नियती

muktapeeth
muktapeeth

काही प्रश्‍नांची उत्तरे आपल्याकडे नसतात. नियती स्वत:हून त्या प्रश्‍नांची उकल करते.

आयुष्यातल्या काही घटना भुतासारख्या मानगुटीवर बसलेल्या असतात. कितीही प्रयत्न केले तरी त्या उतरत नाहीत. अशीच काहीशी घटना माझ्या मनात आजही घर करून आहे. पावसाळ्याचे दिवस होते. एके दिवशी माझी एक जुनी पेशंट आली. तिला डायबेटिस होता. दोन वर्षांपूर्वी आली तेव्हा डावा पाय गुडघ्याच्या वरपर्यंत काळा पडला होता. पायात पू भरला होता. असा पाय ठेवणे धोक्‍याचे असते. तेव्हा डावा पाय गुडघ्याच्या वर कापण्यासाठी शस्त्रक्रिया केली. सुदैवाने संबंधित पेशंटचा डायबेटिसही आटोक्‍यात आला. जखम भरून आली.

मनमिळाऊ स्वभाव, प्रसन्न आनंदी चेहरा, इतरांना मदत करण्याची वृत्ती यामुळे तिचा हॉस्पिटलमधला काळ लक्षात राहिला. सर्व सूचना देऊन पेशंटला घरी पाठविले. सुमारे दोन वर्षांनी पेशंट परत आली. या वेळेस उजवा पाय गुडघ्यापर्यंत काळा पडला होता. पू भरून पाय सुजला होता. ती तापाने फणफणली होती. माझ्या छातीत धस्स झाले. मी ओरडलो, 'आजी काय हे? कुठे होतीस इतके दिवस?'' ती म्हणाली 'काय सांगू पोरा, माझ्या कर्माची फळं! औषधांचा खर्च परवडत नाही म्हणून मुलाने औषधे बंद केली. डायबेटिस वाढला. जखम झाली, ती चिघळली. वास यायला लागला तसे मुलाने घराबाहेर काढले. आम्ही एका पत्र्याच्या शेडमध्ये राहतो. ती रडू लागली. तिला सावरले. मी म्हणालो, 'आजी, बघतो काय करता येईल ते. मी पूर्ण प्रयत्न करेन तुला बरे करण्यासाठी.''

ऍडमिट करून तिच्यावर उपचार सुरू केले. निर्जीव पाय कापण्याची शस्त्रक्रिया केली. तिची जखम हळूहळू भरून आली. तब्येत सुधारली. तोच आनंद, प्रसन्न चेहरा. पुन्हा एकदा आम्ही सगळ्यांनी अनुभवला. डायबेटिससारखा जुना आजार मध्यंतरीच्या वर्षभरात बंद असलेली औषधे यामुळे साखरेचे प्रमाण आटोक्‍यात येईना. नियतीच्या मनात काही वेगळेच असावे. तिच्या जखमेच्या वरच्या भागातून पुन्हा पू यायला लागला. तो चिरा घेऊन काढला. पण जखम हाडापर्यंत पसरली. ताप वाढू लागला. औषधे साथ देईनासे झालीत. गुडघ्याच्या वर पाय कापण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला. आजोबांना बोलावून निर्णय सांगितला. ते आधीच खचलेले होते. त्यातून हा अजून एक धक्का. ते रडायलाच लागले.

'दोन्ही पाय नसताना हिला मी कसा सांभाळू?'' याचे उत्तर माझ्याकडे नव्हते. मी हतबल झालो. पाय कापणे एकवेळ सोपे परंतु रुग्णांना सांगणे कठीण असते.
ते म्हणाले, 'माझ्या बायकोला काही सांगू नका.'' 'असे नाही करता येणार. तिला सांगून ऑपरेशन करता येईल.'' मी म्हणालो. मन खंबीर ठेवून शेवटी मी तिला सांगितले. ती मंद हसली. म्हणाली, 'तुला काय करायचे आहे ते कर पोरा.''
दुसऱ्या दिवशी सकाळी तिचे ऑपरेशन करायचे ठरले. मी खूप अस्वस्थ होतो. तिच्याबद्दल एक प्रकारचा जिव्हाळा वाटत होता. अनेक रुग्ण आपण बरे करतो याहून ही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करतो. पण हिच्याविषयी एक अस्वस्थता जाणवत होती. तिचा हसरा चेहरा डोळ्यापुढून हलेना. रात्री उशिरा डोळा लागला.
अगदी पहाटे फोन वाजला. नाइट ड्यूटीवरची सिस्टर म्हणाली. 'सर ती पेशंट अचानक गेली.'' 'काय?'' मी किंचाळलो. 'कसे काय? अचानक कशी गेली?'' मी तिच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला.
मी सुन्न झालो. धावतच हॉस्पिटलमध्ये पोचलो. दारातच फिजिशियन भेटला. 'तीव्र हार्ट ऍटॅक आला.''
वॉर्डात गेलो. आजोबा रडत होते. ते म्हणाले, 'साहेब ती तिचे प्रश्‍न स्वतःच सोडवून गेली.'' मला वाटते नियतीने तिला मदत केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com