β फटाक्याची हौस फिटली; दिवाळी गोड झाली...

नितीन संजय यादव
बुधवार, 26 ऑक्टोबर 2016

अचानक तो पेटविलेला पावसाळा फटाका व्यवस्थित जमिनीवर उभा न केल्यामुळे खाली पडला. मी शाळेचा गणवेश शर्ट व अर्धी पॅंट घातली होती. त्या फटाक्‍यातून आलेल्या दारूमुळे माझा उजवा पाय बराचसा भाजला. 

अचानक तो पेटविलेला पावसाळा फटाका व्यवस्थित जमिनीवर उभा न केल्यामुळे खाली पडला. मी शाळेचा गणवेश शर्ट व अर्धी पॅंट घातली होती. त्या फटाक्‍यातून आलेल्या दारूमुळे माझा उजवा पाय बराचसा भाजला. 

नोव्हेंबर महिन्यातील तो दिवस. मी त्यावेळेस 7- 8 वर्षांचा होतो. सगळीकडे दिवाळी उत्सवाची लगबग सुरू होती. दिवाळी सण म्हटला, की नवीन इलेक्‍ट्रिकल वस्तू, गाडी, कपडे, लहान मुलांसाठी फटाके यांसारखी खरेदी जोरात सुरू असते. अशीच काहीशी खरेदी आम्हा लहानांसाठी आमचे चुलते करीत होते. करंजेपूल गावातून आम्ही भाऊ-बहिणींनी कपडे खरेदी करून जवळच असलेल्या सावळकर नावाच्या दुकानदार व्यक्तीकडे फटाके खरेदी करण्यासाठी आमचा मोर्चा वळविला. फटाके खरेदी करण्यापूर्वी चुलत्यांनी मागील वर्षी घराशेजारी फटाक्‍याने भाजून दोन लहान मुलांना कशी इजा झाली होती हे आम्हाला सांगितले अन्‌ फटाके खरेदी न करण्याबद्दल ते बोलले; परंतु आम्ही काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हतो.. 

आम्हाला फटाके पाहिजेतच या हट्टाला आम्ही पेटलो होतो. शेवटी त्यांनी न राहवून आम्हाला फटाके खरेदी करण्यास नेले. फटाक्‍यांच्या दुकानाजवळ जाऊन पाहतो तर काय, दुकानासमोर खूप गर्दी होती. ही गर्दी पाहून माझे चुलते मला बोलले, की आज खूपच गर्दी असल्याने उद्या निवांत फटाके खरेदी करू या! परंतु, वेळ लागला तरी चालेल, आत्ताच फटाके घ्या.. म्हणून आम्ही सारी भावंडे अडून राहिलो. काही वेळाने दुकानदार काकांनी आम्हाला काय हवे आहे ते विचारताच, चुलत्यांनी छोटी बंदूक, भुईचक्र, हवेत जाऊन फुटणारे रॉकेट बाण असे फटाके द्या म्हणून सांगितले. असे फटाके खरेदी करण्यामागचे त्यांचे कारणही तसेच होते, कारण मोठ्या फटाक्‍याने इजा होण्याची शक्‍यता असते; परंतु आम्ही तिथेच आमचा खोडकरपणा व हट्टीपणा सुरू ठेवून मोठ्या आवाजाचे अॅटमबॉम्ब, लक्ष्मीबार व पावसाळे (भुईनळा) यांसारखेच फटाके खरेदी केले. 

 

तेथील त्या दुकानदार काकांनी नवीनच आलेल्या रंगबेरंगी पावसाळा नावाच्या फटाक्‍याबद्दल मला सांगितले, की त्यातून वेगवेगळ्या रंगांचे आकर्षक असे बार हवेत उडतात. मग आम्ही त्याही प्रकारच्या फटाक्‍यांचा एक बॉक्‍स खरेदी केला. त्यातील एक फटाका कसा वाजतो म्हणून दुकानदार काकांकडून मी घेतला.चुलत्यांनी तो फटाका तेथे वाजवण्यास विरोध केला; परंतु दुकानदार बोलला, वाजवू द्या हो, लहानच बाळ; ते आत्ता वाजवणार नाही तर काय दिवाळी संपून गेल्यावर? परंतु जरासा लांब जाऊन वाजव हं बाळ..! 

मी त्यांच्या दुकानापासून जरासा दूर येऊन तो फटाका पेटविला. तो पेटवलेला फटाका व दुकान यांच्या बरोबर मध्यभागी मी उभा होतो अन्‌ अचानक तो पेटविलेला 'पावसाळा' जमिनीवर नीटसा उभा न राहिल्यामुळे खाली पडला व त्यातून निघालेली पेटलेली बरीचशी दारू माझ्या पायावर आली. मी शाळेचा गणवेश शर्ट व अर्धी पॅंट घातली होती. त्या फटाक्‍यातून आलेल्या दारूमुळे माझा उजवा पाय बराचसा भाजला. नशीब बलवत्तर व मी मध्येच उभा असल्याने त्या फटाक्‍यातून आलेली पेटलेली दारू त्या फटाका दुकानावर न जाता माझ्या पायावर आली होती. आजही कधी कधी मनात विचार येतो, की जर फटाक्‍यामधील दारू माझ्या पायावर न येता सरळ फटाका दुकानावर गेली असती तर... 

ऐन दिवाळीत जे जिवावर आलं ते पायावर निभावलं. अन्‌ तेव्हापासून मनाशी एक निश्‍चय केला, की यापुढे कधीही फटाके वाजवणार नाही. मनात विचार आला, चुलते सांगत होते ते ऐकले असते तर पायाला भाजूनच घेतले नसते. पण पुन्हा मन स्वत:शीच म्हणाले, "अनुभवाशिवाय दुसरा श्रेष्ठ गुरू नाही हे म्हणतात ते खरेच. अन्‌ त्यानंतर त्या अपघातातून सावरून यापुढे फटाकेविरहित दिवाळी साजरी करण्याचा निर्धार करून माझी ती दिवाळी गोड झाली...! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fireworks and diwali celebrations

टॅग्स