माझा अमेरिकी ड्रॉइंग क्‍लास

जयश्री एस. आलूर
मंगळवार, 3 जुलै 2018

अमेरिकेतील क्‍लासमध्ये चित्र काढायला शिकले. मी काढलेले चित्र घरी मुलगी व जावई पाहून म्हणाले, ""वा! खूपच छान!'' माझ्या अंगावर मूठभर मांस चढले.

अमेरिकेतील क्‍लासमध्ये चित्र काढायला शिकले. मी काढलेले चित्र घरी मुलगी व जावई पाहून म्हणाले, ""वा! खूपच छान!'' माझ्या अंगावर मूठभर मांस चढले.

माझी तिसरी मुलगी अमेरिकेत कॅलिफोर्नियात राहते. एका टीव्ही वाहिनीवर "इंडियन कुकिंग इन अमेरिकन स्टाइल' हा "सुगरण' कार्यक्रम सात-आठ वर्षे करीत होती. तिची मुले लहान असताना मी अनेकदा अमेरिकेला जात असे. मी पूर्वी तेथे गेले असताना माझी मुलगी म्हणाली, ""आई, दिवसभर तू एकटीच असतेस, तेव्हा तू येथील ड्रॉइंग क्‍लासला जा ना. तुझा वेळही छान जाईल आणि नवीन काही तरी शिकायला मिळेल.'' तिचे हे बोलणे ऐकूनच मला अक्षरशः घाम फुटला. अमेरिकेत क्‍लासला जायचे, या कल्पनेनेच, लहान मुले सुरवातीला जशी शाळेत जायला घाबरतात व रडतात, तशी माझी अवस्था झाली. माझी नाराजी पाहून माझी मुलगी म्हणाली, ""अग, एकदा जाऊन तर बघ, तिथे तुला जमले नाही, तर क्‍लास सोडून देता येईल.''

अमेरिकेत ज्येष्ठ नागरिकांसाठी हा खास दोन महिन्यांचा ड्रॉइंग क्‍लास होता. त्यामुळे त्याचे शुल्क फारच कमी होते. तरुणांसाठी ऐंशी डॉलर्स. पण, ज्येष्ठांसाठी फक्त अठरा डॉलर्स. क्‍लास आठवड्यात दोन सत्रांचा व प्रत्येक सत्र दोन तासांचे. माझी मुलगी मला कारने ने-आण करणार होती. माझ्या क्‍लासचा पहिला दिवस उजाडला. धडधडत्या मनाने मी क्‍लासला गेले. मला इंग्रजी भाषा नीट येत नव्हती. अमेरिकन शैलीत बोललेले नीट समजत नव्हते. शिवाय ओळखीचे व भारतातील माणूस कोणी नसणार, हे मनावर खूप दडपण होते.

एक मोठा हॉल. बरेच मोठमोठे बेंचेस. प्रत्येकाला स्वतंत्र बेंच. क्‍लासमध्ये वीस-पंचवीस जण होतो. वेगवेगळ्या देशांतील स्त्री-पुरुष. सर्व साठीच्या पल्याडचे. त्यांचे गोरे-गोमटे चेहरे पाहून मी खूपच अस्वस्थ झाले. तेथे मी एकटीच साडी नेसलेली, कपाळावर कुंकू लावलेली भारतीय होते. सगळे एकमेकांना पाहून स्मितहास्य करीत होते. क्‍लासमध्ये ड्रॉइंग-पेंटिंग शिकवायला एक लेडी टीचर होती. स्कर्ट घातलेल्या वयस्कर व अगदी गोऱ्यापान बाई होत्या. त्यांनी सगळ्यांशी ओळख करून घेतली. थोडा वेळ गप्पागोष्टी झाल्या. नंतर कॉफी-बिस्किटे झाली. आता त्यांनी आम्हाला पुढील आठवड्यात क्‍लासला येताना काय काय सामान आणायचे आहे, त्याची भली मोठी यादी दिली. ज्यात मोठे कॅनव्हासचे बोर्ड, सगळ्या साईजचे ब्रश, कलर्स ट्यूब, कलर मिक्‍सिंग बोर्ड, असे खूप सामान आणायला सांगितले. ती यादी पाहून व त्याच्या खर्चाचा विचार करून माझे तर अवसानच गळून गेले. असा पहिला दिवस संपला. मी काही परत या क्‍लासला येणार नाही, असे मनात ठरवूनच बाहेर पडले.

पण, कन्या मला थेट कलर शॉपमध्येच घेऊन गेली. पटापट यादीमधले सगळे सामान घेतले. शंभर डॉलरचे बिल पाहूनच मी दडपून गेले. सगळे सामान घेऊन नाराज मनाने कशीबशी क्‍लासला गेले. क्‍लासमध्ये प्रत्येक जण एकेकटे एकेका बेंचवर आरामात बसले होते. बेंचवर मोठे पेपर पसरून त्यावर सगळे साहित्य व्यवस्थित मांडून सर्व जण व्यवस्थित स्थानापन्न झाले होते. थोड्या वेळात टीचर आल्या. सर्वांना हाय, हॅलो करून झाल्यावर ब्लॅकबोर्डवर एक निसर्गचक्र काढले. एक मोठे उंच झाड, डोंगरावरचे सूर्योदय, झाडावर छान सूर्योदयाचे किरणं पडलेली, एक लांब रस्ता, बाजूला हिरवळ, त्यात सफेद फुलं दिसतात, असा देखावा काढून आम्हाला ते चित्र कॅनव्हान्सवर रंगवायला सांगितले. आधी कॅनव्हान्सवर मोठ्या ब्रशने ब्लू-व्हाइट मिक्‍स कलरने बोर्डला वॉश घ्यायला सांगितले. त्यानंतर तो रंग वाळेपर्यंत क्‍लासमध्ये सर्व जण मोकळेपणाने इकडे तिकडे गप्पा मारत कॉफी पीत होते. हे पाहून मला खूप मजा वाटली. माझ्या मनावरचे दडपण कमी झाले. पहिले वॉश वाळल्यानंतर दुसरा वॉश देऊन मग खरे चित्र सुरू झाले. चित्र काढायला व रंगवायला खूप सोपे वाटत होते. परंतु जेव्हा ब्रश हातात धरून रंगवायला सुरवात झाली तेव्हा काय करावे, कसे करावे उमजेना. आमच्या टीचर सगळ्यांच्या बेंचजवळ जाऊन प्रत्येक जण कसे चित्र काढत आहे, त्याचे निरीक्षण करत होती. टीचर माझ्या बेंचजवळ आली. तेव्हा धीर करून कलर मिक्‍सिंगबद्दल विचारले. तेव्हा हसून म्हणाली, "" युवर सेकंड वॉश इज व्हेरी नाईस.'' हे ऐकून मला बरे वाटले. असा पहिला दिवस संपला. प्रत्येक सत्रामध्ये थोडे थोडे करत एक चित्र संपवायला दोन महिने लागले. एकदा कोर्स पूर्ण झाला.
हे चित्र झाले पुढे काय? एवढे महाग कलर्स, ब्रशेस पाहून याचे करायचे काय? हे सगळे सामान वाया न घालवता ते वापरायलाच पाहिजे, असा निश्‍चय केला. देवाच्या कृपेने व माझ्या जिद्द व प्रबल इच्छा शक्तीने आजपर्यंत मी खूप चित्र काढलेली आहेत.

Web Title: jayshree aalur write article in muktapeeth