'कॅनव्हास'चे पंख

डॉ. आशाराणी पाटील
मंगळवार, 17 एप्रिल 2018

एका गोंडस मुलाच्या स्नायूंतील बळ संपत जाते आणि तो खुर्चीला जखडतो; पण त्याची जिद्दी आई त्याच्या कल्पनांना "कॅनव्हास'चे पंख मिळवून देण्यासाठी धडपडते. यशस्वी होते.

"मिस्टी-रोज' आर्ट गॅलरीचे उद्‌घाटन झाले आणि टाळ्यांचा गजर केला. या आर्ट गॅलरीचा निर्माता, अवघ्या सव्वीस वर्षांचा आदित्य निकम याच्या डोळ्यांत तृप्ती, आत्मविश्‍वास उमलून आला होता.
मिस्टी रोज आर्ट गॅलरी एका अवलियाची आहे. अप्रतिम पेंटिग्ज्‌.

एका गोंडस मुलाच्या स्नायूंतील बळ संपत जाते आणि तो खुर्चीला जखडतो; पण त्याची जिद्दी आई त्याच्या कल्पनांना "कॅनव्हास'चे पंख मिळवून देण्यासाठी धडपडते. यशस्वी होते.

"मिस्टी-रोज' आर्ट गॅलरीचे उद्‌घाटन झाले आणि टाळ्यांचा गजर केला. या आर्ट गॅलरीचा निर्माता, अवघ्या सव्वीस वर्षांचा आदित्य निकम याच्या डोळ्यांत तृप्ती, आत्मविश्‍वास उमलून आला होता.
मिस्टी रोज आर्ट गॅलरी एका अवलियाची आहे. अप्रतिम पेंटिग्ज्‌.

बावीस वर्षांपूर्वीचा भूतकाळ नजरेसमोर तरळला. माझी मैत्रीण डॉ. नंदिनी निकम हिच्या मुलाला "ड्युशन्स सिंड्रोम' झाला आहे, असे कळले. ज्याच्यामध्ये हळूहळू शरीराचे स्नायू आखडू लागतात असा हा आजार. मला तर त्या आजाराबद्दल काहीच माहिती नव्हती. तिनेच सांगितले. आदित्यला पायऱ्या चढताना त्रास होतो. मध्येच तो खाली पडतो. त्याच्या पायातील शक्ती जाते आणि मग सुरू झाला त्याच्या आजाराचा शोध. अनेक तज्ज्ञांना ती भेटली. सांगली- कोल्हापूर- पुणे- मुंबई- हैदराबाद अशा वाऱ्या सुरू झाल्या. असंख्य तपासण्या झाल्या अन्‌ निदान झाले. सर्वांनाच खूप मोठा धक्का होता तो. सगळे कुटुंबच हादरले, पण तिने हार मानली नाही. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ऍलोपॅथिक, नॅचरोपॅथिक सगळे उपचार ती आणि राजन मनापासून करतच होते. ती एक डॉक्‍टर आई होती. तिचे मन त्याला बरे करण्यासाठी धडपडत होते. पण त्याच्यावर इलाज सापडत नव्हता, तिच्या कष्टाला फळ येत नव्हते. हळूहळू तो जागेवरच बसला.

अत्यंत गुणी, हुशार... त्याच्यावर नियतीने क्रूरपणे घाला घातला होता, खूप मोठा अन्याय केला होता. खरे तर दुसरे एखादे कुटुंब, पूर्णपणे हताश झाले असते. पण त्याची आई आणि तो या दुर्धर आजाराशी दोन हात करायला सज्ज झाले आणि सुरू झाली एका कलाकाराला घडविण्याची प्रक्रिया. लिहू शकत नाही म्हटल्यावर आदित्यने रायटर घेऊन दहावीची परीक्षा दिली आणि तो उत्तीर्णही झाला. त्याच्यातील कलागुण हेरून, आईने त्याला कलाविश्‍व महाविद्यालयात घातले. व्हीलचेअरवरून तो जिद्दीने सगळे पार पाडत होता. त्याच्यातील दुर्दम्य इच्छाशक्तीने त्याने जीडी आर्ट आणि डीपी-एड पूर्ण केले. त्याची प्रदर्शने सांगली आणि पुण्यातही भरवली गेली.

किती कौतुक करावे त्याच्या कलेचे? ज्याचा हात उचलू शकत नाही; पण पुढचा कॅनव्हास हवा तसा फिरवून, तो त्याच्या बोटांतून जादूप्रमाणे चित्रछटा, चेहऱ्यावरचे तरल भाव कसे उमटवतो, हेच मोठे आश्‍चर्य आहे. तो कॅनव्हासवर रंग उधळतो त्याच्या मनातले. तो त्याचे सारे विश्‍व उभे करतो त्या चित्रचौकटीत. त्याची सारी दुनिया तो रंगांमध्ये बुडवतो आणि कॅनव्हासचे पंख लावून विहार करतो. त्याची चित्रे पाहताना त्याचे हे शारीरिक दुर्बलत्व नजरेआड राहते. समोर दिसते त्याची रंगभारित प्रतिभा. त्याच्या या शारीरिक अक्षमतेमुळे त्याला चित्र पूर्ण करायला खूप वेळ लागतो; पण त्याची चिकाटी, मेहनत वाखाणण्यासारखी आहे आणि या सगळ्याच्या मागे त्याच्या आईची प्रचंड इच्छाशक्ती आहे.

काही काळ नंदिनीही डगमगली; पण हरली नाही, तर तिने फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे संकटातूनही उंच भरारी घेतली, जणू तिच्या बाळाच्या पंखात बळ भरण्यासाठीच. आज तिने तिच्या जिद्दीपुढे नियतीलाही झुकवले आणि खऱ्या अर्थी तिच्या पिल्लाला स्वतःच्या पायावर उभे केले. तिचे सगळे जगच त्याच्याभोवती फिरत असते. त्याच्यासाठी तिने दुसरे मूलही होऊ दिले नाही. त्याचे खाणे-पिणे, त्याची पथ्ये, त्याची औषधे, त्याची झोप, त्याची आवड-निवड सगळे जपतच ती स्वतःची नोकरी, घर सांभाळत होती. आज तिच्या जिद्दीला, कष्टाला, प्रबळ इच्छाशक्तीला मिळालेले सुंदर फळ म्हणजेच मिस्टीरोज आर्ट गॅलरी.

छोट्या छोट्या गोष्टींवरून नाराज होऊन जीवन संपविणाऱ्या, हातपाय धडधाकट असूनही काहीही न करता, व्यसनांच्या आहारी जाणाऱ्या तरुणांसमोर आदित्य हा एक आदर्श दीपस्तंभ ठरावा. त्याच्या आणि त्याच्या आईच्या जिद्द आणि कष्टापुढे आम्ही सर्व उपस्थित नतमस्तक झालो. एवढ्यावरच मायलेकरे थांबली नाहीत, तर आज त्याने रेखाटलेल्या चित्र प्रदर्शनाने, ज्या आर्ट गॅलरीचे उद्‌घाटन झाले, ती आर्ट गॅलरी, भविष्यात गरजू चित्रकारांना, त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन लावण्यासाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा संकल्पही त्यांनी बोलून दाखविला. किती उदात्त विचार आहे हा, किती महान आई आहे ही, जिने स्वतःच्या मुलाला तर घडविलेच; पण इथून पुढे गरजूंची आई होण्याचे, त्यांच्या स्वप्नांना खऱ्या अर्थाने सत्यात उतरविण्यासाठी, मदतीचा हात पुढे करण्याचे धाडसही दाखवले.
खरेच नंदिनी, आज तू सर्वांत श्रीमंत आई आहेस!

Web Title: dr aasharani patil write article in muktapeeth