पुणे मुंबई पुणे ( अनुभव )

मानसी स्वानंद बापट 
सोमवार, 3 एप्रिल 2017

एखाद्या गावाबद्दल खूप आपलेपणा वाटतो, तर एखाद्या शहराविषयी कमालीची अढी मनात असते. मनात अढी घेऊन त्या शहरात जातोही; पण हळूहळू ते शहर आवडू लागते. तेही शहर सोडायचे म्हणजे... 

एखाद्या गावाबद्दल खूप आपलेपणा वाटतो, तर एखाद्या शहराविषयी कमालीची अढी मनात असते. मनात अढी घेऊन त्या शहरात जातोही; पण हळूहळू ते शहर आवडू लागते. तेही शहर सोडायचे म्हणजे... 

माझ्या मिस्टरांनी नोकरी बदलली आणि मुंबई येथे नव्या बॅंकेत रुजू होण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय ऐकून मी तर घाबरूनच गेले. सुरवातीला लग्न करताना मुंबईचा नवरा नको, अशी अट घालणारी मी आणि आता माझ्या समोर हा चांगलाच पेच निर्माण झाला. लग्न करून पुण्यात आले आणि वाटले की, आपण आता कायमचे पुणेकर झालो. मुंबईची ती गर्दी, लोकल, उकाडा आणि ती धावणारी माणसे यांची एक अनामिक भीती मनात खोलवर रुजली होती. त्यातच माझ्या सासऱ्यांनी सांगितले की, ते कधीही पुणे सोडणार नाहीत. त्यामुळे मला माझ्या मनासारखेच झाल्यासारखे झाले होते आणि आता हे मध्येच पुणे सोडणे आले. 
अखेर मी, माझा चार वर्षांचा मुलगा आणि मिस्टर ठाण्याला राहणार म्हणून आनंदही झाला होता. नवे गाव, नव्या ओळखी, शाळेचा प्रवेश करण्यात मे महिना संपला. शाळा सुरू झाल्या आणि इतके दिवस पुण्यात घरात बसून टीव्हीवर "मुंबई सारी जलमय' अशा बातम्या पाहणारी मी या साऱ्याचा याची देही याची डोळा अनुभव घेतला. शाळेचा पहिला दिवस होता. कमरेएवढ्या पाण्यातून मुलाला कडेवर घेऊन शाळेत गेले तर तिथे फलक लावला होता, "शाळेत पाणी साचल्याने शाळा आज बंद राहील.' झाले, अशी धडाकेबाज सुरवात झाली आमच्या मुंबई वास्तव्याची; पण हा अनुभव एक वेगळाच आत्मविश्‍वास देऊन गेला. 
हळूहळू ओळखी झाल्या. शाळेत रोज सोडायला जात असल्याने नव्या मैत्रिणी भेटल्या. आम्ही आठ जणी नियमित भेटू लागलो. तासन्‌ तास गप्पा मारू लागलो. शाळेची सगळी कामे उरकू लागलो. शिपाई कुलूप लावायला आला तरी आमच्या गप्पा सुरूच असत. शेवटी तो गमतीने आम्हाला म्हणायचा, "राहिलेल्या गप्पा आता घरी मारा.' पण या गप्पा म्हणजे कोणत्याही प्रकारचे गॉसिपिंग कधीच नसायचे बरे का! तर मुलांचा अभ्यास, त्यांचे जनरल नॉलेज कसे वाढेल, अभ्यासेतर ज्ञान कसे वाढवावे, काही कुकिंग रेसिपी हे आणि असे अनेक विषय असायचे. मग आम्ही आमच्या मुलांना घेऊन अनेक क्षेत्रभेटी केल्या. पोस्ट ऑफिसचे काम कसे चालते, इथपासून आरे कॉलनी, साबण तयार करण्याचे कारखाने, पार्ले बिस्किटचा कारखाना ते "विक्रांत' जहाजसुद्धा दाखवून आणले. मुलांच्या सोबत आम्हालाही खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. 
शनिवार, रविवारी हळूहळू लोकलने प्रवास सुरू केला. मिस्टरांनी मुंबईतील अनेक ठिकाणे दाखविली. सुरवातीला ही लोकल नको, गर्दी आहे, पुढची लोकल पकडू, असे म्हणत चार लोकल सोडून देणारी मी मैत्रिणींसोबत नंतर मुलांना घेऊन बिनधास्त प्रवास करू लागले. लोकलचा बागुलबुवा मनातून केव्हाच दूर पळून गेला. मलाही मुंबई आता आपलीशी वाटू लागली होती. मुंबईच्या वातावरणातील एनर्जीने मी अधिकच क्रियाशील झाले होते. आपुलकीने सर्वांना मदत करणाऱ्या मुंबईकरांचा मला भक्कम आधार वाटू लागला होता. बघता बघता तीन वर्षे कधी संपली ते समजलेच नाही. दिवस कसे मस्त चालले होते आणि अचानक एक दिवस मिस्टरांनी मला सांगितले की, आपल्याला पुण्यात परत जायचे आहे. तिथे चांगला जॉब मिळाला आहे. मुंबईपासून लांब धावणारी मी आता मात्र जड अंतःकरणाने मुंबई सोडणार होते. प्रत्येक शहराचा स्वभाव असतो. त्या ठिकाणच्या माणसांची भाषा, त्यांचे वावरणे या सगळ्यातून त्या शहराचे सामूहिक वर्तन तयार होत गेलेले असते. त्यात चांगले-वाईट असा काही भेद करायचे कारण नाही. त्यांच्या त्यांच्या परिस्थितीत ते उत्तमच असते. 
खरेच पुणे-मुंबई-पुणे हा प्रवास मला आयुष्याचे खूप अविस्मरणीय धडे देऊन गेला. "मुंबई सर्वांना आपल्यात सामावून घेते,' हा चित्रपटातला संवाद स्वतः अनुभवला की मगच खरा वाटतो. सांगलीसारखे चांगले नगर माहेर म्हणून सोडून पुणे- मुंबई असा प्रवास केला. ही शहरे फिरून आल्यावर मला असे वाटते की, प्रत्येक शहराचे वेगळे असे वैशिष्ट्य असते. म्हणून तर पुणे हे गोव्याहून वेगवान असले तरी, मुंबईच्या धावपळीपुढे ते सुशेगादच असते. मुंबईची लोकल पकडण्यात कौशल्य लागतं आणि पुण्यात रिक्षा-दुचाक्‍या यांच्या गर्दीतून रस्ता ओलांडण्यासाठीही कौशल्यच लागतं. प्रत्येक ठिकाणच्या जगण्याचा अनुभव वेगळा असतो आणि ज्यांना जसे जमेल त्याप्रमाणे प्रत्येकाने त्याचा अनुभव घेत राहावे आणि शिकत राहावे. 
सहलींच्या निमित्ताने परदेशापासून ते खेड्यापर्यंत मी तरी माझे हे शिकणे सुरू ठेवले आहे, आणि तुम्ही? 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manasi bapat muktapeeth