निसर्गातील ओंकार

माधुरी माधव अभ्यंकर
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

एकदा पर्वतीवर बसलेले असताना वाऱ्यातून ओंकार ऐकू आला आणि मग सारी सृष्टीच ओंकार जप करते आहे, असे वाटू लागले.

एकदा पर्वतीवर बसलेले असताना वाऱ्यातून ओंकार ऐकू आला आणि मग सारी सृष्टीच ओंकार जप करते आहे, असे वाटू लागले.

मी निवृत्त झाल्यानंतर एकदा माझी मैत्रीण नीला पारखी मला भेटली. तिने तिच्या योग वर्गाबद्दल मला सांगितले. माझ्या घराजवळच तिचा वर्ग असल्यामुळे मी तिथे जाऊ लागले. तर योगाची सुरवात सर्वप्रथम ओंकाराने होते. "अ', "ऊ' आणि "म' या तीन अक्षरांनी "ओंकार' बनला आहे. प्रथम तोंड उघडून अकार पोटातून म्हणावा. नंतर तोंडाचा चंबू करून उकार म्हणावा व तोंड बंद करून नाकातून मकार उच्चारावा. असे केल्याने पोट, नाक व घसा यांचे स्नायू बळकट होतात. पचन सुधारते व घशातील संसर्ग वा सर्दी होत नाही. असा शास्त्रशुद्ध ओंकार सकाळी शुचिर्भूत होऊन पूर्वेकडे तोंड करून सूर्यप्रकाशात प्रत्येकाने म्हटला तर सर्वांची तब्येत सुदृढ राहून दिवसभर उत्साह वाढेल.

एकदा रविवारी सकाळी पर्वतीवर गेल्यावर विष्णूच्या देवळामागे सहज बसले असताना मनात ओंकाराविषयी विचार होते. मग मंद वाऱ्यातूनही मला ओंकारध्वनी ऐकू आला. नदीच्या पाण्याचा झुळझुळ आवाज, गाईचे हंबरणे, शेळ्या-मेंढ्यांचे बें-बें करणे हे सर्व ओंकारच आहेत. पक्ष्यांची किलबिल, मोराचा केकारव, कोकिळेचे कुजन यातही ओंकारच भरलेला आहे. सर्व सृष्टीच ओंकाराचा जप करते आहे, असे वाटू लागले. ॐ विषयी जाणून घेऊ. त्यातील वरचा अर्धगोल हा पृथ्वीच्या डोक्‍यावरील स्वर्गाचे छत्रच, मधला पूर्ण गोल म्हणजे पृथ्वी व खालचा अर्धगोल म्हणजे नरक होय. तसेच जीवनाचेही तीन टप्पे असतात. बाल्यावस्थेत, तारुण्यात आपण सर्व गोष्टी उपभोगून आनंद मिळवतो. तर साधारण पन्नाशीनंतर संसारातून विरक्त व्हावेसे वाटू लागते. माणूस पाप-पुण्याच्या गोष्टी करू लागतो. देवावरची श्रद्ध वाढू लागते व आपण भक्तिमार्गाकडे वळू लागतो. आता पाहा... स्वर्गात जाणे म्हणजे वर जाणे. निसर्गात हलकी वस्तू सहज वर जाते आणि जड वस्तू खाली बुडते. म्हणून आपल्यालाही वर जाताना हलके झाले पाहिजे. म्हणून आपल्याजवळील पैसा-अडका, जमीन-जुमला गरजेपुरता ठेवून मुलांना, समाजाला वाटून द्यावा. एकभुक्त राहून शरीरही हलके करावे.

Web Title: madhuri abhyankar write article in muktapeeth