उत्तरवाहिनी परिक्रमा

हृषीकेश रमेश ओझा
शनिवार, 6 मे 2017

"नर्मदेऽ हर' असा नारा देत नर्मदा नदीची परिक्रमा केली जाते. पण सर्वांनाच पूर्ण परिक्रमा शक्‍य होत नाही. त्यांच्यासाठी उत्तरवाहिनी परिक्रमा हा एक पर्याय आहे. मात्र तिलकवाडा ते रामपुरा परिसरातील ही परिक्रमा केवळ चैत्रातच असते.

"नर्मदेऽ हर' असा नारा देत नर्मदा नदीची परिक्रमा केली जाते. पण सर्वांनाच पूर्ण परिक्रमा शक्‍य होत नाही. त्यांच्यासाठी उत्तरवाहिनी परिक्रमा हा एक पर्याय आहे. मात्र तिलकवाडा ते रामपुरा परिसरातील ही परिक्रमा केवळ चैत्रातच असते.

परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा. आपल्या आराध्य दैवताला उजव्या बाजूला ठेवून केलेली प्रदक्षिणा म्हणजे परिक्रमा. अशीच नर्मदामैयाची पूर्ण परिक्रमा ही साधारण छत्तीसशे किलोमीटरची आहे. पूर्ण परिक्रमा पायी करणे हे फार कठीण व खडतर आहे. ज्यांना ही पूर्ण परिक्रमा शक्‍य नाही, त्यांच्यासाठी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा हाही पर्याय आहे. ही परिक्रमा गुजरात येथील "तिलकवाडा' येथून सुरवात होते. तिलकवाडा ते रामपुरा या परिसरात फक्त चैत्र महिन्यात ही उत्तरवाहिनी परिक्रमा केली जाते. जो कुणी चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करेल, त्याला संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळेल, असे नर्मदा पुराणामध्ये व स्कंद पुराणामध्ये म्हटले आहे.

ही परिक्रमा तिलकवाडा येथून उत्तर तटावरून सुरू होते, उत्तर तट संपल्यावर नावेने समोरील तीरावर म्हणजे दक्षिण तट रामपुरा येथे यावे लागते. येथे आल्यावर प्रथम घाटावर स्नान करून तेथील नर्मदामैयाचे जल घेऊन घाटावरील तीर्थेश्‍वर महादेव मंदिरात शंकराच्या पिंडीवर अर्पण करून दक्षिण तटावरून परिक्रमा चालू होते. दक्षिणतट पूर्ण झाल्यावर नावेने पुन्हा उत्तर तटावर आल्यावर स्नान करून परिक्रमेची समाप्ती होते. अशी ही साधारण 21 किलोमीटरची परिक्रमा आहे. परिक्रमा मार्गात छोट्या गावातून जाताना काही मंदिरे, आश्रम लागतात. जागोजागी नर्मदे हर...नर्मदे हर... असे म्हणून स्वागत होते. गावातील काही मंडळी परिक्रमावासींसाठी थंड पाणी, सरबत, चहा, फळे किंवा छास अशी सेवा देतात. परिक्रमा मार्गातील उत्तरतट रस्ता म्हणजे गावातून जाणारा, तसेच किनाऱ्यावरून जाणारा आहे. काही ठिकाणी वाट बिकट आहे. पण कसलाही त्रास न होता आपण आरामात उतर तट पार करतो. या उलट दक्षिण तट मार्ग बहुतांश डांबरी सडक आहे. दक्षिण तटावरील रामपुरा घाटावर तीर्थेश्‍वर महादेव मंदिर आहे. येथे राधागिरी माताजी परिक्रमावासींची बालभोग म्हणजे नाश्‍ता व भोजनाची व्यवस्था करतात. येथे बालभोग घेऊन आपली पुढे वाटचाल सुरू राहते. वाटेत मांगरोल नावाचे एक छोटे गाव लागते. गावातील लोक मिळून परिक्रमावासींची सेवा करतात. येथे मोठ्या मंडपात परिक्रमावासींच्या विश्रामासाठी व्यवस्था केली जाते. या मंडळाचे नाव आहे विसाओ मांगरोल मंडल. मंडळाचे कार्यकर्ते फार सेवाभावी आहेत. तिथून पुढे लागतो तपोवन आश्रम. या आश्रमामध्ये परिक्रमावासींसाठी छास सेवा देतात आणि त्या पुढे सर्वांत शेवटी लागतो, श्रीसीताराम बाबांचा आश्रम. आश्रमाचा परिसर फार सुंदर व रमणीय आहे. आश्रमातून समोरच मैयाचे दर्शन होते. येथे दुपारचा भोजनप्रसाद घेऊन विश्राम करून आपली दक्षिणतट परिक्रमा संपते.

नर्मदामैयाच्या तीरावरील राहणाऱ्या लोकांची मैयावर नितांत श्रद्धा आहे. अगदी नावाड्यापासून ते नर्मदामैयाच्या तीरावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची सर्वांची भावना हीच की, नर्मदामाई आमची जीवनदायिनी आहे. गावातील घरोघरी नळ योजना असतानाही बहुतेक जण पाणी पिण्यासाठी आवर्जून नर्मदामैयाचे जल भरतात. ज्याच्या घरी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत तोसुद्धा अगदी "नर्मदे हर बाबाजी चाय पिओ, भोजनप्रसादी पाओ' असे आग्रहपूर्वक विनंती करतो. परिक्रमावासीबद्दलचा आदर पाहून आपण आश्‍चर्यचकित होतो. किनाऱ्यावरून सकाळी परिक्रमेला जाताना मंदिरात होणारा घंटानाद, जागोजागी आश्रमात होणारे स्वागत, छोट्या गावांतून जाताना तटावरची संस्कृती पाहता नर्मदामैयाच्या सान्निध्यात आपली परिक्रमा कधी पूर्ण होते ते समजतच नाही. या परिक्रमेत पवित्र नर्मदामैयाचे स्नान व दर्शन घडते. पायी परिक्रमा केल्याचा आनंद मिळतो, तसेच भविष्यात पूर्ण परिक्रमा करण्याची इच्छा जागृत होते. परिक्रमा पूर्ण झाल्यावर सायंकाळी कन्यापूजन केले जाते. नर्मदामैया ही कुमारी आहे. त्यामुळे परिक्रमा झाल्यावर कन्यापूजन करतात. कन्यापूजनामध्ये मैया छोट्या कन्येच्या रूपात आपल्याला दर्शन देते, असे मानतात. गावातील आदिवासी घरच्या छोट्या कन्यांना आमंत्रित केले जाते. त्यांना भेटवस्तू व दान दक्षिणा दिली जाते. मुलींना ओवाळताना साक्षात समोर नर्मदामैया आशीर्वाद देण्यासाठी आल्याची अनुभूती येते. या परिक्रमेसोबत जवळील गरुडेश्‍वर येथील श्रीवासुदेवानंद टेंबे स्वामी महाराज यांच्या समाधीचे दर्शन, नारेश्‍वर येथील श्रीरंगावधूतजी महाराज यांचे समाधी दर्शन, अनसूया येथील दत्तप्रभूंच्या आईचे स्थान, कर्नाळी-कुबरे भंडारी येथील कुबेराचे मंदिर व कोटेश्‍वर या पवित्र दत्तस्थानांचे दर्शन घेण्याचा योग येतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hrishikesh oza write article in muktapeeth