'आधार' कसा जोडावा?

कर्नल वि. वि. देशमुख
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

आधार कार्ड म्हणजे आपले अस्तित्व. गॅस सिलेंडर, मोबाईल, बॅंक खाते, पेन्शन खाते कुठे कुठे जोडायचे असते. मोबाईल व आधार कार्ड यांची जोडणी करताना एका निवृत्त कर्नलना आलेला हा अनुभव...

आधार कार्ड म्हणजे आपले अस्तित्व. गॅस सिलेंडर, मोबाईल, बॅंक खाते, पेन्शन खाते कुठे कुठे जोडायचे असते. मोबाईल व आधार कार्ड यांची जोडणी करताना एका निवृत्त कर्नलना आलेला हा अनुभव...

माझे वय ऐंशी वर्षे. सध्या आधार कार्ड गॅस सिलेंडर, बॅंक खाते, पेन्शन खाते इत्यादींना जोडलेले असले पाहिजे, असा आग्रह सुरू आहे. निवृत्त ज्येष्ठ नागरिक सरकारी नियम पाळण्यास नेहमीच तत्पर असतात. कारण त्यांच्या मनात थोडी धाकधूक असते, की आपण सरकारने दिलेले आदेश न पाळल्यास दिलेल्या सुविधांपासून वंचित तर होणार नाही ना? त्यामुळे आधार कार्ड सुविधांशी संलग्न करण्यास ते लगबगीने तयारीस लागतात. काही ज्येष्ठ नागरिक अगदी शांत मनाने आपले कर्तव्य बजावताना सुद्धा मी पाहिले आहेत.

जेव्हा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडण्याचा सरकारचा फतवा जाहीर झाला, तेव्हा मीसुद्धा या मोहिमेवर निघालो. लष्करात होतो, तेव्हा मोहिमा मला नवीन नव्हत्या. तर बीएसएनएल केंद्रावर गेलो. तेथे अर्ध्या-पाऊण तासानंतर माझा क्रमांक आला. काउंटरवर गेलो. एक-एक करून सर्व बोटांचे ठसे तपासून झाले. सगळ्यात "नापास' झालो. आपल्या हालचालींचा माग मिटवून पुढे जायची कला लष्करात शिकलो होतो, पण येथे अकारण ठसे मिटले. पुढे काय? विचारले तर "पुढच्या वर्षी या' असे सोपे उत्तर मिळाले. दुसऱ्या केंद्रात प्रयत्न करून बघावा म्हणून तेथून काढता पाय घेतला. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या केंद्रात गेलो. तेव्हा गौरी-गणपतीचे दिवस असल्याने त्या केंद्रातील अर्ध्या अधिक भगिनी रजेवर होत्या. मोबाईल आधारशी जोडणाऱ्या महिला कर्मचारी आल्या नसल्याने तेथेही माझे काम झाले नाही.
दरम्यान वर्तमानपत्रात बातमी वाचली - ज्यांना मोबाईल आधार कार्डला जोडायचे आहे त्यांनी सात व आठ सप्टेंबर रोजी नजीकच्या महापालिका क्षेत्रीय कार्यालयात जाऊन जोडणी करून घ्यावे. ही सुसंधी सोडायला नको म्हणून सात तारखेलाच नजीकच्या कार्यालयात गेलो, तर तिथे नोटीस होती आधार कार्ड घोले रस्त्यावरील केंद्रात आठ व नऊ तारखेला सकाळी दहा ते साडेचार दरम्यान होईल. मी फार निराश झालो व घरी परतलो. दुसऱ्या दिवशी पुन्हा घोले रस्त्यावरील केंद्रात गेलो. सोबत पत्नीही माझ्याबरोबर आली. तेथील दार त्या वेळी बंद होते म्हणून काचेच्या दारातून डोकावत वॉचमनला दार उघडायची विनंती केली. वॉचमन दार किलकिले करून म्हणाला, ""फॉर्म भरून उद्या या.'' मी म्हटले, ""अहो, फॉर्म तरी द्या.'' ""फॉर्म सकाळी आठ वाजताच संपलेत. उद्या सकाळी सातला या.''

आधार जोडणीसाठी फॉर्म भरून द्यायचा असतो व हा फॉर्म सकाळी आधी रांगेत उभे राहून घ्यायचा, बापरे, या कल्पनेनेसुद्धा माझ्या पोटात गोळा आला. विचार करतच मी परत दुसऱ्या बीएसएनएलच्या केंद्रात गेलो. तेथे आधारसंबंधी काम करणाऱ्या मॅडमना भेटलो. त्यांना येण्याचे कारण सांगितले. त्यांनी निर्विकारपणे उत्तर दिले, ""मशिन बंद आहे.'' त्यात त्यांची काहीच चूक नव्हती. पण हे आता अति झाले म्हणून आम्ही (मी व पत्नी) संबंधित विभाग प्रमुखांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी अंगुलीनिर्देश करीत साहेबांचे केबिन दाखवले. आम्ही तिथे गेल्यावर तेथील मॅडम त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यास गेल्या आहेत. तुम्ही बसा. येतीलच त्या थोड्या वेळात, असे सांगण्यात आले. दहा मिनिटे वाट पाहून आम्ही केंद्राबाहेर जाण्यास निघालो. एवढ्यात एक मॅडम माझ्या पत्नीला जवळ बोलावून म्हणाल्या, ""तुम्ही गेटबाहेर गेल्या गेल्या शेजारीच आमचे फ्रॅंचाईस आहे. तेथे एकदा प्रयत्न करून बघा.'' आम्ही लगेचच तिथे गेलो. तेथे एक युवक समोर टेबल ठेवून खुर्चीवर बसलेला होता. आम्ही त्यांना येण्याचे कारण सांगितले. ते म्हणाले, ""काका, तुम्हाला आधार कार्ड मोबाईलशी जोडून पाहिजे की मोबाईल आधारशी?'' बापरे, हा काय प्रकार आहे? ते मला माहीत नव्हते. मी म्हणालो, मला आपला मोबाईलच आधारशी जोडून दे. तो युवक म्हणाला, ""या इकडे.'' माझ्यासमोर एक यंत्र ठेवले गेले. त्या यंत्राच्या छोट्याशा खिडकीवर बोट ठेवण्यास सांगितले. तेव्हा त्या खिडकीतून लाल रंगाचे तेजोमय किरण बाहेर पडत होते. नंतर माझ्या लक्षात आले, की अशाच यंत्रावर बीएसएनएलवाल्यांनी माझ्या बोटांचे ठसे घेतले होते. काका तर्जनी ठेवताय ना ! मी तंद्रीतून एकदम जागा झालो. त्याच्या आदेशानुसार तर्जनी ठेवली. त्याने त्या यंत्रावर त्यांच्या बोटांच्या हालचाली करत काही केले अन्‌ आश्‍चर्य, माझा मोबाईल क्षणात आधार कार्डाशी जोडला गेला.

Web Title: Colonel v v deshmukh write article in muktapeeth