नियम पाळले तरी... 

khushbu jain
khushbu jain

नेहमीप्रमाणेच तो दिवस माझ्यासाठी उगवला होता. सकाळी ऑफिसला जायची गडबड. रोजच्या सवयीप्रमाणे हेल्मेट घालून अगदी वेळेवर नऊ वाजता मी माझ्या दुचाकीवरून निघाले. विश्रांतवाडीवरून वाकडेवाडीमार्गे शेतकी महाविद्यालयापाशी पोचले. वाहतुकीचे सर्व नियम मी नेहमीच पाळते. नेमका त्या दिवशी तिथला सिग्नल बंद होता. मग काय सर्वांनाच घाई झाली पुढे जायची. मी अंदाज घेत थांबले. माझ्या गाडीसमोर एक मोटार उभी होती. ती गाडी निघाली की मीही पुढे जाणार होते. एवढ्यात महाविद्यालयाच्या बाजूने एक मोटार भरधाव वेगाने अचानक समोर आली आणि काही कळायच्या आधीच माझ्या समोरच्या गाडीवर तिने जोरात धडक दिली. त्याबरोबर ती समोरची मोटार तितक्‍याच वेगाने मागे येऊन माझ्या गाडीवर आदळली. माझ्या दुचाकीचे हॅंडल जोरात माझ्या पोटात रुतले. गाडी विचित्र रीतीने खाली पडली आणि गाडीच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला. मला लोकांनी उठवून बसवले. चेहरा आणि चेहऱ्यावरचा स्कार्फ रक्ताने माखला होता. चक्कर येऊ लागली, शुद्ध जाते की काय असे वाटू लागले. सगळेच इतके अनपेक्षित होते की काही कळतच नव्हते. आजूबाजूची माणसे लगेच माझ्या दिशेने धावली. गर्दीतल्या एका बाईनी बाटलीतले पाणी डोक्‍यावर ओतले आणि माझी शुद्ध हरपणार नाही याची काळजी घेतली. त्यांनीच माझ्याकडून माझ्या आईचा नंबर घेतला. माझे घर लांब आहे हे ऐकल्यावर व माझी अवस्था पाहिल्यावर त्यांनीच त्वरित हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत समोरच्या गाडीतल्या बाईसुद्धा त्यांच्या मदतीला आल्या. त्यांच्या गाडीतून मला जवळच्या रुग्णालयामध्ये नेले. बाकीच्या लोकांनी माझी गाडी बाजूला लावली. डॉक्‍टरांनी लगेच पूर्ण तपासले, एक्‍स-रे काढला, उपचार सुरू झाले. दरम्यान, माझे आई-वडील, भाऊ तिथे पोचले. माझ्या ऑफिसमधील सहकारी आणि सरसुद्धा आले. असह्य वेदना होत होत्या. एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होता येत नव्हते. जरा हलले तरी प्रचंड दुखायचे. मुका मार तर होताच, शिवाय अवघड जागी हेअर लाइन फ्रॅक्‍चर होते. दोन महिने पूर्ण बेड रेस्ट.

हे दुखणे इतके वाईट होते, की सहनही होत नव्हते. चालणे-बसणे मुश्‍कील होऊन गेले. सतत डोक्‍यात एकच विचार - मी कधीही वाहतुकीचे नियम मोडले नाहीत. हेल्मेटशिवाय गाडी चालवली नाही. मग माझी काही चूक नसताना मला हा त्रास का? माझ्याबरोबर सगळ्या घरादाराला त्रास सोसावा लागत होता. आई-वडील काळजीमध्ये, सतत माझ्या सेवेत. कारण माझे मला काहीच करता येत नव्हते. चेकअपसाठी हॉस्पिटलच्या फेऱ्या. आम्हा सगळ्यांनाच विनाकारण शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास भोगावा लागत होता. दोन महिने म्हणता म्हणता मला सहा महिने त्रास झाला. बाकीच्या समाजापासून तुटल्यासारखे झाले. कधी कधी मन उदास व्हायचे. पण आई, पप्पा, दादा आणि इतर सर्व नातेवाईक-मित्र मैत्रिणी यांच्या सहकार्याने-सोबतीने हेही दिवस गेले. मात्र पुन्हा गाडी चालवताना, त्या रस्त्यावरून जाताना छातीत धडधडायचे. आता अजूनच जपून, सावधपणे गाडी चालवू लागले आहे. पूर्वीचा आत्मविश्‍वास डळमळीत झाल्यासारखा झाला आहे. 

मधल्या काळात समजले, की चुकीच्या दिशेने आणि चुकीच्या पद्धतीने गाडी चालवणारा मुलगा शहरातील एका नामवंत शिक्षण संस्थेतला श्रीलंकेचा विद्यार्थी होता. त्याच्याकडे योग्य वाहन परवाना नव्हता आणि गाडीसुद्धा मित्राची चालवत होता. आम्ही पोलिसांकडे तक्रार केली. त्याने वारंवार विनवण्या केल्या, नुकसान भरपाई देण्याची तयारी दाखवली. विद्यार्थी आहे- पुढील शिक्षणावर परिणाम होईल, असे सांगत मानसिक दडपण आणले गेले. माणुसकीच्या नात्याने आम्ही तो विषय तिथेच थांबवला. पण आज या घटनेला वर्ष उलटल्यानंतरही तो विषय मनातून जात नाही. त्या वेळी मला मदत करण्यासाठी गायकवाडबाई आणि देशपांडेबाई धावल्या. त्यांनी तातडीने रुग्णालयात नेले म्हणून मी आज आहे. कुटुंबीयांनी, मित्रमैत्रिणींनी मला धीर दिला आणि पुन्हा आत्मविश्वासाने उभे राहण्याचे बळही. कुणाच्या तरी चुकीची शिक्षा मी भोगली. मी इतकंच सांगेन, वाहतुकीचे नियम सर्वांनीच पाळणे आवश्‍यक आहे. विशेषतः कॉलेजमधील तरुणतरुणींना सांगेन, तुमचे पालक तुमची काळजी करीत असतात. गाडी जपून चालवा. बेभान, बेफिकीर गाडी चालवल्याने तुमचा आणि रस्त्यावरील इतरांचा जीव धोक्‍यात येऊ शकतो. कुणाचा जागीच जीव जाऊ शकतो, कुणी अपंग होऊ शकतो. दुर्घटना घडून गेल्यावर चूक कुणाची यावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नसतो. मी वेगात गाडी चालवली तरी सुरक्षित चालवतो ही घमेंड अपघात घडल्यानंतर उपयोगाची नसते. सर्वांच्याच घरी वाट पाहणारी प्रेमाची माणसे असतात, याचे भान वाहन चालवताना असू द्यावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com