छत्री चोरीला जाते!

डॉ. वसंत डोळस
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

आपली एखादी गोष्ट हरवते तेव्हा वाईट वाटते. त्या वेळी अगदी जवळची वाटणारी माणसेही काहीबाही सल्ले देत चेष्टामस्करी करीत असतात. त्याचे दुःख वस्तू हरवण्याहून अधिक असते.

आपली एखादी गोष्ट हरवते तेव्हा वाईट वाटते. त्या वेळी अगदी जवळची वाटणारी माणसेही काहीबाही सल्ले देत चेष्टामस्करी करीत असतात. त्याचे दुःख वस्तू हरवण्याहून अधिक असते.

राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात मी मराठी विषयाचा शिक्षक म्हणून सेवेत रुजू झालो. त्या वेळी माझ्याजवळ एक छत्री होती. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार मी छत्री वापरत होतो. त्यावरून "छत्रीवाले डोळस सर' अशी माझी ओळख रूढ झाली. एके दिवशी "टीचर रूम'मधून छत्री गायब झाली. कुणाला ती आवडली म्हणून आपलेपणाने आपल्या घरी घेऊन गेला? कुणी माझी टिंगल करण्यासाठी लपवून ठेवली? कुणी माझी जिरवण्यासाठी तिला पळवले? एक ना दोन किती तरी शंका मनात डोकावून गेल्या... सगळ्यांना विचारले, शिपायाकडे चौकशी केली; पण सगळे कानावर हात ठेवून मोकळे झाले. माझ्याजवळ काहीच पुरावा नसल्यामुळे मला छातीठोकपणे कुणाचे नाव घेता येईना. उगीच वाईटपणा वाट्याला यायचा.

""यावर उपाय काय करणार डोळस महाशय?'' आपल्या नाजूक काड्यांच्या सोनेरी फ्रेममधून माझ्याकडे पाहत जोशी सरांनी मला विचारले. आपला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे, आपणाला लोकांचे भविष्य चांगले सांगता येते, असा त्यांचा स्वतःविषयी समज होता. पण मला वाटते, तो गैरसमज होता. पण मी त्यांच्यापुढे तसे काहीच बोललो नाही. उलट त्यांना विचारले, ""तुमच्या ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून माझी हरवलेली छत्री सापडू शकेल का?''
त्यावर माझ्याकडे गंभीर दृष्टिक्षेप टाकीत जोशीबुवा म्हणाले, ""सध्या अशुभ ग्रहांच्या भ्रमणाचा काळ चालू आहे आणि त्यांच्या तावडीत तुम्ही व तुमची छत्री असे दोघे सापडलेले आहात!''

जोशीपुराण शांतपणे ऐकून घेतल्यावर मी त्यांना विचारले, ""जोशीबुवा, मग यावर उपाय काय?'' माझ्याकडे गंभीरपणे पाहत जोशीबुवा म्हणाले, ""अडचण आली, की उपाय हा आलाच. त्यासाठी तुम्हाला अन्नदान करावे लागेल. विद्यालयातील शिक्षकांना आपण अन्नदान केले, तर तुम्हाला अन्नदानातून पुण्यप्राप्ती होईल. पुण्यप्राप्तीमुळे तुमच्यावरील अनिष्ट ग्रहांचा प्रकोप शमेल. मग तुम्हाला छत्रीची प्राप्ती होईल!''

मी मनातल्या मनात पुटपुटलो, ""वा रे, जोशीबुवा आणि तुमचे ज्योतिषशास्त्र!''
इतक्‍यात तास झाल्याची घंटा वाजली. जो तो उठून आपापल्या तासावर गेला आणि "टीचर रूम' मोकळी झाली. मी मनाशी पक्के ठरविले. काही दिवस तरी नियमितपणे हरवलेल्या छत्रीची शोधमोहीम चालू ठेवायची. त्यानंतर दोन-तीन अध्यापिका व माझी योगायोगाने "ऑफ पिरियड'ला गाठभेट झाली. मी गप्प होतो. वृत्तपत्रात डोके खुपसून बसलो होतो. त्यावर काही तरी विषय काढायचा म्हणून दप्तरदार मॅडम म्हणाल्या, ""डोळस सर, तुमची अत्यंत जिवाभावाची सखी-शेजारिणी छत्री हरवल्याचे कळले. आम्हाला अत्यंत वाईट वाटले. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत!'' त्यावर त्यांचे बोलणे ऐकून मी मूग गिळून बसावे तसा गप्प बसलो. दातेबाई म्हणाल्या, ""काय हा वेंधळेपणा! नावाने डोळस, पण प्रत्यक्षात रातआंधळेपणा. एखादा कुणी म्हणेल, साधी छत्री सांभाळता येत नाही.''

आपल्या आजूबाजूला अशी काही जिवाभावाची आपली म्हणून ज्यांना आपण समजतो, ती संधी आल्यावर सपाटून हात मारून घेतात. याचा जसा सगळ्यांना अनुभव येतो, तसाच मला आला.
यानंतर आमचे जवळचे मित्र, पण वयाने मोठे व अनुभवी गुरव सर आत आले व म्हणाले, ""मी ज्योतिषी-बितीशी नाही. पण माझा ज्योतिषशास्त्राचा चांगला अभ्यास आहे!''
गुरव सर, हे आपले अत्यंत जवळचे आहेत. ते या बाबतीत एखादा चांगला उपाय सुचवतील, असे वाटले, म्हणून त्यांना विचारले, ""गुरव सर, माझ्या छत्रीच्या बाबतीत नेमके तुम्हाला काय वाटते?''
त्यावर ते छातीठोकपणे म्हणाले, ""तुमची छत्री कुणीतरी व्यक्ती पूर्वेला घेऊन गेला आहे. पूर्वेला शोधा म्हणजे सापडेल!''
""पूर्वेला शिरूर-पाबळ आहे. पुढे नगर आणि शेवटी सर्वांत पूर्वेला- उगवत्या सूर्याचा देश जपान!''

त्यावर गुरव सर म्हणाले, ""डोळस सर, तुम्ही अगदी जवळचे जिवाभावाचे मित्र म्हणून मी भविष्य सांगितले. तुमच्या जागी दुसरी कोणी व्यक्ती असता तर पैसे घेऊनही भविष्य सांगितले नसते!''

मनातल्या मनात पुटपुटलो, ""पैसे देऊनही तुमचे भविष्य खरे ठरले नसते!''
अशा रीतीने मी सातत्यानं तेरा दिवस छत्रीची शोधाशोध केली आणि चौदाव्या दिवशी ही शोधमोहीम थांबवली. गेल्या तेरा दिवसांच्या छत्री शोधमोहिमेत मला जे अनुभव आले, त्यावर मी लेख तयार केला. त्या लेखाला नाव दिले- "छत्री जेव्हा चोरीला जाते!'
त्या वेळी "विशाल सह्याद्री'चे संपादक अनंतराव पाटील यांचे चिरंजीव अनिल पाटील हे विनोदाला वाहिलेला दिवाळी अंक काढण्याच्या तयारीत होते. मी त्यांच्या दिवाळी अंकासाठी हा लेख पाठविला. त्यांना माझा लेख आवडला. तो त्यांनी आपल्या "प्रीतम' या दिवाळी अंकात प्रसिद्ध केला. मला मानधनाचे पन्नास रुपये तत्परतेने पाठविले. मी लगेच दुसरी छत्री विकत घेतली. पुढे उपचारांमुळे चेहऱ्यावरची त्वचा कणखर बनली. आता छत्रीची साथ सोडायला हरकत नाही, असे डॉक्‍टरांनी सांगितल्यावर मी छत्री वापरणे बंद केले.

पण छत्रीच्या आठवणी आजही मनात कायमच्या घर करून बसल्या आहेत.

Web Title: dr vasant dolas write article in muktapeeth