आला देव धावोनी

निशिकांत दामोदर गुमास्ते
सोमवार, 23 जानेवारी 2017

वडिलांना एसटीतच अस्वस्थ वाटू लागले. कंडक्‍टरने समयसूचकतेने थेट रुग्णालयातच गाडी नेली. नंतर आत्याचा जावई धावून आला. देव धावून आल्याचा अनुभव आम्ही त्या संकटात घेतला.

वडिलांना एसटीतच अस्वस्थ वाटू लागले. कंडक्‍टरने समयसूचकतेने थेट रुग्णालयातच गाडी नेली. नंतर आत्याचा जावई धावून आला. देव धावून आल्याचा अनुभव आम्ही त्या संकटात घेतला.

माझे वडील सांगलीतील एक लग्न उरकून एका मुंजीसाठी कोल्हापूरला जात होते. दुपारी जेवण उरकून लगेचच निघाले होते. जेवणात जिलेबी, मठ्ठा मनसोक्त घेतला होता. त्या वेळी सांगलीची जिलेबी खूपच प्रसिद्ध होती. वडिलांना थोडा पित्ताचा त्रास होता. त्यामुळे तासाभाराने त्यांना पोटांत मळमळ सुरू झाली. सोबत आई होती; तिने पुरचुंडीतून एक लवंग व थोडी बडीशेप काढून दिली. थोडावेळ बरे वाटले; पण काही वेळाने त्यांना परत मळमळ सुरू झाली. त्यांनी कंडक्‍टरकडून उलटीसाठी पिशवी मागून घेतली; पण उलटीही होईना. अस्वस्थता वाढली. दरदरून घाम सुटला. खिडकीजवळची जागा दिली, पण वारा आला की तेवढ्यापुरते बरे वाटे. असे अर्धा पाऊण तास चालले होते. शेवटी एकदाची भली मोठी उलटी झाली; पण उलटीच्या शेवटी थोडे रक्त पडले. ते कंडक्‍टरने पाहिले व त्याने समय सूचकता दाखवून एस. टी. स्टॅंडवर न थांबवता थेट सी. पी. आर. हॉस्पिटलपाशी बस नेली. कंडक्‍टरने त्यांना तातडीच्या सेवेसाठी असलेल्या ठिकाणी नेले.
वडिलांना तेथे अतिदक्षता विभागात ऍडमिट करून घेतले. आई एकटीच सोबत होती; ती पण थोडी घाबरली होती. डॉक्‍टरांनी आमच्या कोल्हापूरच्या नातेवाइकांना फोन करून बोलावून घेतले, त्यांच्या घरी मुंजीचे कार्य असूनसुद्धा ते तत्परतेने धावत आले. उपचार सुरू करून थोडे स्थिरस्थावर झाल्यावर नातेवाइकांनी मला फोन केला. त्या वेळी मी कराडला एका खासगी हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापक होतो. रोजचे दैनंदिन हिशेब पूर्ण करण्याचे काम चालू होते. रात्रीचे साडेदहा वाजले होते. महिनाअखेर चालू होती. माझ्याकडे जेमतेम साठ-सत्तर रुपये होते. रात्रपाळीतल्या एका सोबत्याने तीस रुपये दिले.
कराडमध्ये माझी मोठी आत्या राहात होती. तिच्याकडे माझी छोटी बहीण राहात होती. सगळे आवरून मी बॅग घेतली व आत्याच्या घरी गेलो व आत्याला सांगून निघायचे म्हणून तिच्या घरी गेलो. एवढ्या रात्री मला पाहून ती पण घाबरून गेली. मी तिला शांतपणे सर्व सांगितले. तब्येत पाहून तुला कळवतो, असे म्हणालो; पण मला एकट्याला ती जाऊ देईना. कमीत कमी बहीण रेखाला सोबत घेऊन जा, असे म्हणाली. मी टाळू लागलो, पण ती ऐकेचना. बर आत्त्याला पैसे कसे मागायचे, हा मोठा प्रश्‍न माझ्या पुढे होता. शेवटी धाडस करून मी बहिणीस नेण्यास तयार झालो.
पाहू काय ते, एखादा ट्रकवाला कमी पैशात नेण्यास तयार होईलसुद्धा; पण रात्री-बेरात्री बहिणीला घेऊन जायचे म्हणजे जोखीमच. चिंतेत असतानाच मी स्टॅंडवर पोचलो. समोरच कोल्हापूरची गाडी उभी होती; पण बसमध्ये बसू का नको? कंडक्‍टर काही मदत करेल का? या विचारात असताना खांद्यावर हात पडला. आत्याचे जावई पळत पळत आले होते. ""अरे, वडील ऍडमिट आहेत, पैसे-पाणी लागतील, काही व्यवस्था केलीस का?'' असे म्हणत त्यांनी हातातले एक हजार रुपये माझ्या खिशात कोंबले, त्याच वेळी इतका वेळ दाटलेला उमासा बाहेर पडला. मी मेहुण्यांना मिठी मारून ओक्‍साबोक्‍सी रडू लागलो. माझे अंतःकरणातील गाऱ्हाणे ऐकून देविदासाच्या रूपाने देवच माझ्या मदतीला धावून आला होता. क्षणात माझ्या डोक्‍यावरचे मणाचे ओझे उतरले. जीव हलका हलका वाटू लागला होता. मेहुण्यांचे पुन्हा पुन्हा आभार मानत मी एसटीत चढलो व कोल्हापूरला रवाना झालो.
तेथील सिस्टर ना भेटलो तर त्यांनी दोन-तीन बाटल्या रक्त व एक किलो बर्फ ताबडतोब आणण्यास सांगितले. मी तेथील लॅबमध्ये गेलो. पहाटेची वेळ होती. टेक्‍निशियन साखर झोपेतच होता. त्याला झोपेतून उठवले. त्याची क्षमा मागितली व चिठ्ठी दाखवली. त्याने कोल्हापूरमधील सर्व ब्लड बॅंकांना फोन लावले; पण त्या ग्रुपचे रक्त कोठेच शिल्लक नव्हते. तो म्हणाला, ""तुम्हाला मिरजेहून रक्त आणावे लागेल.'' झाले दुष्काळात तेरावा महिना म्हणतात ना तसे झाले, मी त्याला माझे रक्त देऊन क्रॉस मॅच होतेय का पाहण्यास सांगितले. सुदैवाने ते जुळले, मग त्याला माझी एक बाटली घेण्यास सांगितले. त्याने लगेच कार्यवाही केली. अर्ध्या तासात मी सिस्टरना रक्त नेऊन दिले. पाच-दहा मिनिटे थांबून कॉफी-बिस्किटे घेऊन पुढच्या कामास निघालो. फिरत फिरत पुढच्या चौकांत गेलो. तेथे एक दुधाची डेअरी होती, त्या मालकाला मी सर्व हकीकत सांगितली. त्याने लगेच बर्फ दिला, बिचाऱ्याने त्याचे पैसेसुद्धा घेतले नाहीत, बर्फ सिस्टरना नेऊन दिला. आता थोडी उसंत मिळाली होती.
मग मी बहिणीला घेऊन लॅबमध्ये गेलो. तिचेही रक्त जुळले. मग तिच्या रक्ताची बाटलीही सिस्टरना नेऊन दिली. यथावकाश दोन दिवसांत वडिलांची तब्बेत चांगली झाली व त्यांना डिस्चार्ज दिला. आधी कंडक्‍टरच्या रूपाने, नंतर मेहुण्याच्या रूपाने, दूधवाल्याच्या रूपाने देवच मदतीला धावून आला होता.

 

Web Title: god help me