आजीचा श्रावणी शुक्रवार

हृषीकेश भातखंडे
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

श्रावणी शुक्रवारी ओवाळणे हे आजीसाठी एक "सेलिब्रेशन' असायचे. दोन मिनिटांचा हा कार्यक्रम तिच्यासाठी खूप मोठा होता. यापुढचे श्रावणी शुक्रवार तिच्याकडून ओवाळून न घेताच जाणार आहेत.

नोकरीवरून घरी येऊन बूट काढून बॅग ठेवायचा अवकाश, की कानांवर हाक यायची - ""ए, लवकर हातपाय धुऊन ये, ओवाळायचं आहे ना!''

श्रावणी शुक्रवारी ओवाळणे हे आजीसाठी एक "सेलिब्रेशन' असायचे. दोन मिनिटांचा हा कार्यक्रम तिच्यासाठी खूप मोठा होता. यापुढचे श्रावणी शुक्रवार तिच्याकडून ओवाळून न घेताच जाणार आहेत.

नोकरीवरून घरी येऊन बूट काढून बॅग ठेवायचा अवकाश, की कानांवर हाक यायची - ""ए, लवकर हातपाय धुऊन ये, ओवाळायचं आहे ना!''

श्रावणात येणाऱ्या शुक्रवारांना आजीने ओवाळणे हे आमच्या घरातील महत्त्वाचे कार्य असे. लहान असताना आजी मला व माझ्या चुलतभावाला ओवाळायची तेव्हा "श्रावणातल्या ओवाळण्याला पैसे मिळणार नाहीत हं', या तिच्या बोलण्याची आम्हाला गंमत वाटत असे. पुढे थोडे मोठे झाल्यावर कधी कधी "तुझी आजी काय श्रीमंत नाही बाबा, असती तर दिलेही असते पैसे' असा गमतीतला टोमणाही ऐकायला मिळायचा. वय वाढून नोकरीला लागल्यावरही तिच्या थरथरत्या हातांनी कपाळाला कुंकू लावून घेणे कधी चुकले नाही.

श्रावणातल्या शुक्रवारी किंवा वाढदिवसाच्या दिवशी नातवंडांना ओवाळणे ही आजीसाठी फार मोठी गोष्ट होती. तिच्या दिवसभर घरी असलेल्या एकट्या मनाला एखाद्या समारंभाला लागावी एवढी ओढ ओवाळण्यासाठी लागलेली असायची. म्हणूनच की काय घरी पाऊल ठेवल्या ठेवल्या ती "ओवाळायचंय, आठवण आहे ना?' असे मागे लागायची. "दोन मिनिटांचे तर काम आहे, मग तू मोकळा. मग बस परत टीव्हीसमोर किंवा तुझ्या त्या कॉम्प्युटरसमोर. पण आधी ओवाळायला ये.'
मी हातपाय धुऊन कपडे बदलून बाहेरच्या खोलीत येईपर्यंत आजीची तयारी झालेली असायची. ताम्हनात दोन निरांजने, त्यात तिने स्वत: बनविलेल्या वाती तुपात खोचलेल्या, अक्षता, अंगठी, हळदी-कुंकवाची कोयरी, इत्यादी. ओवाळण्याची दिशा ठरलेली, त्याप्रमाणे खुर्ची लावलेली असायची. तिचे ओवाळून झाले, की मग आई ओवाळणार. तिचा हा क्रम कधी कोणाला चुकवावासा वाटला नाही. पाच मिनिटांच्या या कार्यक्रमानंतरचा तिच्या चेहऱ्यावरचा कार्यसिद्धीचा भाव बघण्यासारखा असायचा.
माझ्या आजीचे एकंदरीत वागणे स्वभावानुसार, प्रकृतीनुसार आणि तिच्या लहानपणीच्या घरातील परिस्थितीनुसार राकट स्वरूपाचे होते. तिचे बोलणे-चालणे, प्रेम व्यक्त करणे, सर्व काही राकट. पण ती ओवाळत असताना तिचे मृदू स्त्रीरूप खुलून दिसायचे. ताम्हण धरलेले तिचे नाजूक हात शोभून दिसायचे. एखादवेळेला कधी काही वादविवाद होऊन आजी रुसलेली असेल, तरी ओवाळायच्या वेळी तिची मुद्रा प्रसन्न असायची. ती ओवाळत असताना मी तिच्याकडे बघून मंद हसायचो, तशी ती पण हसायची. ओवाळून झाले, की सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे नमस्कार! वाकून नमस्कार केला की ती कधी कधी वाकलेल्या पाठीत धपाटा घालायची. एकंदरीतच ओवाळण्याचा कार्यक्रम हे तिच्यासाठी एक प्रकारचे "सेलिब्रेशन' असायचे.
अशाच एका श्रावणातली एक गंमत आठवते. काही वर्षांपूर्वी पाऊस खूप झाला होता आणि नदीला पूर आला होता. मी कॉलेजमध्ये शिकत होतो. मी कॉलेज करून घरी आलो होतो आणि अचानक आजी म्हणाली, ""नदीला पूर आलाय ना? मला बघायचाय. मला घेऊन चल.''

मी आश्‍चर्यचकीत होऊन तिला म्हणालो, ""अगं, खूप पूर आलाय. अजून दोन दिवस पाऊस पडला तर पूल बंद करतील.''
""मी कुठे म्हणतीये, मला कुठला पूल ओलांडायचाय. लांबूनच तर बघायचाय.''
मग त्या दिवशी मी तिला रिक्षाने संभाजी पुलापाशी घेऊन गेलो. पुलावरून तिला पाणी दाखवले. ती त्या पाण्याकडे पाच- दहा मिनिटे कौतुकाने बघत राहिली. तिचे समाधान झाल्यावर मला म्हणाली, ""चल, जाऊया.'' मला खूप गंमत वाटली होती तिच्या या लहान मुलाला शोभेल अशा वागण्याची. मला समाधानही वाटले होते तिचा हट्ट पुरवल्याचे.

गेल्या वर्षी आजीचा घरातला लहान मुलासारखा असणारा वावर एकाएकी समाप्त झाला. श्रावण आला. दिवसभरच्या व्यापात विसरलो होतो, पण ऑफिसमधून घरी आल्यावर मला जाणवले, की तो श्रावणातला पहिला शुक्रवार होता आणि आजी नव्हती. आईने तयारी केली होती. जिवतीचा कागद देव्हाऱ्यात लावला होता. नैवेद्य केला होता. आईने व पत्नीने पूजा केली होती. ओवाळून झाल्यावर मी खोलीत आलो. आजीच्या फोटोसमोर उभा राहिलो. आजीची तीव्र आठवण झाली. तिचे श्रावणी शुक्रवारचे ओवाळणे परत कधीच मिळणार नव्हते. कपाळाला कुंकवाचा स्पर्श हवा होता, केसांना अक्षतांचा, पाठीला आजीच्या आशीर्वादांचा! आजी ओवाळायची तेव्हा अंगठी ताम्हनात परत ठेवताना एक मंजुळ आवाज व्हायचा. कानांना तो आवाज हवा होता अंगठी ताम्हनात ठेवल्याचा. वाटले, की आताही ती म्हणते आहे, ""बघ, सांगत होते की नाही तुला, दोनच मिनिटांचे काम आहे.''

तिला काय कल्पना त्या दोन मिनिटांसाठी मी आता किती आसुसलेला होतो!

Web Title: hrishikesh bhatkhande write article in muktapeeth