वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञानर्षी

जयराम देसाई
मंगळवार, 10 एप्रिल 2018

ग्रामवैद्य हा धन्वंतरी असतोच, पण त्याचबरोबर तो त्या रुग्णाच्या साऱ्या कुटुंबाचाच वडीलधारी स्नेही असतो. त्या अर्थाने डॉ. ह. वि. सरदेसाई पुण्याचे "ग्रामवैद्य' आहेत.

ग्रामवैद्य हा धन्वंतरी असतोच, पण त्याचबरोबर तो त्या रुग्णाच्या साऱ्या कुटुंबाचाच वडीलधारी स्नेही असतो. त्या अर्थाने डॉ. ह. वि. सरदेसाई पुण्याचे "ग्रामवैद्य' आहेत.

निष्णात डॉक्‍टर म्हणून एव्हाना त्यांची ख्याती झाली होती. वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम शिक्षक म्हणून ते डॉक्‍टरांच्या नव्या पिढीत प्रिय झाले होते. पुण्यात प्रतिष्ठा मिळालेल्या या डॉक्‍टरांना एक ज्येष्ठ उद्योगपती भेटले. ते त्यांच्या वडिलांचे मित्र होते. वडील गेल्यानंतर त्यांची अचानक भेट झालेली. त्या उद्योगपतींनी विचारले, ""आता आई तुझ्याकडेच असते ना? "" डॉक्‍टर म्हणाले, ""नाही. मी एवढा मोठा झालो नाही, की आई माझ्याकडे राहील. मी आईकडे राहतो.'' हा नम्रपणा आई-वडिलांकडूनच मिळालेला संस्कार आहे, असे डॉ. एच. व्ही. सरदेसाई सांगतात. शांतपणे दुसऱ्याचे ऐकून घ्यायचे, त्याला समजून घ्यायचे, जे त्याला सांगायचे ते समजावून सांगायचे. त्याच्या शंका फिटेपर्यंत समजावून सांगायचे. सूचना सविस्तर व स्पष्टपणे करायच्या. हा आईच्या स्वभावातून डॉ. सरदेसाईंकडे आलेला वारसा आहे, असे ते सांगतात.

डॉ. सरदेसाई यांचा विशेष काय? ते रुग्णासाठी डॉक्‍टर असतातच, पण ते त्या रुग्णाचे वडीलधारे स्नेहीही असतात. डॉक्‍टर पहिल्यापासूनच हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते. येथील विद्यापीठांतून त्यांनी सर्व परीक्षांमध्ये पहिला क्रमांक मिळवला होताच, पण इंग्लंडमधील रॉयल कॉलेजमध्येही त्यांनी विक्रम केला आहे. त्याकाळी एम. आर. सी. पी. ही सर्वोच्च परीक्षा होती. ती पदवी केवळ सहा आठवड्यांत डॉक्‍टरांनी मिळवली होती. इंग्लंड व अमेरिकेतील विद्यापीठांनी त्यांच्या संशोधनाचा गौरव करीत त्यांना "फेलो' हा बहुमान दिला. पाश्‍चात्त्य देशांतील काटेकोर अभ्यासाची पद्धत त्यांनी स्वीकारली, पण एतद्देशीयांच्या सेवेसाठी ती वापरली. भारतीय समाजात अज्ञानातून, गरिबीतून आजार येतात, त्यामुळे येथे दुखण्याच्या निदानानंतर केवळ औषधयोजना उपयोगाची नाही, तर त्या कुटुंबालाच आरोग्यविषयक दृष्टी द्यायला हवी, हे त्यांनी जाणले. केवळ रुग्णांना उपचार करून भागणार नाही, तर साऱ्या समाजालाच आरोग्याचे भान दिले पाहिजे, हा त्यांनी ध्यास घेतला. त्यातूनच त्यांनी व्याख्याने व लेखन सुरू केले.

गेल्या चार-पाच वर्षांत त्यांनी नव्या रुग्णांना तपासणे कमी करीत नेले होते. आता वयाच्या पंच्याऐंशीत तर त्यांनी पूर्ण थांबवलेच आहे. पण, प्रवासाचा कंटाळा असूनही, डॉक्‍टर महिन्यातून एका रविवारी इस्लामपूरला जात. तब्बल दहा वर्षे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच एवढ्या वेळात सुमारे शंभर-दीडशे रुग्णांना तपासत. तेथील रुग्णांचा त्यांच्यावर विश्वास बसला होता. त्यामुळे पुण्यातही सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर येथील रुग्ण मोठ्या प्रमाणात असत. त्यांच्या लक्षात आले, की हे रुग्ण रात्रीच्या गाडीने निघतात आणि पहाटे येऊन दवाखान्याच्या बाहेर तिष्ठत बसतात. म्हणून या रुग्णांसाठी डॉक्‍टरांनी पहाटे साडेतीन-चार वाजता दवाखाना सुरू केला. त्यामुळे रुग्णांना पुण्यात राहावे लागत नसे. या रुग्णांना साधारण तीन महिन्यांची औषधयोजना ते सुचवत. औषधांचा खर्च फार नसणार, हेही पाहत. हा त्यांच्यावर त्यांच्या गुरूंचा संस्कार होता.

वैद्यकीय क्षेत्रातील एक ज्ञानसंपन्न, व्यासंगी, सुसंस्कृत, सृजनशील, सुहृदयी व प्रसन्न व्यक्तिमत्त्व असे ते धन्वंतरी आहेत. हृदयविकार आणि मानसोपचार हे त्यांच्या अभ्यासाचे आणि चिंतनाचे विषय. मानसिक ताकदीचा उपयोग करून रोगांचे निवारण होऊ शकते, असे त्यांचे मत आहे. या विषयावर त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील नवे संशोधन समजून घेणे आणि आपल्या समाजाला समजावून देण्यासाठी लेखन करणे, हा त्यांचा छंद.

"घरोघरी ज्ञानेश्‍वर जन्मती' हे त्यांचे पुस्तक आज लोक घरोघरी वाचत आहेत. पालकांना बाल संगोपनावर मौलिक मार्गदर्शन होईल, असे हे पुस्तक आहे. मराठीत त्याच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच, हिंदी आणि इंग्रजी या भाषेतही हे पुस्तक लोकप्रिय झाले आहे. घरोघरी ज्ञानेश्‍वर जन्मायचे; तर आई, वडील दोघांनीही मुले वाढवणे या जबाबदारीची जाणीव करून घेतली पाहिजे, असे त्यांचे स्पष्ट मत आहे. शरीरशास्त्र, मानसशास्त्र, प्रजननशास्त्र याचा डॉ. सरदेसाई यांचा अभ्यास आहे. लहान मुलांची बौद्धिक, वैचारिक उंची वाढवण्यासाठी तशी लहानपणापासून पालकांनी पाल्याचे संगोपन करायला हवे, असे ते सांगत असतात. मुले समंजस, शहाणी, चतुर, चलाख, व्यवहारी होण्यासाठी बालपणापासून त्याची बुद्धिमत्ता जोपासली पाहिजे. याकरिता मुलावरचे संस्कार, संगोपन किंवा संवर्धन हे महत्त्वाचे आहेत, असे त्यांचे विचार आहेत. औषधोपचारांबरोबरच सर्वांगीण आरोग्यासाठी विचार केला पाहिजे, हा त्यांचा विचार भारतीय संस्कृतीतील आयुर्वेदाचाच आहे. पाश्‍चात्त्य वैद्यकशास्त्राची दृष्टी असलेला भारतीय मातीतील हा ज्ञानर्षी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jairam desai write article in muktapeeth