जुन्या खुणा

muktapeeth
muktapeeth

खूप वाटते बालपणीच्या गावी उत्तरआयुष्य कंठावे. पण मनात केवळ आठवणींची जाळीदार नक्षी.

लग्नानंतर नाशिकला जाणे सतत सायंकाळच्या सावल्यांसारखे लांबत गेले. पण, आठवणी मात्र जास्तच गडद होत गेल्या. एखादे गाव संपन्न झाले की व्यक्तीसारखे त्यालाही एक व्यक्तिमत्व येते. त्या गावाला नवाच चेहरा मोहरा मिळत जातो. नाशिकचाही पूर्ण कायापालट झाला. गावाच्या पूर्वीच्या खाणाखुणा बदलल्या आहेत नक्कीच. पण जुने नाशिक अजूनही तसेच आहे. नवे नाशिक मात्र ऑक्‍टोपस सारखे पसरत चालले आहे. पण तरीही ते मला माझे वाटते. कारण, त्या उरलेल्या खाणाखुणा जणू आमच्याशी बोलतात. त्याबद्दल एक गंमत आठवली. शिंगाडे पुलावरुन गावात येताना (नाशिक रोडवरून) उजवीकडे एक ऑटो गॅरेज आहे. त्याच्या दर्शनी भागातच एका स्टॅंडवर लाल एसटीची छोटीशी प्रतिकृती ठेवलेली आहे आणि अजूनही ती तिथेच तशीच आहे. जणू माझ्याचसाठी ती छोटीशी एसटी उभी आहे अजून. आपली जुनी ओळख जपत. वकीलवाडीचे डॉक्‍टरवाडीत रूपांतर झाले. आमचे घर जाऊन संकुल आले. पण घराच्या कोपऱ्यातला गुलमोहर दर उन्हाळ्यात त्याच्या अग्नीफुलांची पखरण करतोच. पिंपळ त्याच्या पानांच्या सळसळीने रात्र रात्र खडा पहारा दिल्याची आठवण जागवतो. अन्‌ निंब दर गुढीपाडव्याला "मी अजूनही उभा आहे, या ग पोरींनो भेटायला या' म्हणत साद घालतो. असे माझे गाव व तिथले माझे घर याच खाणाखुणातून मला खुणावत असते.

आता शहराचा "पिसारा' दाही दिशांना विस्तारला आहे. तरी...तरी तिथे जावसे वाटते. जन्मगावाची नाळ अशी सहजी तुटत नाही हेच खरे. वाटते, उर्वरित आयुष्य या इथे माझ्या गावात कंठावे, पण... ते शक्‍य नाही. म्हणूनच अशा खाणाखुणातून मी भेटत राहणार माझ्या गावाला, माझ्या जुन्या घराला! मनाच्या पिंपळ पानावर आठवणीची जाळीदार नक्षी विणीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com