजेची गोष्ट आहे नं, आपल्याला कुणी आपली ओळख विचारताच आपण त्याच सर्व गोष्टी सांगतो ज्या बालक शंकराने "मी नाही' असे सांगितले होते. मी डॉक्‍टर, मी इंजिनिअर. मी अमुक कंपनीत मोठ्या हुद्द्यावर ऑफिसर किंवा तमुक विषयाचा विद्वान प्रोफेसर. मी योगगुरू किंवा मी ज्ञानगुरू. मी गोरी, देखणी वा मी कुरूप. मी उंच, सडपातळ किंवा मी ठेंगणी, लट्ठ. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या प्रसंगात आपली ओळखसुद्धा वेगवेगळी असते. घरात मी एक गृहिणी, शाळेत मी एक शिक्षिका, मुलांसाठी आई तर आईवडिलांसाठी मुलगी. नवऱ्यासाठी बायको तर मित्र मैत्रिणींसाठी एक सखी. एकच व्यक्ती असून माझ्या कितीतरी ओळखी, कितीतरी भूमिका आहेत.

या वेगवेगळ्या भूमिका मी कुशलतेने पार पाडाव्या अशी जगाची माझ्याकडून अपेक्षा असते. एखाद्या नाटकात कुणी नट एक भूमिका करतो व दुसऱ्या नाटकात त्याची वेगळीच भूमिका असते. कधी राजा, कधी भिकारी. कधी मद्यपी तर कधी त्यागी वैरागी साधू. सर्व भूमिका जो लीलया पार पाडतो तो नट अत्यंत प्रतिभावान असल्याचे आपण म्हणतो. परंतु, तो फक्त या भूमिकांपर्यंत मर्यादित नसतो. भूमिका संपली की त्यातून तो बाहेर पडतो. कुठल्याही विशिष्ट भूमिकेत अडकत नाही. ही कला ज्याला जमली तो उत्तम नट. श्रीकृष्णाला "नटवर' याच अनुषंगाने म्हटले असेल. त्याच्या संपूर्ण चरित्रात कितीतरी भूमिका तो अत्यंत हुशारीने वठविताना दिसतो. असे असले तरी कुठल्याच भूमिकेत अडकून पडत नाही. म्हणून कुठल्याच प्रसंगी तो खिन्न, उदास किंवा विलाप करताना दिसत नाही. तर सत्‌ चित्‌ आनंद, या परम स्थितीत तो नेहमी हसतमुख व प्रसन्न चेहऱ्याचा असेच वर्णन केलेला दिसतो. ही सात्त्विकतेची खूण आहे, हे ज्ञानी माणसाचे वर्णन आहे. तो तुमच्या आमच्या सारखाच आपली नित्य नैमित्तिक कर्मे पार पाडत असतो. प्रारब्धानुसार तोही सुख, दु:ख, मानापमान यातून जातो. परंतु, कुठल्याही प्रसंगाने आपले चित्त विचलित न होऊ देता प्रसन्न असतो.

आपण मात्र आपले सुख-दुःख, मानापमान यांना आपली ओळख बनविण्यात गौरव मानतो. मी किती पुरस्कारांचा मानकरी, माझ्याजवळ किती संपत्ती, बंगले, गाड्या यासारख्या सुखकारक प्रतीत होणाऱ्या परिस्थितीचं नाही तर आपण दु:खानेसुद्धा आपली ओळख निर्माण करतो. उदाहरणार्थ मी बिचारा, लहानपणापासून गरिबीत वाढलेला किंवा अमुक आजाराने ग्रस्त कसातरी दिवस काढत असलेला इत्यादी. कारण यात आपला अहं सुखावतो. या सर्व जीवनाच्या रंगमंचावरील आपल्याला दिलेल्या केवळ भूमिका आहेत, हे मान्य करणे आपल्याला फार कठीण जातं. कुठलीही स्थिती कधीच कायम नसते. आज ज्या व्यक्तीला दोन वेळचं जेवण दुरापास्त आहे,

उद्या त्याच्या पुढ्यात रोज पंचपक्वांन्नाच्या थाळ्या असू शकतात. राजाचा रंक व्हायलासुद्धा वेळ लागत नाही. आज दु:खात कसेतरी दिवस काढत असलेल्या मनुष्याच्या पायावर उद्या सुख लोळण घालू शकते. आज बालक असलेला उद्या युवा होणार व परवा वृद्ध होणार. जागा असलेला पण मी, स्वप्न पाहणारा पण मी व झोपेत जगाशी फारकत घेतलेला पण मीच. परिस्थिती बदलत असते, परंतु मी तर तोच राहतो न ! मग "मी' हा कोण? या सर्व विभिन्न अवस्थेत टिकून राहिलेला, त्यांचा अनुभव घेणारा, शाश्वत असणारा मी वेगळाच कुणीतरी असला पाहिजे. मग या भ्रामक भूमिकांचे ओझे माझ्या खांद्यांवर घेऊन मी दु:खी कष्टी का होऊ? जो दिसतो खरा "तो मी नव्हेच'.

आत्म षटकम्‌ याला निर्वाण षटकम्‌ असेही म्हणतात. कारण हे स्तोत्र समजून घेणे निर्वाणाची प्रथम पायरी आहे. या संसारात आपल्या वाट्याला आलेल्या सर्व भूमिका यशस्वीरित्या पार पाडताना खरा मी या सर्वांचा पलीकडे आहे, ही "जाण' निर्माण होणे, हे "चिदानन्द' स्थितीकडे टाकलेले पहिले पाऊल आहे.