पक्के वैरी झाले सख्खे...

नितीन यादव
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

गेली 4 ते 5 वर्षे एकमेकांकडे चुकूनही न पाहणारे व जमिनीचा वाद असल्याने कायमचे हितशत्रू झालेले सख्खे भाऊ योगायोगाने अचानक एकमेकांसमोर आले. गाणी सुरू होती. आपला अहंकार कायमचा बाजूला ठेवून जो-तो समोरच्या व्यक्तीला देव मानून गळाभेट घेत होता व स्वतःतील देहभान विसरून स्वतःचा शोध घेत होता,..

गेल्या 16 वर्षांहून जास्त स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कराड येथील घारेवाडी या छोट्याशा गावात ज्येष्ठ समाजसेवक व कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या शिवम या सामाजिक संस्थेतर्फे समाजातील तरुण-तरुणींसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरास सोमेश्‍वरनगरमधील मित्रांसमवेत गेलो होतो. शिबिराबद्दल खूप काही ऐकून होतो. या तीन दिवस चालणाऱ्या शिबिरात प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांना निमंत्रित करून त्यांच्या आयुष्याचा संघर्षमय जीवनपट ते सर्व सहभागी झालेल्या सुमारे 5 ते 6 हजार तरुणांसमोर उलगडून दाखवीत होते.

यामध्ये ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अनिल बोकील, प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक यजुर्वेंद्र महाजन, आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर, युवा जिल्हाधिकारी सागर डोईफोडे, आपला पुत्र देशाच्या युद्धात गमावूनही सध्या भारतीय सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांसाठी अहोरात्र धडपडणाऱ्या शहीद कॅप्टन विनायक गोरे यांची वीरमाता अनुराधा गोरे, शहीद नितीन कोळी, कुणाल गोसावी यांचे वीरमाता-पिता व वीरपत्नी, ज्येष्ठ पत्रकार उज्ज्वला धर पाटील, ज्येष्ठ समाजसेविका मालतीबाई जोशी व अन्य व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा या शिबिरात समावेश होता. महाराष्ट्रातील विविध भागांतील विद्यार्थी व तरुण यामध्ये सहभागी होत असतात.

तीन दिवसांचे शिबिर आटोपून शिबिराच्या अंतिम सत्रात शिबिराचे मुख्य संयोजक इंद्रजित देशमुख यांच्या समारोपाच्या व्याख्यानानंतर या शिबिरात नारायण आरती नावाचा प्रकार अनुभवत होतो. या नारायण आरतीमध्ये सहभागी झालेले सर्व तरुण-तरुणी मंडपात दोन रांगांमध्ये एकमेकांसमोर उभे राहतात. एकमेकांसमोर उभे ठाकल्यानंतर एक देशभक्तीपर, एक आत्मविश्‍वास वाढविणारे व एक आई-वडिलांच्या प्रेमावरील अशी तीन गीते ऐकविले जातात. उभे असणाऱ्या सर्व सहभागी तरुण-तरुणींच्या हातात प्रसाद म्हणून लाह्या दिल्या जातात. सर्वांना डोळे मिटायला सांगितले जाते अन्‌ आजपर्यंत आपल्याकडून ज्यांचे मन दुखावले गेलेय, ज्यांना आपल्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्रास झालाय त्यांची डोळे झाकून माफी मागितली जाते अन्‌ या पुढील काळात आपल्या हातून कोणत्याही परिस्थितीत अशी चूक होणार नाही, ही खूणगाठ मनाशी बांधली जाते.

स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या उक्तीप्रमाणे दगडांत देव शोधत बसण्यापेक्षा जिवंत लोकांमध्ये देव पाहा यानुसार प्रत्येकाने आपल्या समोर असणाऱ्या व्यक्तीला परमेश्‍वर मानून त्याला अलिंगन दिले व हातात असणाऱ्या लाह्या भरवून एकमेकांच्या पाया पडून व नतमस्तक होऊन 'आपल्यातील अहंकार कायमचा नष्ट होऊ दे' या प्रार्थनेने जो तो एकमेकांना अलिंगन देऊन पूर्ण मनाने सहभागी झाला.
योगायोग असा, की या शिबिरात गेली 4 ते 5 वर्षे एकमेकांकडे चुकूनही न पाहणारे व जमिनीचा वाद असल्याने कायमचे हितशत्रू झालेले सख्खे भाऊ योगायोगाने अचानक एकमेकांसमोर आले. गाणी सुरू होती. आपला अहंकार कायमचा बाजूला ठेवून जो-तो समोरच्या व्यक्तीला देव मानून गळाभेट घेत होता व स्वतःतील देहभान विसरून स्वतःचा शोध घेत होता, असाच स्वःचा शोध हे दोघेही घेऊ लागले अन्‌ फक्त काही क्षुल्लक गोष्टींमुळे आपण कसे कायमचे दुरावलो होतो. हा विचार करून एकमेकांच्या समोर नतमस्तक झाले अन्‌ गळाभेट घेऊन धाय मोकळून रडू लागले... आणि काहीही झाले तरी तात्पुरत्या नश्‍वर गोष्टींच्या आहारी जाऊन यापुढे हक्काचे नाते तोडणार नाही याची खूणगाठ बांधून आपल्या घरी आनंदाने एकत्र रवाना झाले. हा त्यांचा स्वअनुभव जेव्हा मला समजला, तेव्हा मीही त्यांच्यासमोर नतमस्तक झालो.
आम्हीही सर्वजण इतरांप्रमाणेच हे पॉझेटिव्ह एनर्जीचे टॉनिक घेऊन पुढच्या वर्षी अशा सुंदर शिबिरात न चुकता सहभागी होण्याची व अहंकारमुक्त आयुष्य जगण्याची खूणगाठ बांधून घरी मार्गस्थ झालो...!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: foes became friends