खरा दागिना

डॉ. अपर्णा महाजन
गुरुवार, 24 जानेवारी 2019

खरा दागिना कोणता? सोन्याचा की, लखलखीत विचारांचा? सोन्यापेक्षा विचारांने सजणे महत्त्वाचे असते.

खरा दागिना कोणता? सोन्याचा की, लखलखीत विचारांचा? सोन्यापेक्षा विचारांने सजणे महत्त्वाचे असते.

नखशिखांत दागिने घालून स्त्री-पुरुष जेव्हा सजतात, तेव्हा बघणाऱ्या इतरांना नेमके काय वाटते या प्रश्नाला काही उत्तरे मिळाली. "मला दागिने पाहिजेत. कारण त्यातून आपली प्रतिष्ठा कळते. जेवढे दागिने तेवढी श्रीमंती!' दागिने घालून "मी श्रीमंत आहे' असे इतरांना दाखवण्यातून खरेच काय साध्य होते? इतरांची प्रतिक्रिया? श्रीमंतीची भीती? दुरावलेपणा? आपल्यातल्या न्यूनत्वाची जाणीव? कमीपणाची भावना? गरिबीच्या भावनेचा सल? आणि हे सारे जाण्यासाठी दागिने असण्याचा खटाटोप? दुसरे उत्तर मिळाले- "सुंदर दिसण्यासाठी.' हे अगदी बरोबरच आहे. प्रत्येकालाच आकर्षक, मोहक दिसावेसे वाटते. स्वतःला खुलवण्यासाठी फुले, धातू, मणी, पोवळे, शंख शिंपले यापासून अलंकार तयार केले. स्वतःला आणि दुसऱ्यालाही आपल्याकडे पाहून प्रसन्न वाटणे हा हेतू. छाप पाडण्यासाठी सगळेच थोड्या नजाकतीने प्रयत्न करतात. पण हे सुंदर दिसणे किती काळापुरते? तर फक्त एका नेत्रकटाक्षापुरते! नंतर उरते ते आपले व्यक्तिमत्व. लखलखीत विचारांचे, आत्मविश्वासपूर्ण वागण्याचे आणि अभिव्यक्त होण्याचे.

"सौंदर्यात भर घालण्यासाठी,' असे एक कारण असू शकते. मानेतल्या वळ्यांमध्ये रुतून बसलेले दागिने, लोंबत्या कानांमध्ये झुकलेल्या हिऱ्याच्या कुड्या, सुजलेल्या हातांवर दाबून बसलेल्या सोन्या-हिऱ्यांच्या बांगड्या, वाकता येत नाही इतके सुटलेले पोट, शरीरावर पसरलेल्या मेदाच्या लडी आणि त्यावर दागिन्यांची रेलचेल हे दृश्‍य खरेच सुंदर वाटते? सुंदर, निकोप आरोग्य, सुडौल, सुबक बांधा हेच दागिन्यांपेक्षा अधिक सुंदर दिसत नाही का? "सोन्यातील गुंतवणूक वाया जात नाही,' अजून एक उत्तर. अडचणीच्या वेळी, दागिने मोडायला कितीजण राजी असतात? उलट, आहेत ते दागिने कशाला मोडायचे? असाच विचार करून अधिक कर्ज घेतले जाते. समाजाने दागिन्यांचा हव्यास आपल्यावर लादला आहे. त्यामुळे मानसिक आणि सामाजिक असुरक्षितता, भीती निर्माण झाली आहे. दागिन्यांनी मढलेली आणि लखलखीत विचारांची अशा दोन व्यक्ती समोर आल्या तर अर्धा क्षण त्या बाह्यरूपाची दखल घेतली जाईलही; पण प्रगल्भ, वैचारिक, परिपक्व अशीच व्यक्ती लक्षात राहील.

Web Title: dr aparna mahajan write article in muktapeeth