मोपेडवरून कन्याकुमारी

मोपेडवरून कन्याकुमारी

ती खारदुंगला सायकलवरून गेली होती. आता कन्याकुमारीला निघाली. मोपेडवरून. बारा वर्षांची मुलगी पाठीला बांधून ती भटकंतीला निघाली. अवघ्या आठ दिवसांत पाच राज्यांत भटकून आली.

हम दोनोंने मिलके कुछ तुफानी किया है, पहले ना कभी हुआ है, ना कभी होगा। मॉं और बेटी ने मिलके एक नया इतिहास रचाया है।.. हो, मन्वा आणि मी, आम्ही दोघींनी मिळून पुणे-कन्याकुमारी-पुणे अशी मोपेडवरून सहल केली. सगळे "बायकर्स' महागड्या मोटारसायकलींवरून खारदुंगला, कन्याकुमारी जातात, पण आम्ही दोघीं मोपेडवरून गेलो. आम्ही दोघीनी सारसबागेतील गणपतीचे दर्शन घेतले अन्‌ निघालो. कोल्हापूरमध्ये माझा मावसभाऊ यश आणि त्याचा मित्र अचानकपणे आम्हाला येऊन मिळाले. ही सोबत अनपेक्षित, पण आनंद देणारी होती. आम्ही पहिल्या दिवशी हावेरीला थांबलो. दुसऱ्या दिवशी बंगळूरला वाहनांच्या प्रचंड गर्दीत अडकलो. प्रदूषणही खूप होते. तिथून बाहेर पडून चित्रदुर्ग, सिरा, होसूरमार्गे सालेमकडे जायला निघालो. आतापावेतो कुठेही दुचाकींसाठी "टोल' घेतला नव्हता. होसुरला जात असताना "नाइस रोड'वर "टोल' घेतला. नावाप्रमाणेच नाइस रोड होता. गाडी चालविताना हवेत गाडी चालवत आहोत असा भास होत होता, एकही खड्डा नव्हता, निसर्गसौंदर्य डोळे शांतविणारे होते. आम्ही सालेमला पोचलो. उद्या कन्याकुमारीला पोचू.

पुण्याहून निघालो, त्याच्या तिसऱ्या दिवशी कन्याकुमारी गाठणार होतो. वाटेत मदुराई लागले. मीनाक्षी मंदिर बघायला गेलो. भव्य मंदिर होते. खांबावरची नक्षीदार कलाकुसर पाहताना पाय निघत नव्हते. ते मंदिरशिल्प डोळे भरून पाहिले. मग सत्तूरमार्गे कन्याकुमारीला पोचलो. सोळाशे किलोमीटर अंतर तीन दिवसांत मोपेडवरून पार केले होते. कन्याकुमारीला वेळेत पोचलो आणि सूर्यास्त पाहिला. उद्या सकाळी समुद्रातून उगविणारा सूर्य पाहायचा होता. दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून सूर्योदय पाहायला गेलो. विवेकानंद स्मारक बघितले. तीन सागरांचा संगम पाहिला.
खरे तर मला पुणे-कन्याकुमारी सायकलवरून करायचे होते. त्यासाठी मी गेली कित्येक वर्षे वाट बघत होते. पण अजून कुणी तयार होत नव्हते. म्हणून मी मोपेडवरून जायचे ठरवले. मला मन्वाची सोबत असणार होती. रोज बारा तास मन्वा माझ्यामागे गाडीवर बसून होती. पण त्या बारा वर्षाच्या मुलीचा उत्साह बघून, मला पण रोज "एनर्जी' मिळत होती. आमच्यातील आई-मुलीचे नाते अजून घट्ट झाले.
जातानाचा वेग परतीच्या वाटेवर थोडा कमी केला. पुण्याला येताना किनारामार्ग धरून रमत गमत आलो.

अवघ्या आठ दिवसांत महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ आणि गोवा या राज्यांतून फिरलो. निसर्गसौंदर्य भरभरून पाहिले. नारळाच्या बागाशेजारून गेलो. अनेक नद्या ओलांडल्या. अनेक वेळा समुद्र किनाऱ्याजवळून गाडी चालविण्याचा आनंद घेतला. मला माणसे जाणून घेत भटकायला आवडते. रस्त्यांवर काम करणाऱ्या मजुरांसोबत, महिलांसोबत मला थांबून फोटो काढायला आवडतात. कन्याकुमारीवरून निघताना ऑइल चेंज केले. माझ्या मेहुण्याकडून गाडीची जुजबी माहिती करून घेतली होती. परतीच्या वाटेवर कोची, अलपुझाचा समुद्र किनारा पाहिला. व्हेतानापल्ली, कोझिकोड, चेमन जेरी, कन्नूर करत मंगळूरला पोचलो. परतीच्या वाटेवर मंगळूरला सकाळी सहा वाजता टायर पंक्‍चर असल्याचे लक्षात आले. खूप शोधाशोध केली. तेथे साडेआठला दुकाने उघडतात. तिथल्या रिक्षावाल्यांना कसेबसे खाणाखुणा करून पंक्‍चर असल्याचे दाखविले. त्याने एक गॅरेज कम घर दाखवले. दार वाजवून उठवले आणि त्याने अवघ्या तीन मिनिटांत पंक्‍चर काढून दिले. प्रवासात मी पूर्णपणे सकारात्मक राहिले, आपला प्रवास चांगलाच होणार आणि आपल्याला चांगलीच लोक भेटणार, असे मनाशी पक्के ठरवले होते आणि झालेही तसेच. ही सगळी कोकण किनारपट्टीच. भाषा वेगळी. पण वेष, रूप तसेच. उडपी, कुमटा, कारवार करीत पणजीला पोचलो, तेव्हा पुण्याच्या जवळ पोचल्याचाच आनंद झाला. गोव्याला माझा मावसभाऊ आणि त्याचा मित्र थांबले. पणजीवरून थेट पुण्याला आलो नाही. सावंतवाडी, आंबोली, आजरा, निपाणी, कोल्हापूर, सातारा करीत आम्ही महाबळेश्‍वर गाठले. वेण्णा लेकचा आनंद घेतला. आठव्या दिवशी पुण्याकडे निघालो. सारसबागेतील गणपतीचे दर्शन घेऊन घरी परतलो. आमच्या दोघींचे घरच्यांनी जंगी स्वागत केले. माझ्या "सायकल मैत्रिणी'ही आल्या होत्या.

स्त्री म्हणून तथाकथित सुरक्षित चौकटीत राहणे पसंत नाही. मी विश्वासावर जगते, माणुसकी अनुभवते, प्रवासात विविध भागांतील लोकांचे स्वभाव, संस्कृती जाणून घेते, यातून मी प्रचंड आनंद मिळवते. हे सुंदर जग माझ्या मुलीनेही अनुभवावे यासाठी मी मुलीलाही घेऊन निघाले. अगदी निर्धास्तपणे. आम्ही दोघींनीही ती मजा लुटली.
हे जग खूप सुंदर आहे, ते अनुभवायलाच हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com