आठवण सेनापतींची

muktapeeth
muktapeeth

तारुण्याच्या रगीमुळे ज्या "म्हाताऱ्या'ची चेष्टा केली, त्यांची ओळख पटल्यावर तरुणाई त्यांच्या चरणांशी झुकली.

नगरला आयुर्वेद महाविद्यालयात होतो. नवरात्रीच्या दिवसात केडगावच्या देवीला मित्रांबरोबर गेलो होतो. मुख्य रस्ता सोडल्यावर मंदिराकडे जाणाऱ्या वाटेला लागलो. वाटेत एक ओहोळ होता. सर्वत्र दलदल, पाण वनस्पती वाढलेल्या. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे ओहोळातून जाणाऱ्या रस्त्यावर घोट्याइतका पातळ चिखल झालेला. फक्त एक पायवाट तेवढी पाय ठेवण्यापुरती जराशी कोरडी होती. त्या पायवाटेने हळूहळू तोल सावरीत एका रांगेत पुढे सरकत होतो. पण नेमका आमच्या पुढे एक हाडकुळा म्हातारा गुडघ्याएवढे धोतर, शर्ट, घट्ट गुंड्या लावून अंगाशी फिट्ट केलेला कोट, डोक्‍यावर पांढरी टोपी, ती डोक्‍याच्या मानाने अपुरी, बळेच दाबून डोक्‍यावर बसवलेली. चष्मा, हातात काठी, त्या अवघड पायवाटेवरून तोल सावरीत कसाबसा चाललेला होता. त्याच्यामुळे आम्हा तरुणांचा खोळंबा होत होता. म्हणून आम्ही मनातून चडफडत आणि उघड उघड त्या म्हाताऱ्यावर, म्हातारपणावर कोपरखळ्या मारत खिदळत चाललो होतो. म्हाताऱ्याला झपझप चालता येईना. त्यामुळे आम्हाला पुढे जाता येईना. एकदाची दलदल संपली. आम्ही म्हाताऱ्याला ओलांडून पुढे गेलो. आमच्यातील संगमनेरचे राष्ट्र सेवा दलाचे वसंतराव बुऱ्हाडे यांनी मागे वळून पाहिले आणि ओळखले. आतापर्यंत आम्ही ज्या म्हाताऱ्याला चिडवत होतो ते प्रसिद्ध क्रांतिकारक व नंतर कट्टर गांधीवादी बनलेले सेनापती बापट होते. आता आम्हाला आमचीच लाज वाटली. आम्ही त्यांना लवून नमस्कार केला. काही मदत हवी आहे काय, विचारले. त्यांनी स्थितप्रज्ञपणे नकारार्थी मान हलवली. प्रारंभी सशस्त्र क्रांतीवर विश्‍वास असलेले, गुप्तपणे परदेशी जाऊन बॉंब बनविण्याची विद्या हस्तगत केलेले सेनापती बापट हे नंतर अपेक्षाभंग होऊन कट्टर गांधीवादी बनले. ब्रिटिश राजवटीत मुळशी धरणाच्या धरणग्रस्तांचा लढा लढल्यामुळे त्यांना "सेनापती' ही पदवी जनतेने दिली. शेवटी शेवटी वार्धक्‍यात त्यांचे वास्तव्य नगरलाच असे. एकदा तोल जाऊन पडल्यामुळे त्यांचे मनगटाचे हाड मोडले, त्या वेळी हाताच्या बोटांचा व्यायाम मी करवून घेत असे. एका महान व्यक्तीची सेवा करण्याची संधी मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com